लेख – विद्युत वाहनांचे चार्जिंग – दुर्घटना आणि उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> महेश शिपेकर

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये इलेक्ट्रिक वाहनाच्या चार्जिंग पॉइंटमध्ये झालेल्या स्पह्टामध्ये एका कुटुंबातील सात जण ठार झाल्याची दुर्घटना गेल्या महिन्यात घडली होती. या घटनेनंतर विद्युत वाहनांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता. पर्यावरणपूरक आणि भविष्याचे साधन म्हणून या वाहनांकडे पाहिले जात असले तरी सातत्याने घडणाऱ्या आगीच्या घटनांनी सर्वसामान्यांच्या मनात भीती घर करू लागली आहे. केवळ सामान्य दुचाकीच नव्हे, तर कोटय़वधी रुपयांच्या लक्झरी स्पोर्टस् कारही या आगीतून सुटलेल्या नाहीत, ही बाब अधिक चिंताजनक आहे.

मध्यंतरी इंदूरमधील टिळकनगर भागातील ब्रजेश्वर अॅनेक्स कॉलनीत मनोज पुगलिया यांच्या घरात घडलेल्या भीषण अग्निकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील आठ सदस्यांचा होरपळून मृत्यू झाला. प्राथमिक तपासानुसार, घराबाहेर चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक कारमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका उडाला. या घटनेने ईव्ही बॅटरी आणि चार्जिंग यंत्रणेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आल्या असून, ईव्ही तंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेबाबत अनेक मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या तंत्रज्ञानाचा प्रसार ज्या वेगाने होत आहे, त्या तुलनेत त्यांच्या तांत्रिक सुरक्षिततेचे निकष आणि वापरकर्त्यांची जागरुकता यांमधील दरी रुंदावत चालली आहे, हे इंदूरमधील घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. ही दुर्घटना या क्षेत्रातील तांत्रिक त्रुटींकडे आणि सुरक्षेच्या अपुऱ्या मानकांकडे निर्देश करणारी आहे.

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या लिथियम आयन बॅटरीचे स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे असते. या बॅटरीमध्ये ऊर्जेची घनता प्रचंड असते आणि जेव्हा या ऊर्जेचे रूपांतर उष्णतेमध्ये होते, तेव्हा ‘थर्मल रनअवे’ नावाची प्रक्रिया सुरू होते. यामध्ये बॅटरीमधील एक सेल गरम झाला की तो शेजारील सेल्सनाही उष्ण करतो आणि साखळी अभिक्रिया सुरू होऊन काही सेपंदातच भीषण स्पह्ट होतो. इंदूरमधील घटनेत पहाटेच्या वेळी कार चार्जिंगला लावली असताना बॅटरी किंवा चार्जिंग पॉइंटमध्ये स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की घराच्या दरवाजांना बसवलेली आधुनिक ‘डिजिटल लॉक्स’ यंत्रणा निकामी होऊन जाम झाली, ज्यामुळे आत अडकलेल्या कुटुंबाला बाहेर पडणे अशक्य झाले. तंत्रज्ञानातील ही प्रगतीच त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा ठरली. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या हाताळणीत झालेली थोडीशी चूकही जिवावर बेतू शकते, हे आता स्पष्ट झाले आहे.

तांत्रिकदृष्टय़ा पाहिले तर, इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेसाठी ‘बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम’ म्हणजेच बीएमएस हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. ही यंत्रणा बॅटरीचे तापमान, व्होल्टेज आणि करंट यावर सतत लक्ष ठेवून असते. जर चार्ंजगदरम्यान बॅटरी मर्यादेपेक्षा जास्त गरम झाली, तर बीएमएसने आपोआप वीजपुरवठा खंडित करणे अपेक्षित असते. मात्र, अनेकदा स्वस्त आणि निकृष्ट दर्जाच्या बीएमएसचा वापर केल्यामुळे अशा सुरक्षा यंत्रणा निकामी ठरतात.

भारतासारख्या उष्ण हवामानाच्या देशात बॅटरीचे तापमान नियंत्रित ठेवणे हे मोठे आव्हान आहे. उन्हाळ्यात बाहेरील तापमान 45 अंशांच्या पुढे जाते, अशा वेळी बॅटरी चार्ज करताना निर्माण होणारी अंतर्गत उष्णता जर बाहेर पडली नाही, तर स्पह्टाचा धोका पैक पटीने वाढतो. म्हणूनच, वाहनांची बांधणी करताना बॅटरी पॅकमध्ये योग्य ‘कूलिंग सिस्टीम’ असणे अनिवार्य आहे. पण अनेकदा खर्च वाचवण्यासाठी याकडे दुर्लक्ष केले जाते.

