
>>साधना गोरे
गणितात दोन अधिक दोन चारच होतात. म्हणजे कोणताही अंक एक निश्चित संख्या दर्शवत असतो, पण सर्वसाधारण भाषा वापरात मात्र अशी काही निश्चित संख्या असेलच असं नाही. उदा ः ‘अमक्याने दहा-बारा फळे दिली’ या वाक्याचा अर्थ संदर्भानुसार बदलू शकतो. बोलणारा अमक्याचे कौतुक करत असेल, तर तो अंक खूप अर्थाने येईल किंवा कधी याच्या उलटही होऊ शकेल. म्हणजे बोलणारा अमक्याच्या कंजूस वृत्तीबद्दल सांगत असेल, तर ही संख्या कमी असू शकते. गेल्या लेखात आपण बारा अंकाचा समावेश असलेले बरेच शब्दप्रयोग पाहिले. त्यातून बारा म्हणजे अनेक, खूप या अर्थाने हा शब्दप्रयोग वापरलेला दिसतो. त्यात आणखीही भर घालता येईल. उदा ः ‘भीक माग्याला बारा घरं’, ‘बारा कोसावर नणंद वसे, तिच्या वासाने दही-दूध नासे’, या शब्दप्रयोगांत बारा संख्या अनेक, जास्त या अर्थाने येते, तर ‘लाखाचे बारा हजार’सारख्या म्हणीत बारा हा आकडा अल्प, कमी या अर्थाने येतो.
सगळे एकसारखेच आहेत या अर्थाने ‘एका माळेचे मणी’ हा शब्दप्रयोग सर्रास वापरला जातो. याच अर्थाने ‘सब घोडे बारा टक्के’ अशीही एक म्हण आहे. टका म्हणजे नाणं. बंगालमध्ये हा शब्द रुपयास वापरत, परंतु इतरत्र चार किंवा दोन पैशांच्या नाण्याला किंवा सामान्य अर्थाने पैसा याअर्थी वापरत. काहींच्या मते, हे नाणं प्रत्यक्ष वापरात नसून केवळ हिशेबाचं नाणं होतं. मराठीत देव्हाऱ्यातील नाण्याच्या आकारावर कोरलेल्या देवांच्या मूर्तींना याच अर्थाने टाक म्हटलं जातं. जातिवंत, कमअस्सल अशी घोडय़ांची प्रत न ओळखता सर्वांचं सारखंच मूल्य करणं, या अर्थाचा वरील शब्दप्रयोग आहे. सगळे एकाच मूल्याचे आणि तेही कमी दर्जाचे असल्याचा भाव त्यातून दर्शवला जातो. ‘बारा टक्क्याचा दुष्काळ’ हा वाक्प्रयोग मात्र वस्तू खूप महाग होणं, सामान्य माणसांची त्या वस्तू घेण्याची ऐपत नसणं याअर्थी योजला जातो, तर बारा अंकाचं मूल्य असं संदर्भानुसार बदलणारं दिसतं.
‘दोन’ या अर्थाने संस्कृतमध्ये ‘द्व’, ‘द्वि’ अंक आहे, तर लॅटिनमध्ये त्याचा उच्चार होतो ‘डयुओ.’ संस्कृत ‘द्वि’पासून भारतीय भाषांमध्ये जसे ‘दोन’ किंवा ‘दो’ हा अंक विकसित झाला, त्याप्रमाणे लॅटिन ‘डयुओ’पासून इंग्रजीत ‘टू’, स्पॅनिशमध्ये ‘दस’ असे शब्द घडले. संस्कृत आणि लॅटिनमध्ये दहा अंकाच्या उच्चारातही हेच साम्य दिसतं. संस्कृत – दशन/दशम, लॅटिन – डेसिम. ग्रीकमध्ये या दहाचा उच्चार ‘डेका’ होतो, आयरिशमध्ये ‘डेख’, तर रशियनमध्ये होतो ‘दिसित/देस्यात.’ इंग्रजीतील ‘डिसेंबर’च्या मुळाशी हा ‘डेसिम’ शब्दच आहे, ज्याचा अर्थ दहा आहे. डिसेंबर हा खरे तर शेवटचा बारावा महिना. मग त्याचा दहाशी काय संबंध असा प्रश्न लगोलग तुमच्या मनात आला असेल. त्यासाठी आपल्याला थोडं मध्ययुगीन रोमन कालगणनेच्या इतिहासात डोकावावं लागेल. मध्ययुगापर्यंत रोमन साम्राज्यात दहा महिन्यांचं वर्षे मानण्याची पद्धत होती. कालांतराने म्हणजे ग्रेगरियन कालगणनेनुसार बारा महिन्यांत वर्षाचं विभाजन झालं. त्याआधी रोमन कालगणनेची सुरुवात मार्च महिन्यापासून होत असे. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची भर पडल्याने आपल्या अर्थाला अनुसरणारा डिसेंबर, साहजिकच आपल्या जुन्या नावासह बाराव्या स्थानावर सरकला.
बारा वस्तूंच्या समूहाला मराठी आणि बऱ्याच भारतीय भाषांमध्ये वापरला जाणारा शब्द म्हणजे डझन. कधी कधी तर या डझनचा शब्दप्रयोग व्यक्तींच्या संदर्भातही केला जातो. उदाः ‘त्या कार्यक्रमाला डझनभरही लोक नव्हते.’ मराठीत बारा हा अंक अनेक, खूप अर्थाने वापरला जातो, त्याच अर्थाने महाराष्ट्राच्या काही भागांत ‘डझनावारी’ हा शब्दप्रयोगही केला जाताना आढळतो. ‘वारी’ हा अरबी-फारसीतला प्रत्यय आहे. त्याचा अर्थ ‘च्या साहाय्याने’, ‘च्या रीतीने’ असा आहे. ‘हसण्यावारी’, ‘थट्टेवारी’ या शब्दांमध्ये तो दिसतो, तर या ‘डझन’चं मूळ इंग्रजीत आहे आणि इंग्रजी डझनचं मूळ आहे लॅटिनमधील द्वडेसिम (duodecim) या शब्दात, साहजिकच त्याचा अर्थ बारा असा होतो. संस्कृत ‘द्वादस’प्रमाणे या शब्दातूनही दोन + दहा हा अर्थ प्रकट होतो.
संस्कृती व्यक्त करण्याचं माध्यम भाषा असल्याने प्रत्येक शब्दातच त्या-त्या समाजाची संस्कृती दिसत असते. असं असलं तरीही मानवी समूहांच्या स्थलांतरामुळे त्यांच्या भाषा आणि भाषेद्वारे संस्कृतीचंही इतर प्रांतांत वहन होत असतं. आज सारं जग ग्रेगरियन कालगणनेचा अवलंब करतं, त्यातूनही संस्कृती आणि भाषेचं वहनच होत आलं आहे.




























































