
>> राजेश पोवळे
नुकतेच भिकल्या धिंडा यांना तारपावादनासाठी ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले. ते केवळ तारपा वाजवणारे कलाकार नाहीत, तर तारपाचं चालतं-बोलतं विद्यापीठ आहेत. डोंगरदऱ्या, जंगलं, नद्या आणि वाऱ्याच्या साक्षीनं घडलेल्या आदिम संस्कृतीतील त्यांच्या संगीताला आता राष्ट्रीय गौरवाचे कोंदण लाभले आहे.
तारपावादक भिकल्या धिंडा हे आदिवासी सांस्कृतिक विश्वातील आजवरचे एक तेजस्वी, पण दुर्लक्षित रत्न. त्यांच्या जीवनाचा आणि कलेचा प्रवास म्हणजे निसर्ग, माणूस आणि संगीत यांच्यातील अतूट नात्याची एक जिवंत साक्षच होय. भिकल्या धिंडा हे केवळ तारपा वाजवणारे कलाकार नाहीत, तर ते तारपाचं चालतं-बोलतं विद्यापीठ आहेत. डोंगरदऱ्या, जंगलं, नद्या आणि वाऱयाच्या साक्षीनं घडलेलं त्यांचं संगीत कुठल्याही शास्त्राrय चौकटीत अडकणारं नाही. त्यांच्या श्वासातून जन्म घेणारा तारपाचा सूर हा आदिवासी जीवनाच्या प्रत्येक भावछटेला स्पर्श करणारा आहे. ‘पद्मश्री’ हा देशातील सर्वोच्च सन्मान त्यांना जाहीर झाल्याने या दुर्लक्षित रत्नाला आता राष्ट्रीय गौरवाचे कोंदण लाभले आहे.
तारपा हे आदिवासी समाजाचं प्राणवाद्य. फक्त वाद्य नाही, तर ते त्यांच्या जीवनाची भाषाच. भिकल्या धिंडांच्या हातात आल्यानंतर तारपा बोलू लागतं. कधी तो पावसाची चाहूल देतो, कधी प्रेमाचा हळवा हुंकार, तर कधी जंगलाच्या भयाण शांततेला छेद देणारा आर्त सूर. त्यांच्या फुंकरीतून निघणारा प्रत्येक स्वर हा अनुभवातून साकारलेला असतो. शिकवलेला नसतो, तर तो जगलेला असतो.
अत्यंत दुर्गम अशा जव्हार तालुक्यातील वळवंडा गावात भिकल्या धिंडा यांचा जन्म झाला. अत्यंत बिकट परिस्थितीत भिकल्या धिंडा हे औपचारिक शिक्षणापेक्षा परंपरेच्या शाळेत घडलेले कलाकार आहेत. भिकल्या यांचे पणजोबा धाकल्या धिंडा आणि आजोबा नवसू धिंडा हे त्यांचे तारपावादनातील खरे गुरू. पिढय़ान्पिढय़ा चालत आलेली तारपावादनाची परंपरा भिकल्या यांनी केवळ जपली नाही, तर तिला उंचीवर नेऊन ठेवले. उपासमार, उपेक्षा आणि मुख्य प्रवाहातील दुर्लक्ष या सगळ्यांवर मात करत त्यांनी आपली कला अखंड जिवंत ठेवली. भिकल्या धिंडा यांच्या तारपाच्या सुरांनी गावच्या जत्रा ओलांडून राज्य, देशभरातील व्यासपीठांवर दणदणीत हजेरी लावली. शहरी रसिकांनी जेव्हा पहिल्यांदा तारपाचा आत्मा ऐकला तेव्हा त्यांना जाणवलं की, हे संगीत ऐकायचं नसतं, अनुभवायचं असतं. अनेक अभ्यासक, संगीतप्रेमी आणि संशोधकांनी त्यांच्या कलेला आदिवासी लोकसंगीताचा शिखरबिंदू मानलं आहे.
भिकल्या धिंडा यांचं योगदान आणि त्यासाठी त्यांना मिळालेला पद्मश्री म्हणजे केवळ वैयक्तिक यश नाही, तर आदिवासी अस्मितेचं सांस्कृतिक जतन आहे. त्यांनी तारपाला संग्रहालयात बंद होऊ दिलं नाही, ती कला त्यांनी जिवंत ठेवली श्वासात, पावलांत आणि सण-समारंभांतसुद्धा. जंगलात, डोंगरावर आणि आदिवासी मनात त्यांच्या तारपाचे सूर घुमत आहेत. वयाच्या नव्वदीतही तारपा कलेचा हा भीष्माचार्य ही कला पुढच्या पिढीकडे जाऊन ती जतन व्हावी यासाठी तळमळत आहे. पद्मश्री गौरवामुळे भिकल्या धिंडा यांचे नाव मराठी लोककलेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं आहे.
सरस्वतीची कृपा, पण लक्ष्मीदर्शनाची आस
भिकल्या धिंडा यांचे पत्नी मुले, सुना, नातवंडे असे आठ जणांचे कुटुंब. एक एकर जमिनीचा तुकडा हाच त्यांचा पोटापाण्याचा आधार. पावसाळ्यात भात पिकवून त्यावरच वर्षभराची गुजराण. नव्वदी पार केलेल्या भिकल्या यांना वर्षभरापूर्वी पक्षाघाताचा झटका आला, पण ‘मोडून पडली ताकद तरी मोडला नाही कणा’ या कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ कवितेतील नायकासारखे भिकल्या पुन्हा ताकदीने उभे राहिले. शारीरिक व्याधींवर मात करून ते पुन्हा तारपा सेवेत रममाण झाले आहेत. कायम रोजगाराचे साधन नसल्याने घरात हलाखीची परिस्थिती. तारपा वादनातून ‘सरस्वतीची’ कृपा झाली तरी ‘लक्ष्मीदर्शनाची’ आस असलेल्या भिकल्या यांनी शिक्षण घेणाऱयां नातवंडांना कायमस्वरूपी रोजगार किंवा नोकरी द्यावी असे साकडे सरकारला घातले आहे.

























































