
>> राखी अरदकर, [email protected]
निसर्ग आपल्याला अनेक अर्थांनी शिकवतो. अतिशय निगुतीने विणलेले `कोळ्या’चे घर जणू त्याच्या जगण्याची कथाच उलगडत जाते.
कोळ्याचं घर अतिशय नाजूक, पारदर्शक आणि क्षणभंगूर, पण त्या घराच्या प्रत्येक धाग्यात एक अखंड सृजनाची, संयमाची आणि जगण्याची कथा दडलेली असते. निसर्गाच्या कुंचल्यातून उमटलेली ही सूक्ष्म रचना म्हणजे जीवनाचं प्रतीकच जणू.
त्या बारीक रेषांमध्ये एक अनोखं संतुलन आहे. जिथे विज्ञानाचं गणित आणि कलेचं भावविश्व एकत्र मिसळलेलं आहे. कोळी आपल्या जाळ्याची रचना अचूक कोन, अंतर आणि ताण यांच्या नियमानुसार करतो. प्रत्येक धागा योग्य दिशेने ओढलेला असल्याने संपूर्ण जाळं मजबूत आणि लवचिक बनतं. या प्रािढयेत कोळ्याच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेचं, म्हणजेच निसर्गातील विज्ञानाचं दर्शन घडतं.
पण हाच धागा जेव्हा सकाळच्या प्रकाशात झळकतो, तेव्हा तो कलेचा अनुभव होतो. त्या प्रकाशाशी संवाद साधणाऱया पारदर्शक रेषा म्हणजे निसर्गाच्या कॅनव्हासवर चाललेला अदृश्य कुंचला. प्रकाश आणि सावलीचं सूक्ष्म नृत्य दिसतं.
For the artist, communication with nature remains the most essential condition. The artist is human, himself nature, part of nature within natural space.” – व. स. गायतोंडे
काल जिथे आवाज, हालचाल आणि जीवनाची गजबज होती, ते आज शांततेच्या छायेत विसावलेले आहे. या तुटलेल्या घराच्या भिंतींमध्ये केवळ काळाच्या आठवणी, जीवनाचे पडसाद आणि विस्मृतीच्या रेषा कोरल्या आहेत.
पाब्लो पिकासो म्हणतो, ““Art washes away from the soul the dust of everyday life.”
`कला ही आत्म्यावर साचलेली दैनंदिन जीवनाची धूळ झटकते.’ ही जाणीव आपल्याला नाशाचं नव्हे, तर पुनर्निर्मितीचं तत्त्वज्ञान शिकवते. जाळं तुटलं तरी कोळी पुन्हा ते विणतो. नव्या जोमाने, नव्या आशेने. याच पुनरुत्थानात जीवनाचं खरं सौंदर्य दडलेलं आहे. ही सृजनशक्ती म्हणजे निसर्गाचं अदृश्य तत्त्वज्ञान.
तुटणं म्हणजे नव्या सुरुवातीचं बीज आहे. कोळ्याचं हे जाळं म्हणजे निसर्गातील कलाकृतीचं सर्वोत्तम उदाहरण. जिथे वैज्ञानिक अचूकता, कलात्मक संवेदनशीलता आणि तत्त्वचिंतन एकत्र विणलेलं आहे. ते आपल्याला शिकवतं,
“संघर्ष हा नव्या सृजनाचा प्रारंभ.”
(लेखिका चित्रकार, समीक्षक आहेत)
































