सुरक्षिततेच्या दृष्टीने दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, चार्जिंगसाठी वापरले जाणाऱ्या पायाभूत सोयीसुविधा आणि घरांची वायरिंग. बहुतेक नागरिक आपल्या इलेक्ट्रिक कार किंवा दुचाकी चार्ज करण्यासाठी घरातील साध्या सॉकेटचा वापर करतात. मात्र, इलेक्ट्रिक वाहनांना लागणारा विद्युत प्रवाह हा घरातील इतर उपकरणांच्या तुलनेत खूप जास्त असतो. जर घरातील वायरिंग जुनी असेल किंवा वायरची क्षमता कमी असेल तर शॉर्ट सर्किट होण्याचा धोका सर्वाधिक

असतो. इंदूरमधील घटनेत चार्जिंग पॉइंटमध्ये झालेला स्फोट तेथील विद्युत जोडणी या वाहनाच्या भारासाठी सक्षम नव्हती असे दर्शवणारा आहे. सरकारने ई-वाहन धोरण राबवताना प्रत्येक इमारतीत किंवा सोसायटय़ांमध्ये स्वतंत्र आणि सुरक्षित ‘इलेक्ट्रिक व्हेईकल सप्लाय इक्विपमेंट’ म्हणजेच ईव्हीएसई बसवणे अनिवार्य करायला हवे होते. वापरकर्त्यांच्या स्तरावरही सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

विद्युत वाहनांमधील आगीच्या घटनांच्या मुळाशी जाण्यासाठी सरकारने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ), भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) बंगळुरू आणि नेवल सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल लॅबोरेटरी (एनएसटीएल)मधील स्वतंत्र तज्ञांची एक समिती स्थापन केली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालात अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. तज्ञ समितीच्या शिफारसींनंतर रस्ते वाहतूक मंत्रालयाने ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्डस्मध्ये कडक बदल केले आहेत. ईव्ही बॅटरीसाठी ‘एआयएस-156’ आणि ‘एआयएस-038’ ही सुधारित मानके अनिवार्य करण्यात आली आहेत. या नियमांनुसार, आता बॅटरी पॅकची रचना अधिक सुरक्षित असणे बंधनकारक आहे. यामध्ये ‘स्मार्ट बीएमएस’चा वापर करणे, बॅटरीचे तापमान ठराविक मर्यादेच्या वर गेल्यास चालकाला इशारा देणे आणि स्वयंचलितपणे वीजपुरवठा खंडित करणे यांसारख्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. तसेच, बॅटरीमधील प्रत्येक सेलला आता ‘युनिक आयडेंटिफिकेशन नंबर’ असणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणत्याही बिघाडाची जबाबदारी निश्चित करता येईल. याव्यतिरिक्त, सरकारने ‘कन्फॉर्मिटी ऑफ प्रोडक्शन’ नियम लागू केले आहेत. यामुळे प्रत्येक उत्पादित वाहन ठरवून दिलेल्या सुरक्षा मानकांनुसारच बनवले जाईल याची खात्री केली जाते. बहुतांश कंपन्या या नियमांचे पालन केले जात असल्याचा दावा करतात; पण नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईनकडे प्राप्त झालेल्या तक्रारींमधून हे स्पष्ट होते की, ग्राहक केवळ आगीबाबतच नव्हे, तर ईव्हीच्या एकूण कामगिरीबद्दलही साशंक आहेत. बॅटरीचे आयुष्य कमी होणे, चार्जिंगला जास्त वेळ लागणे आणि तांत्रिक मदतीचा अभाव यांमुळे ईव्ही क्रांतीला काही प्रमाणात खीळ बसताना दिसत आहे.

बॅटरीमधील सेल्सची गुणवत्ता तपासण्यापासून ते प्रत्यक्ष वाहन रस्त्यावर येईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर कडक तपासणी होणे आवश्यक आहे. विशेषतः जुन्या वाहनांच्या बॅटरी जेव्हा निकामी होतात, तेव्हा त्यांची विल्हेवाट लावण्याची किंवा त्या बदलण्याची प्रक्रिया सुलभ आणि सुरक्षित असायला हवी. आपण जागतिक मानकांनुसार सुरक्षितता सुनिश्चित केली नाही, तर अशा दुर्घटनांमुळे सर्वसामान्यांचा या पर्यावरणाभिमुख तंत्रज्ञानावरील विश्वास कायमचा उडू शकतो. इंदूरची घटना ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाहीये. ई-वाहन उद्योगाने याबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तंत्रज्ञान आणि नियम या दोन्ही आघाडय़ांवर युद्धपातळीवर काम करावे लागेल. प्रत्येक चार्ंजग स्टेशनवर अग्निशमन यंत्रणा आणि स्वयंचलित वीज खंडित करणारी यंत्रणा बसवणे कायद्याने बंधनकारक करायला हवे. तसेच, दाट वस्तीत किंवा रहिवासी इमारतींच्या तळघरात चार्जिंग करताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिक वाहने हे वरदान ठरायचे असतील, तर त्यातील ‘अदृश्य धोके’ ओळखून त्यावर तांत्रिक उपाय शोधणे हाच एकमेव मार्ग आहे. सुरक्षितता ही तडजोड करण्याची बाब नसून, ती कोणत्याही तंत्रज्ञानाचा अविभाज्य भाग असायला हवी, तरच आपण शाश्वत भविष्याकडे वाटचाल करू शकू.
(लेखक वाहन उद्योग अभ्यासक आहेत)