
>> रमेश डोईफोडे
सोन्याच्या भावाला गेल्या काही महिन्यांत अधिकच झळाळी आली आहे. चालू वर्षातील पहिल्या चार महिन्यांत या सुवर्ण धातूने गुंतवणुकीवर सुमारे 25 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सध्याच्या भावपातळीवर सोने खरेदी करणे लाभदायक ठरेल काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याच विषयावर येथे ऊहापोह केला आहे. सध्याच्या वातावरणात सोन्यात छोटी-मोठी गुंतवणूक करायची असेल तर जाणकारांचा सल्ला घेऊनच पुढील पावले टाकली पाहिजेत.
भारतीयांसाठी सोने हा कायमच जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. दरवर्षी सुमारे आठशे टन सोन्याची उलाढाल देशात होत असते. त्यापैकी 70 टक्के वापर दागिने घडविण्यासाठी होतो. त्यावरून देशवासीयांना विशेषतः महिलांना सोन्याचे आकर्षण किती आहे, याचा अंदाज यावा. देशातील मागणीच्या 90 टक्के सोने आयात करावे लागते. त्यामुळे साहजिकच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा, जागतिक घडामोडींचा व अस्थिरतेचा परिणाम सोन्याच्या भावावर होत असतो. बाहेर अनिश्चित, चिंताजनक वातावरण असताना त्यातील गुंतवणूक वाढली, असे अनेकदा घडले आहे. सद्यस्थितीतही त्याचे प्रत्यंतर येत आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध, अमेरिका-चीन व्यापारसंबंधांत निर्माण झालेला अभूतपूर्व तणाव आदींचे पडसाद संपूर्ण जगात उमटत आहेत. त्यातून निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या वातावरणामुळे एक भरवशाची पारंपरिक गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी वाढली आहे. परिणामी जागतिक स्तरावर त्याचे भाव वधारत चालले आहेत. देशात गेल्या 22 एप्रिल रोजी त्याने लाखमोलाचा म्हणजे दहा ग्रॅमला एक लाख रुपये असा किमतीचा विक्रम केला.
भरघोस परतावा
आपल्याकडे सणावाराला सोने खरेदी करण्याचा प्रघात अनेक जण निष्ठsने पाळतात. त्यातही पंचांगात नमूद केलेले विशिष्ट मुहूर्त असतील, तर पुण्या-मुंबईसारख्या शहरांत नामांकित सराफांकडे खरेदीसाठी अक्षरशः रांगा लागतात. अक्षय्य तृतीया ही अशीच एक लोकप्रिय तिथी. वर्षभराच्या कालावधीची नोंद घेण्यासाठी हा सण विचारात घेतल्यास गेल्या वर्षीच्या अक्षय्य तृतीयेनंतर यंदा त्याच दिवसापर्यंत सोन्याने सुमारे 35 टक्के परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठी त्याचा बोलबाला वाढला असल्यास नवल नाही.
गुंतवणुकीचे निकष
सोन्याला एवढी अफाट जनमान्यता लाभण्याची व्यावहारिक कारणे त्याच्या अंगभूत गुणांत आहेत. गुंतवणूक कोणत्याही प्रकारातील वा क्षेत्रातील असो, तिला तीन कसोटय़ांवर जोखायचे असते. सुरक्षितता, तरलता (लिक्विडिटी) आणि परतावा या निकषांवर गुंतवणूक साधनाची गुणवत्ता निश्चित होते. सुरक्षितता म्हणजे आपण जेथे पैसे गुंतवू ते हमखास परत मिळतील याची शाश्वती हवी. ही गुंतवणूक गरजेनुसार पाहिजे तेव्हा मोकळी करता येत असेल तर तिची तरलता चांगली असते आणि शेवटचा मुद्दा आपल्या भांडवलावर योग्य परतावा मिळत आहे काय? या प्रश्नाची उत्तरे स्पष्टपणे होकारार्थी येत असतील तर धनवृद्धीसाठी निवडलेला पर्याय योग्य आहे, असे मानायला हरकत नाही.
सोन्याची विश्वासार्हता
सोन्याला या तिन्ही कसोटय़ांवर तपासून पाहिले, तर त्याची विश्वासार्हता खचितच उजळून निघालेली दिसते. सोन्याची खरेदी सुरक्षित असते. घेतलेले दागिने किंवा चोख सोने ग्राहकाच्याच ताब्यात राहत असल्याने या गुंतवणुकीत फसगत होण्याची शक्यता नसते. ते हवे तेव्हा विकता येत असल्याने ही तरलता अडीनडीला हमखास उपयोगी पडते. त्यावरील परतावाही ठीक असतो. त्यामुळे सोन्याच्या उपयुक्ततेविषयी समाजातील सर्वच आर्थिक स्तरांत विश्वासाची भावना आढळते.
