साय-फाय – 2023 चाहूल नव्या तंत्रज्ञानाची

>> प्रसाद ताम्हनकर

2022 हे वर्ष जवळपास सर्वच उद्योगांसाठी मोठय़ा चढ उताराचे गेले. ह्या काळात तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक क्षेत्रात मोठया प्रमाणावर वाढला. विविध कामांसाठी लोक संगणक आणि मोबाइलवर विसंबायला लागले आहेत, ती जणू माणसाची गरज बनत चालली आहे. येणाऱया काळात अनेक क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान मोठी भरारी घेणार आहे आणि उद्योगांना अधिक सुरक्षा, सुरळीतपणा प्रदान करणार आहे. यामध्ये कृषी आणि शिक्षण ही दोन क्षेत्रं विशेष महत्त्वाची ठरणार आहे.

शिक्षण क्षेत्रासाठी 2022 हे साल प्रचंड त्रासाचे ठरले आहे. लहानग्यापासून ते पदवीची तयारी करत असलेल्या आणि उच्च शिक्षणासाठी कष्ट घेत असलेल्या अनेकांच्या शिक्षणावर प्रचंड ताण पडला. अनेकांचा शिक्षणाची तर दिशा बदलली. अशावेळी 2023 सालात ह्या क्षेत्रात काही फार मोठे बदल घडण्याची शक्यता आहेत.

हायब्रिड लर्निंग : अर्थात संमिश्र शिक्षण पद्धती मोठय़ा प्रमाणावर राबवली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींचा अवलंब करण्यात येईल.

ऑनलाईन डिग्री : अनेक विद्यापीठांमध्ये ऑनलाईन डिग्री आणि सर्टिफिकेशन (Certifications)चे कोर्सेस सुरू होण्याची शक्यता आहे. हे कोर्स पूर्णवेळ कोर्सच्या बरोबरीचे असतील.

कोरोना काळात विविध ऑनलाईन लर्निंग अॅप्सला मिळालेला प्रतिसाद बघता, अनेक मोठया टेक कंपन्या ह्या क्षेत्रात उतरण्याची शक्यता आहे.

शाळा आणि विद्यापीठे ऑनलाईन परीक्षांवर भर देतील आणि अशावेळी करतील. अर्थात आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या मदतीने ह्या परीक्षांचे आयोजन करणे या प्रक्रियेला सुरक्षा पुरवणे यासाठी तंत्रज्ञान अधिक प्रगतीकडे धाव घेईल.

कृषी क्षेत्राचा विचार केला, तर ह्या क्षेत्रातले तंत्रज्ञान प्रचंड वेगाने बदलत जाणार आहे आणि शेतकऱयांसाठी अधिक सोयीचे, सुलभ आणि कमी खर्चात उपलब्ध होणारे बनत जाईल.

अगदी सहजपणे ड्रोनच्या माध्यमातून बियाणांची पेरणी, कीटकनाशकांची फवारणी करणे शक्य होईल. त्यासाठी गरजेचा असलेला ड्रोन आणि त्याचे तंत्रज्ञान आवाक्यात असणाऱया किमतीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कदाचित त्यासाठी अनुदान देखील उपलब्ध होईल.

जमिनीची तपासणी अधिक प्रगत तंत्रज्ञानाने करता येईल आणि सदर जमिनीसाठी कोणती पिके योग्य राहतील ह्याची माहिती शेतकरी त्वरित मिळवू शकेल.

बायोइंजिनिअरींग कृषी क्षेत्रासाठी अत्यंत लाभदायक ठरणार असून त्या जोडीला Aघ् अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने पिकांचे संगोपन, पाण्याचे व्यवस्थापन, पिकावर पडणाऱया रोगांचा मुकाबला, योग्य प्रमाणात कीटकनाशकाची योग्य वेळात फवारणी ह्या सर्व महत्त्वाच्या कामांसाठी शेतकऱयाला योग्य वेळी योग्य ती मदत पोहोचवली जाणे शक्य होईल.

पिकासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणात प्रकाश, आर्दता, जमिनीचा कस कसा उपलब्ध करून देता येईल ह्यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान कार्यरत होण्याची शक्यता आहे. ह्यामुळे अनियमित वातावरणात देखील सुरक्षित शेती करणे शक्य होणार आहे.

या प्रमुख बदलांच्या बरोबर आपल्या सामान्य आयुष्यात देखील काही तंत्रज्ञान महत्त्वाचे बदल घडवणार आहे. युरोपियन युनियनच्या धर्तीवर ’कॉमन चार्ंजग पोर्ट’ची मागणी आपल्या देशात देखील जोर धरू लागली आहे. ती मान्य झाल्यास सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक डिव्हाइसेसला एकाच प्रकारचे चार्ंजग पोर्ट असतील आणि आपली सर्वात मोठी अडचण दूर होईल. ‘सुपर अॅप इकोसिस्टिम’ हे नवे तंत्रज्ञान देखील हाकेच्या अंतरावर पोहोचले आहे. ह्या तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योगांना एकच व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

आजवर फक्त संगणक आणि गेमिंग कन्सोलसाठी उपलब्ध असणारे ’रे ट्रेसिंग’ (Ray Tracing) तंत्रज्ञान आता मोबाइलसाठी देखील उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मोबाइलवर गेम खेळतानादेखील अधिक ’जिवंतपणाचा’ अनुभव खेळाडूला घेता येणार आहे. थोडासा वेगळा पण एक महत्त्वाचा कायदा देखील तंत्रज्ञान क्षेत्रात येण्याची शक्यता आहे आणि तो म्हणजे ‘Right to Repair’. या कायद्याच्या मदतीने तुमच्या उपकरणाची स्मार्टपह्न, संगणक, लॅपटॉप ह्यांची गॅरेंटी रद्द न होता, तुम्ही ती कोणत्याही ठिकाणी दुरुस्तीसाठी देऊ शकणार आहात.
[email protected]