अवतीभवती – दुर्मिळ वृक्षांचा जैवविविधता प्रकल्प

>> अभय मिरजकर

सामाजिक काम केवळ देणगी अशी मानसिकता असणाऱ्या सामाजिक, सेवाभावी संस्था सर्व ठिकाणी कार्यरत असल्याचे दिसून येते, पण आपण समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून काम करणाऱ्या काही संस्था आहेत. असे काम करणारी एक संस्था म्हणजे लातूर जिह्यातील शिवश्री फाऊंडेशन. वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे 11 एकर जागेवर 4200 पेक्षा अधिक वृक्ष लागवड करण्याचे काम त्यांनी केले आहे. मोफत नेत्र तपासणी शिबीर, मोफत नेत्र शस्त्रािढया, एवढेच नव्हे तर सेंद्रिय आणि जैविक शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे कामही यांनी केले आहे.

2012 मध्ये उल्हास डोलारे, शैलेश कुमदाळे, कृष्णकुमार पवार, अविनाश टेळे, गौरीशंकर माकणे, अमोल सगर, अॅड. प्रिया आगळे यांनी शिवश्री फाऊंडेशनची सुरुवात केली. आरोग्य, कृषी, शिक्षण, वन संवर्धन क्षेत्रात कार्य करण्याचे ठरवले. संस्थेचे काम सामाजिक कार्य करण्यासाठी करायचे हा निश्चय केला गेला. `शिवश्री वनराई प्रकल्पांतर्गत’ पाच ठिकाणी वनराई तयार करण्यात आल्या आहेत. 11 एकर क्षेत्रावर 4200 पेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. सह्याद्री देवराई, वन विभाग, देवराई फाऊंडेशन, श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था हासेगाव, देवंग्रा ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा, दाभा ता. कळंब यांच्या सहकार्याने हा उपाम राबविण्यात आला. हसेगाव येथे 120 प्रकारांच्या दुर्मिळ वृक्षांची लागवड अडीच एकरवर करून जैवविविधता प्रकल्प उभारण्यात आला आहे. `शिवश्री भूमिनायक प्रकल्पांतर्गत’ सेंद्रिय व जैविक शेतीसाठी शेतकऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. जिवामृत तयार करणे, गांडूळ खत निर्मिती, दशपर्णी अर्क निर्मिती या माध्यमातून 100 एकर क्षेत्रावर शेती सेंद्रिय पद्धतीने करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. शेतकऱ्यांनी स्वतसाठी सेंद्रिय शेती सुरू केली. याचे प्रमाण अल्प आहे, पण शेतकऱ्यांमध्ये विषमुक्त अन्न पिकवण्यासाठी जागृती करण्यात यश आले हे संस्थेचे यश आहे, अशी कृतज्ञाची भावना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यातील कोणतेही काम प्रसिद्धीच्या हव्यासातून केले नाही.

शिवश्री फाऊंडेशनने त्यांच्या कार्याद्वारे  समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका निभावली आहे.  हे काम नक्कीच एक आदर्श ठरू शकेल!