
>> रविप्रकाश कुलकर्णी
जागतिक मराठी अकादमी व गोवा राज्य आयोजन समिती आयोजित शोध मराठी मनाचा याअंतर्गत 21 वे जागतिक मराठी संमेलन कला अकादमी पणजी, गोवा येथे झाले. 11 जानेवारी रोजी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची मुलाखत तंबी दुराई घेतील असे वृत्त होते. अर्थात श्रीकांत बोजेवार यांचे टोपण नाव तंबी दुराई आहे.त्याचवेळी तेथील हॉटेलात मंत्री महोदय यांचा कार्पाम होता. त्यातील एक स्थानिक कार्यकर्ता मंत्री महोदयांना मनाला, “सर, आज तुम्ही नागनाथ मंजुळेंची मुलाखत घेणार?” मंत्री महोदय गोंधळात पडले. पण लगेच उलगडा झाला, या मंत्री महोदय यांच नाव तंबी दुराई होतं! नावातील साधर्म्यामुळे गोंधळ झाला होता.
हल्ली विश्वास पाटील या नावाचा पण असा घोळ होतो आहे. हे पानिपतकारांना आता सवयीचे झाले आहे. अरविंद गोखले म्हटलं की कथाकार गोखले हे नक्की झालं आहे, पण आणखी एक अरविंद गोखले आहेत. एकेकाळी ‘केसरी’, ‘लोकमत’ यांचे ते संपादक होते. तरी हे चरित्र लेखक अरविंद व्यं.गोखले असं नाव लिहितात. एकदा तर कमाल झाली. कथाकार अरविंद गोखले यांना एक मोठा पुरस्कार मिळाला. या मोठय़ा घटनेचा चेक अरविंद व्यं. गोखले यांना पाठवला गेला. मात्र या गोखले यांनी मूळ गोखले यांना तो चेक पाठवून दिला.
चित्रपट विषयक लेखात, विशेषत: हिंदी गाण्यांसंबंधात एक घोळ होतो. त्या वेळी संगीतकार नौशाद यांचं नाव जोषात होतं. ते एका चित्रपटाला एक लाख रुपये मानधन घेत असत. हे सर्वसाधारण निर्मात्याला परवडण्यासारखे नव्हतेच. अशा वेळी शौकत आली हाश्मी या निर्मात्याने काय करावे? त्याने ‘नग्मा’ या आपल्या चित्रपटाला संगीत नाशाद देणार हे जाहीर करून टाकले. मात्र अनेकांना वाटले संगीत नौशाद यांचे आहे. पण नौशादच्या तुलनेत नाशाद हे नाव फारसं कोणाच्या ध्यानात येणं कठीणच. त्यामुळे व्हायचं काय लेखात वगैरे लेखकांनी जरी नाशाद हे नाव दिलं असलं तरी प्रूफ तपासणाऱयाला वाटे हे नौशाद असणार आणि मग नाशादच तो परस्पर नौशाद करून टाके. त्यामुळेच की काय एका लेखकाने नाशाद लिहून पुढे कंसात लिहिले नौशाद नव्हे. तर लेखातदेखील ही सूचना आली!
नाम साधर्म्य प्रताप असादेखील होतो.
नारायण सुर्वे यांचीदेखील एकदा अशीच पंचायत झाली. ते नेरळला राहायला गेले. तेव्हा आपल्या मित्राला आपला पत्ता देताना त्यांनी लिहिलं पद्मश्री नारायण सुर्वे. तसे नारायणराव पद्मश्री मिरवण्यापैकी नव्हते. तरी त्यांनी असे का करावे आणि पद्मश्रीचा असा पदवीसारखा उपयोग करणे गैर आहे असं सरकारनेच जाहीर केलेले आहे असं मी जेव्हा त्यांच्या निदर्शनास आणलं तेव्हा ते म्हणाले, “रविप्रकाश काय सांगू तुम्हाला? इथे नेरळमध्ये एक नारायण सुर्वे आहेत आणि ते पुढारी आहेत. मला आलेली पत्रे त्यांना जाऊ लागली. नारायण सुर्वे म्हटलं की ते नेरळचे पुढारी असं सगळ्यांना माहीत. मग करायचं काय? मग काय केलं पद्मश्री नारायण सुर्वे. पोस्ट मनदेखील म्हणाले, हे बाकी बेस्ट झालं पद्मश्री म्हटलं की ते तुम्ही. हे सॉर्ट करायला आम्हाला सोपं झालं…”
तर असे हे नाम साधर्म्याचे घोळ.

























































