
>> दिलीप जोशी
जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ, विश्वनिर्मितीसंदर्भात फ्रेड हॉयल यांच्यासह ‘स्थिर-स्थिती’ विश्वाचा सिद्धांत मांडणारे संशोधक, गुरुत्वाकर्षणासंबंधी महत्त्वाचे योगदान देणारे वैज्ञानिक आणि वडिलांप्रमाणेच गणित विषयात ‘रॅन्ग्लर’ पदवी प्राप्त करणारे प्रा. डॉ. जयंत विष्णू नारळीकर हे चतुरस्र व्यक्तिमत्त्व होते. कोल्हापूर, काशी, केम्ब्रिज, मुंबई आणि पुणे असा त्यांचा जीवनप्रवास मंगळवारी पुण्यात कायमचा थांबला. अतिशय बुद्धिमान आणि तितकेच विनम्र असणारे जयंतराव सर्वांशीच आपुलकीने वागत. एरवी मितभाषी असणारे, परंतु अभ्यासपूर्ण व्याख्यानातून श्रोत्यांना खिळवून ठेवणारे वक्ते म्हणूनही ते परिचित होते. घरात मराठी आणि संस्कृतच्या अभ्यासाचे वातावरण असल्याने या दोन भाषा त्यांना अवगत होत्याच, परंतु बनारस हिंदू विश्वविद्यालयात शिकल्याने त्यांचे हिंदी तसे इंग्लिशवरही प्रभुत्व होते. पुढे इंग्लंडमधल्या केम्ब्रिज या जगप्रसिद्ध विद्यापीठात संशोधनात्मक काम करताना त्यांना जगातील अनेक वैज्ञानिकांना अनुभवता आले. फ्रेड हॉयल यांच्यासह नारळीकर यांनी विश्वाच्या रचनेसंबंधी स्टेडी स्टेट (स्थिर-विश्व) सिद्धांत मांडला. मात्र नंतर विश्व प्रसरणशील असल्याचा सिद्धांत पुढे आल्यावर त्यांनी ‘क्वासी स्टेडी स्टेट थिअरी’ सिद्धांत मांडून विश्वातील द्रव्याची निर्मिती सतत होत असते असे प्रतिपादन केले. नंतरच्या काळात विश्वाचा प्रसरणशीलतेचा सिद्धांत (बिग बॅन्ग) सर्वमान्य होऊ लागला. गुरुत्वाकर्षणासंबंधीच्या हॉयल-नारळीकर सिद्धांताला ‘कन्फॉर्मल’ सिद्धांत म्हटले जाते. या सर्व गहन वाटणाऱ्या गोष्टी सर्वसामान्यांना प्रा. नारळीकर सोप्या शब्दांत सांगण्याचा प्रयत्न करत. अगदी विद्यार्थ्यांनाही विज्ञानातील, विशेषतः खगोलशास्त्रातील गोष्टी सांगून त्यांच्याशी संवाद साधत. गणित आणि भौतिकशास्त्र असे क्लिष्ट वाटणारे विषय मोजक्या शब्दांत श्रोत्यांसमोर रंजकपणे मांडत असत.
प्रा. नारळीकर सरांना भेटण्याची पहिली संधी मिळाली ती ‘स्टार वॉर्स’ नावाचा अंतराळविषयक भव्य चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला तेव्हा. तिथे विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची आणि वैज्ञानिक संस्थांमधल्या मंडळींची खूप गर्दी झाली होती. डॉ. नारळीकर हे नाव त्यांच्या संशोधनामुळे आणि सर्वदूर प्रसिद्धीमुळे ठाऊक होतेच. आचार्य अत्रे यांनी ‘मराठा’ दैनिकातून तरुण नारळीकरांचा उचित गौरव केलेला स्मरणात होता. वयाच्या अवघ्या पंचवीशीत 1995 मध्ये ‘पद्मभूषण’ गौरव प्राप्त करणारे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ म्हणून मराठी माणसांना साहजिकच विशेष अभिमान होता. डॉ. नारळीकर यांचे मित्र आणि ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. शशीपुमार चित्रे यांना एकत्र भेटण्याचाही योग एका खगोल परिषदेत आला.
त्यानंतर आमच्या ‘खगोल मंडळा’ची स्थापना झाल्यावर प्रा. नारळीकर यांची भेट आम्ही ‘आयुका’ या प्रसिद्ध संस्थेत घेतली. केम्ब्रिजहून मुंबईला परतल्यावर प्रा. नारळीकर यांनी मुंबईच्या ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ पिंवा ‘टीआयएफआर’मध्ये वैज्ञानिक म्हणून काम केले आणि नंतर याच संस्थेतर्फे त्यांच्यावर पुणे येथे ‘इन्टर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अॅण्ड अॅस्ट्रॉफिजिक्स’ (आयुका) या संस्थेची जबाबदारी आली. ही संकल्पनाच डॉ. नारळीकर सरांची होती. आज ही संस्था जागतिक खगोल संशोधन क्षेत्रात महत्त्वाची गणली जाते. 2014 मध्ये
प्रा. नारळीकर यांची शेवटची भेट झाली. त्या वेळी मुंबईतील सध्या महाविद्यालयाच्या सहयोगाने आम्ही प्रा. नारळीकरांची विस्तृत जाहीर मुलाखत घेतली आणि नंतर प्रश्नोत्तरेही झाली. त्या वेळी ते अमृत महोत्सवी वर्षात होते. त्याच कार्यक्रमात आमच्या सभासदांनी घेतलेला अॅन्ड्रोमीडा (देवयानी) दीर्घिकेचा पह्टो आम्ही त्यांना दिला. शिल्पकार सिद्धार्थ साठे यांनी मुलाखतीच्या दरम्यानच त्यांच्या चेहऱ्याचे उत्कृष्ट शिल्प साकारले.
गेल्या काही वर्षांत त्यांची प्रकृती ठीक नव्हती. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही ते उपस्थित राहू शकले नव्हते. पत्नी मंगलाताईंच्या जाण्यानंतर तर त्यांच्या जीवनात पोकळी निर्माण झाली. अधूनमधून त्यांच्या विषयी समजायचे. महिनाभरापूर्वीच ‘आयुका’चे भूतपूर्व संचालक पेंभावी यांची भेट झाली तेव्हा त्यांनी नारळीकर अजूनही कधी-कधी आयुकामध्ये येतात असे सांगितले होते. त्यानंतर इतक्या लवकर प्रा. नारळीकरांच्या जाण्याची बातमी येईल असे वाटले नव्हते. त्यांच्या जाण्याने देशातील एक महत्त्वाचा खगोलशास्त्र्ाज्ञ हरपला आहे. पद्मविभूषण (2004) आणि महाराष्ट्र भूषण (2010) गौरवप्राप्त प्रा. नारळीकर यांना विनम्र आदरांजली.