ठसा – डॉ. रा. श्री. मोरवंचीकर

>>संकेत कुलकर्णी

महाराष्ट्राला इतिहास संशोधक आणि अभ्यासकांची एक मोठी परंपरा लाभली आहे. याच परंपरेतील एक दीपस्तंभ म्हणजे डॉ. रामचंद्र श्रीनिवास मोरवंचीकर. 17 जानेवारी 2026 रोजी वयाच्या 88 व्या वर्षी या थोर इतिहास संशोधकाने जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने केवळ गोदाकाठचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संचिताचा वारसा उलगडून सांगणारा एक मोठा अभ्यासक हरपला आहे.

सोलापूर जिह्यातील मोहोळ तालुक्यातील मोरवंची हे सरांचे मूळ गाव. त्यांनी पुणे विद्यापीठातून बीए आणि एमए करत असताना प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला. त्यानंतर 1978 मध्ये ‘पैठण थ्रू द एजेस’ या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. पैठणच्या प्रतिष्ठान महाविद्यालयात त्यांनी अनेक वर्षे इतिहासाचे अध्यापन केले, पण पुढे विद्यापीठात त्यांनी इतिहास विभागप्रमुख आणि  पर्यटन विभागाचे संचालक म्हणून दीर्घकाळ सेवा दिली.

डॉ. मोरवंचीकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य पैठण आणि सातवाहन काळातील महाराष्ट्राच्या संशोधनासाठी वाहून घेतले होते. ‘दक्षिण काशी पैठण’, ‘सातवाहनकालीन महाराष्ट्र’ आणि ‘पैठणी’ यांसारख्या ग्रंथांतून त्यांनी या प्राचीन नगरीचा आणि कलेचा जागतिक स्तरावर परिचय करून दिला. 1994-96 दरम्यान पैठण येथे झालेल्या उत्खननात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. केवळ पुस्तकी इतिहासच नव्हे, तर स्थापत्य, नाणी आणि शिल्पकला यांवरही त्यांचा मोठा अधिकार होता.

मोरवंचीकर सरांच्या संशोधनाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ‘जल संस्कृती’. देवगिरी किल्ल्यातील प्राचीन जल पुरवठा व्यवस्थेचा अभ्यास करताना त्यांना इतिहासाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळाला. ‘‘पाणी हे इतिहास लेखनाचे महत्त्वाचे साधन ठरू शकते,’’ हा विचार त्यांनी ‘भारतीय जल संस्कृती’ आणि ‘शुष्क नद्यांचे आक्रोश’ यांसारख्या दर्जेदार ग्रंथांतून मांडला. जल व्यवस्थापनातील चुकांमुळे कशा प्राचीन संस्कृती नष्ट झाल्या, याचे दाखले देत त्यांनी वर्तमानातील जलसंकटाबाबत समाजाला सावध करण्याचे काम केले.

इतिहास लेखनात ‘नामूलं लिख्यते किंचित’ (पुराव्याशिवाय काहीही लिहू नये) हा त्यांचा बाणा होता. अलीकडच्या काळातील इतिहासाच्या ‘रंजनवादा’वर त्यांनी नेहमीच कठोर भाष्य केले. छत्रपती संभाजीनगर शहरातील ऐतिहासिक दरवाजांचे जतन करण्यात आणि प्रसिद्ध ‘वेरूळ महोत्सवा’ची मुहूर्तमेढ रोवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. 1996 ते 2005 या काळात त्यांनी इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेजच्या (इंटॅक) छत्रपती संभाजीनगर चॅप्टरचे नेतृत्व केले.

डॉ. मोरवंचीकर यांनी आपल्या 40 वर्षांच्या शैक्षणिक कारकिर्दीत तीसहून अधिक पीएचडी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, दोनशेहून अधिक शोध निबंध, 30 ग्रंथ आणि 16 अभ्यासक्रमाची पुस्तके लिहिली. महाराष्ट्र शासनाचे ‘उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार’, विद्यापीठाचा ‘जीवन साधना गौरव’ पुरस्कार तसेच इतरही अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

डॉ. मोरवंचीकर हे केवळ इतिहासकार नव्हते, तर ते इतिहासाच्या माध्यमातून शहाणपण देणारे आधुनिक ऋषी होते. त्यांच्या निधनाने संशोधनाच्या क्षेत्रातील एक चालते-बोलते विद्यापीठ शांत झाले आहे.