ठसा – प्राचार्य मा. के. यादव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>गोरख तावरे

रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांत प्राध्यापक व प्राचार्य म्हणून केलेल्या दीर्घ सेवेमुळे तसेच साहित्य, वत्तृत्व आणि चरित्र लेखन क्षेत्रातील योगदानामुळे शिक्षण विश्वात प्राचार्य मा. के. यादव यांना विशेष मानाचे स्थान लाभले होते.

1 जून 1940 रोजी सांगली जिह्यातील वाळवा तालुक्यातील कार्वे येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण ऐतवडे बुद्रुक येथे झाले. शालेय जीवनात असतानाच त्यांना कर्मवीर भाऊराव पाटील यांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली होती. कर्मवीर अण्णांनी दिलेला ‘खूप शिक’ हा आशीर्वाद त्यांच्या आयुष्याला दिशा देणारा ठरला.

त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड तसेच राजाराम कॉलेज येथे झाले. बी. ए. परीक्षेत त्यांनी कोल्हापूर केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला. 1962 ते 1964 या काळात त्यांना राजाराम कॉलेजची दोन वर्षे फेलोशिप मिळाली. पुणे विद्यापीठ येथे अर्धमागधी विषयात ते प्रथम आले होते. त्यांना दोन वर्षांसाठी स्वर्गीय रंभाकुवरजी शिष्यवृत्तीही प्राप्त झाली. एम. ए. पदवी त्यांनी शिवाजी विद्यापीठ येथे तृतीय क्रमांकाने संपादन केली.

20 जून 1964 रोजी वारणानगर महाविद्यालयात अर्धमागधी विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांच्या अध्यापन कारकीर्दीची सुरुवात झाली. त्यानंतर भास्करराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 15 जून 1965 रोजी महात्मा गांधी विद्यालय, नीरा येथे उपशिक्षक म्हणून त्यांनी काम केले. 15 जून 1966 पासून ते छत्रपती शिवाजी कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. येथे त्यांनी मराठी आणि अर्धमागधी हे विषय विद्यार्थ्यांना शिकवले. रयत शिक्षण पत्रिकेच्या संपादन कार्यातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

 1970 पासून ते मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिले. पुढे 1971 मध्ये कॉमर्स कॉलेज, सातारा, 25 जून 1972 पासून दहिवडी, 1 जून 1975 पासून पंढरपूर आणि 1 जून 1983 पासून सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड येथे त्यांची बदली झाली. 21 ऑगस्ट 1990 रोजी त्यांनी कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा येथे प्राचार्य म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर 1 ऑगस्ट 1993 रोजी राजर्षी शाहू कॉलेज, कोल्हापूर येथे प्राचार्य म्हणून काम केले. 1 ऑगस्ट 1995 ते 31 मे 2000 या कालावधीत ते छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य होते. 31 मे 2000 रोजी ते सेवेतून निवृत्त झाले.

प्राचार्य यादव हे प्रभावी मराठी वत्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात आले. तसेच महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ‘शिवगौरव’ ही स्मरणिका त्यांच्या संपादनातून प्रकाशित झाली. रयत शिक्षण संस्थेच्या कार्यपद्धतीत सर्वांशी संवाद ठेवून संस्थेच्या हिताचे निर्णय घडवून आणण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले.

अध्यापनासोबतच त्यांनी साहित्य क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले. कर्मवीरांच्या जीवनकार्याचा सखोल अभ्यास करून त्यांनी ‘कर्मवीर भाऊराव पाटील ः एक सम्यक आकलन’ हा ग्रंथ लिहिला. ‘दुःख कैसे फूल झाले’ हे त्यांचे आत्मचरित्रही वस्तुनिष्ठ लेखनाचे उदाहरण मानले जाते. याशिवाय ‘मराठी संत कवयित्री’, ‘मूल्य शिक्षण’ पुस्तिका, ‘आधुनिक मीराबाई’, ‘साध्वी राधाअक्का’, ‘वळूनी पाहता’ (आदर्श माता श्रीमती सरस्वती गजानन पाटील यांचे चरित्र), ‘आधारवड’ या गौरव ग्रंथाच्या संपादनात सहभाग, ‘बोलिलो बोल’ हे व्याख्यानांवरील पुस्तक तसेच आयुर्वेदाचार्य पुरुषोत्तमाचारी महाराज यांचे चरित्र आदी साहित्य निर्मिती त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांचे चरित्र लिहिण्याची त्यांची इच्छा मात्र अपूर्ण राहिली.

‘दुःख कैसे फूल झाले’ या आत्मचरित्रात त्यांनी महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. संस्थेतील विविध महाविद्यालयांमध्ये काम करताना आलेले अनुभव त्यांनी आपल्या लेखनातून जिवंतपणे शब्दबद्ध केले आहेत. संयमी, विचारशील प्राचार्य, अभ्यासू लेखक आणि मनापासून बोलणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून प्राचार्य मा. के. यादव यांची आठवण शिक्षण व साहित्य क्षेत्रात कायम राहील. त्यांच्या निधनाने रयत शिक्षण संस्थेच्या परंपरेतील एक समृद्ध आणि प्रेरणादायी अध्याय संपला आहे.

[email protected]