
>> महेश उपदेव
अनेक आंतरराष्ट्रीय धावपटू घडवून नागपूरचे नाव आंतरराष्ट्रीय नकाशावर चमकवणारे आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स प्रशिक्षक एस. जे. अँथोनी यांचे नुकतेच निधन झाले. दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते स्व. भाऊ काणे व अँथोनी सरांनी अतिशय प्रतिपूल परिस्थितीवर मात करून मातीच्या ट्रकवर खेळाडू घडवून नागपूरला देशात मोठा बहुमान मिळवून दिला. गेल्या वर्षी भाऊ काणे सोडून गेले आणि आता अँथोनी सर गेले. रेशीमबाग मैदानावर सर हातात स्टॉप वॉच घेऊन खेळाडूंच्या बरोबर त्यांच्याकडून सराव करून घेताना मी बऱयाच वेळा बघितले. त्यांच्यासोबत उमेश नायडू असायचे. गरीब घरातून आलेल्या शेकडो होतकरू विद्यार्थ्यांना व खेळाडूंना घडविण्याचे काम अँथोनी सरांनी केले आहे. हे कार्य नागपूरकर कधीच विसरू शकत नाहीत. 75 वर्षांपर्यंत ते खेळाडूंच्या विकासाकरिता झटत होते. ते नागपूर जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे कार्याध्यक्ष होते. रोहिणी आणि मोनिका राऊत या दोन आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना त्यांनी प्रशिक्षण दिले होते. याशिवाय वैशाली फटिंग, रश्मी फटिंग, विजया सोनवणे, वसुधा मोरे, माधुरी आणि रश्मी गुरनुले यांसारख्या राष्ट्रीय पदक विजेत्या आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हिंदुस्थान संघाचे प्रतिनिधित्व करणाऱया खेळाडूंना घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. वैशाली फटिंग आणि विजया सोनवणे या त्यांच्या दोन शिष्यांना शिवछत्रपती पुरस्कार देऊन राज्य शासनाने सन्मानित केले आहे. रेशीमबाग मैदान म्हणजे अँथोनी सर असं एक समीकरण झालं होतं. 8 नोव्हेंबर 1950 रोजीचा जन्म असलेले सिद्धार्थसेन अँथोनी हे ‘तंबी’ नावाने लोकप्रिय होते. हँडबॉल आणि अॅथलेटिक्स हे दोन त्यांचे आवडते खेळ होते. पुढे मात्र त्यांनी अॅथलेटिक्स खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी स्वतःला वाहून घेतले. एमएसईबी येथे इंजिनीअर म्हणून आपल्या सेवाकाळात एक उत्पृष्ट थाळीफेक आणि गोळाफेकपटू म्हणून त्यांची ख्याती होती. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पूर्णवेळ रेशीमबाग मैदानावर तळागाळातील खेळाडूंना शोधून त्यांचे पैलू पाडण्यासाठी आपले उर्वरित आयुष्य खर्च केले. दहा-बारा वर्षांपूर्वी रेशीमबाग मैदानावर त्यांच्या चाहत्यांनी ते सेवानिवृत्त होताच मोठा सत्कार समारंभ आयोजित केला होता. नागपूर जिह्यात संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणून ते पालकांच्या भूमिकेत सदैव राहायचे. महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेचे महासचिव सतीश उचील यांनी आपल्या शोक संवेदना यांच्याप्रति व्यक्त केल्या आहेत. नागपूर जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष गुरुदेव नगराळे, सभापती उमेश नायडू आणि एस. जे. अँथोनी सर असं त्रिपूट अॅथलेटिक्सच्या भरभराटीसाठी गेल्या वीस वर्षांपासून झटत होते. गरीब मुला-मुलींना अॅथलेटिक्सकडे वळवून पुढे त्यांच्या नोकरीसाठी प्रयत्न करणे, वेळप्रसंगी त्यांच्या आहारासाठी आणि प्रवासाकरिता पैशाची मदत करत राहणे, असा सरांचा स्वभाव होता. पुठलाही मोठेपणा मनात न आणता ते रेशीमबाग मैदानावरील दगड आणि खिळे खेळाडू मैदानावर येण्यापूर्वी उचलून ठेवत असत, जेणेकरून खेळाडूंना धावताना त्याचा त्रास होऊ नये, असे त्यांना वाटत असे, अशी आठवण या भागाचे माजी नगरसेवक आणि जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष नागेश सहारे यांनी सांगितली. सरांच्या निधनाने विदर्भातील अॅथलेटिक्सची खूप मोठी हानी झाली आहे. ती भरून काढणे अशक्यप्राय आहे, अशी भावना जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव आणि पूर्व आंतरराष्ट्रीय खेळाडू डॉ. शरद सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.
अनेक राष्ट्रीय स्तराचे खेळाडू घडविणाऱया अँथोनी सरांचा राज्य शासनाने यथोचित सन्मान करायला हवा होता; पण ते कार्य शासनाच्या वतीने होऊ शकले नाही. त्यांनी राज्य शासनाच्या श्री छत्रपती पुरस्काराकरिता अर्ज केला नाही. खेळाडूंनी आग्रह केला तरी केला नाही. माझे काम हेच माझे समाधान आहे असे ते म्हणायचे. अँथोनी सरांच्या कार्याला सलाम!