ग्राहकांपुढील प्रश्न
आताचा ताजा विषय सोन्याच्या किमतीने प्रतितोळा (दहा ग्रॅम) 90हजार रुपयावर मारलेली मजल हा आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे चार महिन्यांत 25 टक्के, तर वर्षभरात 35 टक्के लाभ सोन्याने मिळवून दिला आहे. असा घसघशीत परतावा सदासर्वकाळ मिळत नसतो. त्यामुळे सोन्याचा भाव सध्या परमोच्च बिंदूवर असताना नव्याने खरेदी करावी किंवा कसे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. संबंधितांनी त्यावर निर्णय घेताना आधी काही मुद्दे ध्यानात घेतले पाहिजेत.
सोने सर्वार्थाने लाभदायी ठरत असले तरी गुंतवणूक म्हणून त्याच्या मर्यादाही लक्षात घेतल्या पाहिजेत. आपल्याकडे चोख (शुद्ध स्वरुपातील) सोने घेण्यापेक्षा त्याचे दागिने घडविण्याकडे कल असतो. अलंकार तयार करण्यासाठी घडणावळीवर मोठा खर्च होतो. सोने विकताना हा खर्च परत मिळत नाही. शिवाय दागिने मोडताना घट धरली जाते. अशा व्यवहारात ग्राहकाला साहजिकच आर्थिक झळ सोसावी लागते. त्यामुळे गुंतवणुकीसाठी धातू स्वरूपात सोने घ्यायचे असेल, तर ते सुवर्णनाणे, बिस्किट वा तत्सम प्रकारांत घेणे योग्य ठरते. याखेरीज गोल्ड ईटीएफ, गोल्ड म्युच्युअल फंड हे अधिक चांगले पर्याय आहेत. (सध्या देशात सर्वाधिक सोने दागिन्यांसाठी वापरले जाते. वर्ल्ड गोल्ड काwन्सिलच्या आकडेवारीनुसार, भारतीय महिलांकडे सुमारे 25 हजार टन सोने दागिन्यांच्या स्वरूपात आहे.)
सोन्याचे भाव आता उच्च पातळीवर असले तरी त्याचा आलेख दरवर्षी असाच उंचावत राहील असे नाही. यापूर्वी काही वर्षी नकारात्मक परताव्याचीही नोंद झाली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे सोन्याने आता किमतीचे शिखर गाठले असताना या टप्प्यावर खरेदी करणे व्यवहार्य ठरेल काय, याचा निर्णय अभ्यासपूर्वक घेतला पाहिजे. काही तज्ञ सद्यस्थितीत वैयक्तिक पोर्टपहलिओचा आढावा घेण्याचा सल्ला देतात. त्यांच्या मते एकूण गुंतवणुकीत सोन्याचा वाटा जास्तीत जास्त 10 ते 15 टक्के असायला हवा. तेजीच्या वातावरणामुळे सोन्याचा हिस्सा या टक्केवारीपेक्षा जास्त झाला असल्यास काही सोने विकून आपला पोर्टपहलिओ संतुलित केला पाहिजे.
अस्थिरतेतील दिलासा
दुसरा मुद्दा म्हणजे नेहमी जास्त परतावा मिळवून देणारे साधन या दृष्टीने सोन्याकडे पाहिल्यास ती अपेक्षापूर्ती होण्याची खात्री नाही. परताव्यापेक्षाही महागाई, तसेच व्यक्तिगत वा बाहेरची अस्थिर आर्थिक स्थिती अशा वातावरणात कुटुंबाला भक्कम आधार देऊ शकणारा पर्याय म्हणून सोन्याला महत्त्व दिले जाते. केवळ परतावा हाच गुंतवणुकीचा मुख्य हेतू असेल तर शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंड यात अभ्यासपूर्वक केलेली गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरू शकते.
केवळ विशिष्ट क्षेत्रात तेजीची लाट आली आहे म्हणून साधकबाधक विचार न करता त्या लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न करणे आर्थिकदृष्टय़ा मारक ठरू शकते. त्यामुळे सध्याच्या वातावरणात सोन्यात छोटी-मोठी गुंतवणूक करायची असेल तर जाणकारांचा सल्ला घेऊनच पुढील पावले टाकली पाहिजेत.
(ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक)