प्रासंगिक – पवित्र श्रावण मास आणि महत्त्व

>> मनमोहन रो. रोगे

वर्षातील बारा मासात श्रावण मासाचे महत्त्व अद्वितीय असे आहे. एकतर रणरणत्या उन्हाच्या काहिलीतून नुकत्याच सुरू झालेल्या पावसाने अवघ्या सजीवांची सुटका केलेली असते. सुष्क-ओसाड भूमी सारी हिरवीगार झालेली दिसते. शेतकरीही नांगरणी-पेरणी करून थोडेसे निवांत झालेले असतात आणि पावसाळ्यात (पूर्वी) मासेमारी पूर्ण बंद असते. या व अशा अनेक गोष्टींचा विचार करून आपल्या पूर्वजांनी या महिन्यात काही सणांची निर्मिती केली असावी काय असा विचार मनात येतो. नेहमी मांसाहार करणाऱ् यांनी या महिन्यात तो करू नये, सात्विक आहार करावा… तसे केल्याने, उपवास केल्याने पुण्य लाभते असे सांगितले गेले. म्हणूनच या महिन्यात आता प्रमाण कमी झाले असले तरी पूर्वी अनेक मंदिरांमध्ये व काहींच्या घरी ‘पांडव प्रताप’, ‘हरिविजय’, ‘शिवपुराण’ व इतर ग्रंथांचे वाचन केले जात असे. ते ऐकण्यास अनेक भाविक त्या त्या मंदिरांत – घरात जमत होते.

श्रावण सोमवार, शनिवारचे उपवास बहुसंख्य भाविक आताही करतात. पूर्वी श्रावण सोमवारी सरकारी कार्यालयातून खास उपवासवाल्यांना अर्धा दिवस रजासुद्धा मिळायची. आमच्या बालपणी अविवाहित मुली श्रावण शुक्रवारचा उपवास करत असत. श्रावण महिन्यात कित्येकांच्या घरी श्री सत्यनारायणाची पूजा केली जाते. एकूणच या महिन्यात आचार-विचार-वर्तन हे सात्विक ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. वातावरणात आनंद नि मांगल्य भासते. हे या महिन्यातच घडते.

याच महिन्यात पहिला सण येतो तो म्हणजे ‘नागपंचमी’. साप चावल्याने माणूस मरतो म्हणून माणसे साप मारतात. पण तेच साप शेतीचा नाश करणाऱया उंदरांचा नाश करून शेती वाचवतात, अनेक उपद्रवी कीटकांचा नायनाट करतात. याशिवाय जवळपास 80 टक्क्यांपेक्षा जास्त जातीचे साप हे बिनविषारी असतात. म्हणून ते मारता कामा नयेत हे जाणून पूर्वजांनी सापाचे महत्त्व जाणून ‘नागपंचमी’चा सण सुरू केला.

दुसरा सण ‘नारळी पौर्णिमा’. या सणाला मासेमारी करणारे बांधव समुद्राची पूजा करून समुद्रास श्रीफळ अर्पण करून समुद्राप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करतात व पावसाळ्यात बंद झालेल्या मासेमारीच्या व्यवसायाला हळूहळू सुरुवात करतात. दुसऱया दिवशी बहीण भावाच्या प्रेमाचा ‘रक्षाबंधन’ हा सण साजरा होतो.

याच महिन्यात सर्वांनाच भुरळ घालणाऱया मनमोहक, गोपाळ कृष्णाचा जन्म. ज्याने जगास ‘गीता’सारखा अद्वितीय ग्रंथ दिला ज्याच्या तत्त्वज्ञानाला जगी तोड नाही. त्या मनमोहनाचा जन्मोत्सव म्हणून ‘जन्माष्टमी’ साजरी केली जाते आणि दुसऱया दिवशी श्रीकृष्णासोबत त्याचे सवंगडी जे नाना प्रकारचे खेळ खेळत त्याची आठवण म्हणून ते खेळ खेळले (गावी) जातात व नंतर उंचावरील (गगनचुंबी नव्हे) दहीहंडी पह्डली जाते. मुंबई-ठाण्यासारख्या शहरांमध्ये इतर खेळ न खेळता फक्त ऐंशी-नव्वद फूट उंच दहीहंडी बांधून खेळली जाते. त्यात अनेक जण जायबंदी, अपंग होतात.

श्रावणात बरेच मांसाहारी मांसाहार वर्ज्य करून शाकाहारी होतातच, पण श्रावणाची खरी कमाल वाटते ती मद्यपींची. अनेक मद्यपी या महिन्यात मदिरेला स्पर्श करत नाहीत. येरवी आई-बाप, पत्नी-मुले रोज विनवण्या करूनही त्यांना न जुमानता मदिरा प्राशन करतात असे कितीतरी लोक श्रावणात स्वयंस्फूर्तीने मदिरा त्यागतात. हे त्यांच्या कुटुंबियांना कोणत्याही सणापेक्षा कमी वाटत असेल काय? याहून श्रावणाचे पावित्र्य दुसरे आणखी काय सांगणार? ज्या घरात महिन्याचे तीस दिवस क्लेश, तंटे-बखेडे असतात अशा घरात फक्त श्रावण महिन्यात सुख, शांतता, आनंद नांदतो ही श्रावण महिन्याची सर्वात मोठी थोरवी आहे.