जाऊ शब्दांच्या गावा – अण्णामलाई आणि रसमलाई

>>साधना गोरे

अण्णामलाई या तामीळनाडूमधील भाजप नेत्याने मध्यंतरी मुंबईत केलेल्या एका विधानावरून वाद झाला होता. अर्थात हा आपल्या लेखाचा विषय नाही. तर विषय आहे अण्णामलाई नावातल्या ‘मलई’ या शब्दाचा. या नावावरून ‘रसमलाई’ अशी कोटी करत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी खरपूस समाचारही घेतला होता. अण्णामलाई/मलई आणि रसमलई/मलाई हे दोन्ही शब्द भिन्न भाषापुळातले, पण त्यांच्या काही अर्थांत सरमिसळही झालेली दिसते. ‘मलई’ शब्दाचा एक अर्थ आहे साय किंवा स्निग्ध पदार्थ. साय म्हणजे दूध इ. पदार्थांवरील पापुद्रा. चहा थंड झाला की त्यावरही साय येते. शहाळ्यात म्हणजे कच्च्या नारळात जे पांढरंशुभ्र आवरण असतं, त्यालाही मलई म्हणतात. दुधातील मलईचा म्हणजे स्निग्धतेचा वापर अनेक गोड आणि तिखट पदार्थांमध्ये केला जातो. उदा. रसमलई, मलई पुल्फी, मलई कोफ्ता, मलई पनीर. तर अशी ही अनेक पदार्थांमध्ये वापरली जाणारी मलई अनेक भाषांमध्ये वेगवेगळ्या नावाने संबोधली जाते. संस्कृतमध्ये साय, सत्त्व या अर्थाचा ‘मण्ड’/’मंड’ शब्द आहे. हिंदी, गुजराती, पंजाबी या भाषांमध्ये त्याचं रूप ‘मलाई’ असं झालं. साय किंवा मलईमध्ये दुधाचं सत्त्व असतं. ती चविष्ट आणि पौष्टिक असते. या अर्थाने मलई खाणं, मलई मिळणं, मलई ओरबाडणं असे वाक्प्रयोग तयार झाले. लाच खाणं, नफा कमावणं या अर्थाने ते वापरले जातात. दंगा, बखेडा, बंड या अर्थानेही ‘मलई’ शब्द वापरला गेला आहे. या संदर्भात महाराष्ट्र शब्दकोशात पुढील वाक्य आहे – “कोळ्यांनी सन तिसांत मलई करून सरकारचा मुलुख खराब केला.’’ याच शब्दकोशात आणखी एक वाक्य आहे – “दक्षिणा घेतेवेळेस मलई केवढी!’’ इथं  गोंधळ, आरडाओरड, गडबड या अर्थाने मलई शब्द वापरल्याचं दिसतं. अरबी भाषेत ‘मला’ म्हणजे जमाव. अरबी-फारसीच्या मार्गाने हा शब्द मराठीत ‘मलई’ झाला.

‘मलई’ शब्दाचा दुसरा अर्थ आहे दांडगाई. सध्या या अर्थाने मलई शब्द मराठीत वापरला जात नाही. या अर्थाविषयी सांगताना पृ. पां. पुलकर्णी व्युत्पत्तिकोशात म्हणतात – ‘संस्पृतमध्ये सशक्त, पैलवान या अर्थाने मल्ल शब्द आहे. हा शब्द याच अर्थाने मराठी, बंगाली, हिंदी या भाषांमध्ये वापरला जातो. सिंहली भाषेत मल्ल म्हणजे रानवट (जंगली) असा अर्थ होतो. परंतु मल्ल हा मूळ शब्द द्राविड असून त्याचा संस्पृतमध्ये नंतर समावेश केला गेला. द्राविडी भाषांमध्ये मल, मल्ल किंवा मलय म्हणजे डोंगर, पर्वत. त्यावरून सिंहलीमध्ये रानवट हा अर्थ रूढ झाला. यासंबंधी मल्लारी किंवा मल्हारी हा शब्द चिंत्य आहे.’

खंडोबा हे महाराष्ट्राचं लोकदैवत आहे, त्याप्रमाणे आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातही खंडोबाचे उपासक आहेत. या खंडोबाचं एक नाव ‘मल्हारी’ आहे. या नावाची लोककथा अशी आहे – मल्ल नावाचा राक्षस लोकांना त्रास देत होता, त्यामुळे खंडोबाने त्याचा वध केला. मरताना त्याने खंडोबाला वरदान मागितले की, लोक तुला माझ्या नावाने ओळखू दे. त्यावरून खंडोबाला ‘मल्ल-अरि’ म्हणजे ‘मल्लचा शत्रू’ असं नाव पडल्याचं म्हटलं जातं. पण इथं सांगायचा मुद्दा हा आहे की, मल्लचा एक अर्थ रानवट, जंगली असाही आहे.

द्राविडी भाषांमध्ये ‘मलय’ म्हणजे पर्वत. याच अर्थाने केरळच्या लोकांना मल्याळी म्हटलं गेलं. अरबी प्रवाशांनी केरळच्या किनारपट्टीला ‘मलबार’ संबोधलं, यामागेही मलय म्हणजे पर्वतरांग हा अर्थ आहे. अरबी-फारसी भाषेत ‘बार’ हा शब्द किनारा, प्रदेश या अर्थाने वापरला जातो. मुंबईच्या दक्षिण टोकाला समुद्रकिनाऱ्याला लागून मलबार हिल आहे. हे ठिकाणही अर्थातच नावाप्रमाणे टेकडीवर वसलेलं आहे.

आता पुन्हा अण्णामलाईकडे येऊ. तामीळ भाषेत अण्णामलाई हे विशेष नाम आहे. तामीळमध्ये वडीलभावाला अण्णा म्हणतातच, पण त्याचा एक अर्थ महान, विशाल असाही आहे. डोंगरावर राहणारा देव या अर्थाने या नावाला भगवान शिवाच्या नावाचा संदर्भही जोडला गेला आहे.

[email protected]