
>> मनमोहन रो. रोगे
जगाला ‘गीते’मधून अतुलनीय असे तत्त्वज्ञानाचे पाठ देणाऱया आणि बालपणी गोपुळात राहिलेल्या भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस ‘जन्माष्टमी’ वा ‘गोपुळाष्टमी’ म्हणून मोठय़ा उत्साहात, भक्तिभावाने साजरा होतो. श्रद्धाळू माणसे, कृष्ण भक्त जन्माष्टमीला उपवास करतात. बाळपृष्णाला गोरस प्रिय म्हणून उपवास करणारी माणसे त्यादिवशी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करत नाहीत. अगदी घरोघरी नसले तरी ठिकठिकाणी बाळपृष्णाच्या मूर्तीची पूजा केली जाते. दुसऱया दिवशी श्रीकृष्णाच्या बाललीलांचे स्मरण म्हणून दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.
भगवान श्रीकृष्ण जन्मानंतर वयाच्या नऊ-दहा वर्षांपर्यंतच गोपुळात नंद यशोदेच्या घरी राहिले. तिथेच त्यांनी आपल्या वयाचे, किंचित मोठे सवंगडी जमवून बाललीला केल्या. हे करत असताना त्यांनी इंद्राचे गर्वहरण, गोवर्धन पूजा आणि पर्वत करंगळीवर उचलणे, पुतनाचा वध, कालिया मर्दन असे कित्येक प्रसंग तमाम गोपुळवासीयांच्या सुखासाठी, हक्कासाठी करून त्यांनी सर्वांची मने जिंकून त्यांच्यात जागृती निर्माण केली ती सर्वांनाच शिकवण देणारी आहे. गोपुळात दूध आणि तत्सम पदार्थ विपुल असल्याने त्याची साठवण, व्यापार केला जात असे. त्याचाच भाग म्हणून दूध, दही, लोणींची मडकी मांजरा व उंदरापासून सुरक्षित आणि घरातील माणसांच्या दैनंदिन कामात अडथळा ठरू नये म्हणून घरात उंच जागी टांगून ठेवली जात. आता ती घरातच टांगून ठेवली जात म्हणजे सात-आठ-दहा फुटांपेक्षा जास्त उंचावर नसावीत. पण आम्ही मात्र आता तीच दहीहंडी 80 ते 90 फूट उंच टांगून तो खेळाचा प्रकार जीवघेणी स्पर्धा म्हणून खेळू लागलोय. दरवर्षी दहीहंडी उत्सवानंतर एखाद-दुसऱया गोविंदाचा बळी गेल्याची व कित्येक गोविंदा जायबंदी, तर काही कायम अपंग झाल्याच्या बातम्या ऐकतो किंवा वाचतो तरी त्यातून बोध न घेता दरवर्षी उत्सव आणखी जीवघेणा कसा होईल हे पाहतो. आपला समाज आणि समाजाचे नेतृत्वच जर अशा प्रकाराचे चुकीच्या पद्धतीचे उदात्तीकरण करत असतील
तर मग अशा प्रकारांना आळा कसा बसणार?
श्रीकृष्णाने छंद म्हणून बासरी वाजवली आणि त्यात प्रावीण्य मिळवले. त्याच्या बासरीने माणसेच नव्हे तर गाई-गुरे, पक्षी, झाडे मुग्ध होत असत, पण म्हणून तो आयुष्यभर मुरलीच वाजवत राहिला का? आम्ही मात्र त्याची इतर कामे, इतर रूपे विसरलो. त्याने वेळोवेळी आपल्या शत्रूंना ठार करण्यास, तर कधी सत्यासाठी शस्त्र हाती घेतले. तो मुरलीधर कमी आणि ‘चक्रधर’ म्हणून जास्त वावरल्याचे लक्षात येते, पण आम्ही त्यांचे ते रूप विसरलो आणि मुरलीधराची पूजा सुरू केली. बाल मुकुंद इतर मुलांसह गाई-गुरांची सेवा, देखभाल करत असल्याने तो ‘गोपाल’ झाला. त्याने पेंद्यासारख्या अपंग मुलास आणि सुदाम्यासारख्या गरीब मुलासही आपल्या सोबत घेऊन तो ‘दीनबंधू’ झाला. हे समानतेचे उदाहरण नाही का? पुढे नरकासुराच्या कैदेतून मुक्त केलेल्या सोळा सहस्र महिलांना त्यांच्या घरच्यांनी स्वीकारले नाही तेव्हा त्यांची जबाबदारी घेऊन भगवान श्रीकृष्ण ‘अनाथांचा नाथ’, ‘दीनानाथ’ झाले. त्यांनी समाजाची तमा केली नाही. आपण या प्रसंगातील मर्म न जाणताच ते स्त्रियांमध्ये रमणारे होते असे पूर्णतः चुकीचे चित्र उभे केले. भगवान श्रीकृष्णांनी जीवनात कर्तव्य श्रेष्ठ मानले म्हणूनच ते कधी एका जागी गुंतून पडले नाहीत. ज्या वेळेस जे जे करणे योग्य होते ते ते त्यांनी अग्रक्रमाने केले. आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना उन्मत, अत्याचारी कंस राजाच्या बंदीखान्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी आपल्या सख्ख्या मामास ठार करण्यास मागे-पुढे पाहिले नाही. जरासंध, जयंद्रथांसारखे दुष्ट पुकर्मी ठार करण्यासाठी त्यांनी भीमसेन आणि अर्जुनाला लागेल ती मदत केली. दुष्ट व अनाचारी दुर्योधन, दुःशासन आणि त्यांना साथ देणारे इतर कौरव, तसेच त्यांचा अतिकपटी शपुनी मामा आणि त्यांना साथ देणारे कर्ण, गुरू द्रोणाचार्य, पितामह भीष्मादींना त्यांच्या चुकीची शिक्षा देण्यासाठी व सत्याच्या विजयासाठी मधुसूदन पांडवांच्या पाठी ठाम उभे राहिले. जीवनात परिस्थितीनुरूप वागावे लागते, सगळे दिवस सारखे नसतात याची शिकवणच त्यांनी या प्रसंगातून दिली.
आपण श्रीकृष्ण चरित्रातील असे प्रेरणादायी प्रसंग विसरून चक्रधरऐवजी मुरलीधराची, राजा कृष्णाऐवजी राधाकृष्णाची पूजा सुरू केल्यानेच भगवान श्रीकृष्ण समजून घेण्यात चूक केली किंवा करत आहोत. आतातरी सत्याच्या बाजूने, धर्माच्या बाजूने असणारे, दुष्टांना माफी नव्हे तर मृत्यू देणारे भगवान श्रीकृष्ण ओळखून त्यांच्यापासून प्रेरणा घेऊ.