बोलीभाषेची समृद्धी – पावरा बोली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वर्णिका काकडे

पावरी बोलीभाषा ही पावरा समाजात महाराष्ट्रात बोलली जाणारी एक बोली भाषा आहे. आदिवासी जमाती पैकी पावरा ही एक महाराष्ट्रातील जमात आहे. महाराष्ट्रात इतरत्र कमी संख्येने असणारा हा समाज नंदुरबार, धुळे या जिह्यात जास्त संख्येने आढळून येतो. पावरा समाजाची ‘पावरा’ ही मुख्य बोली आहे. पावरी (किंवा पावरी) ही प्रामुख्याने महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे आणि पश्चिम खानदेशातील आदिवासी जमातीकडून बोलली जाणारी एक प्रमुख बोलीभाषा असून या भाषेवर मराठी, हिंदी, भिलोरी आणि राजस्थानी भाषांचा प्रभाव आहे. त्या त्या क्षेत्रांनुसार या समाजातील भिन्न रितीरिवाजांचे व त्यानुसार आनुषांगिक शब्दांचे वैविध्य या बोलीत आढळते.

प्रत्येक बोलीचे एक स्वतंत्र वैशिष्टय़ असते तसे पावरी बोलीचेही आहे ते म्हणजे या बोलीत शिव्यांचे प्रमाण अगदी नगण्य आहे. आदर्श कृषक संस्कृती असणारा हा समाज जो पाणी नसलेल्या भागतही नंदनवन फुलवू शकतो अशी याची ख्याती आहे. यामुळेच निसर्गाशी साध्यर्म सांगणारे अनेक शब्द या बोलीत आहेत.  या समाजात साधारण चार बोली बोलल्या जातात. ही प्रामुख्याने पावरी/पावरा समाजातील लोकांची संवादाची भाषा असून या बोलीला स्वतंत्र लिपी नाही. या बोलीमध्ये राठवी, पाल्या (पालवी), नायरी आणि बारी असे उप-प्रकार पाहायला मिळतात. पावरी बोलीमध्ये प्रामुख्याने सातपुडा परिसरातील आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडते.

ज्या भौगोलिक प्रदेशात भाषा बोलली जाते त्या प्रदेशाचा प्रभाव प्रत्येक बोलीभाषेवर झालेला दिसून येतो. आठ स्वर आणि 29 व्यंजने एवढय़ा कमी ध्वनी व्यवस्थेचा वापर पावरी बोलीभाषेत प्रचलित आहे. यात माटी – नवरा, रातलं – लाल, माजन – दुपार, वरहत – पावसाळा अशा अर्थाचे शब्द दिसून येतात. या पावरा आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण सुलभ व्हावे याकरिता काही वर्षांपूर्वी ‘पावरी भाषाकोश’ प्रसिद्ध झाला आहे.