मुद्दा- ‘स्व-अध्ययन’ : प्रभावी शिक्षण पद्धत

>> स्नेहा अजित चव्हाण ,[email protected]

आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थी यशस्वी होण्यासाठी केवळ शिक्षक किंवा पालकांची मदत पुरेशी ठरत नाही. खरा बदल घडवतो तो विद्यार्थी स्वतःच्या प्रयत्नांमधून. अभ्यासाची जबाबदारी स्वतः स्वीकारणे, स्वतःहून शिकण्याची इच्छा निर्माण करणे आणि सातत्यपूर्ण सराव करणे यालाच ‘स्व-अध्ययन’ म्हणतात. ही एक प्रभावी शिक्षण पद्धत आहे. ती आपल्यात धैर्य, जिज्ञासा, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढवते. स्वः शिकण्याची सवय लागली की, आपली विचारशक्ती तीक्ष्ण होते, समस्या सोडवण्याची क्षमता वाढते आणि नव्या संकल्पनांकडे पाहण्याची दृष्टी व्यापक होते. शिकण्याचा आनंदही वाढतो. कारण ते शिकणे कोणाच्या दडपणाखाली नसते, तर मनापासून आणि स्वतःच्या गतीने केलेले असते.

आज तंत्रज्ञान, उद्योग, शिक्षण आणि करीअर या सर्व क्षेत्रांमध्ये सतत काही ना काही नवीन घडत असते. अशा वेळी ‘स्व-अध्ययन’च आपल्याला अद्ययावत ठेवते. ज्यांना स्वतः शिकण्याची कला अवगत असते ते काळाच्या पुढे चालतात. या प्रक्रियेत विद्यार्थी केवळ गुण मिळवत नाही, तर शिस्त, आत्मविश्वास, जिज्ञासा आणि आयुष्यभर टिकणाऱया कौशल्यांचे बीज पेरतो.

‘स्व-अध्ययन’ म्हणजे शिकण्याची जबाबदारी स्वतः स्वीकारणे. शिक्षकांवर पूर्ण अवलंबून न राहता स्वतः प्रयत्न करणे. धडे स्वतः वाचणे, समजून घेणे आणि पुनरावलोकन करणे. स्वतःच्या चुका स्वतः शोधणे. शिकण्यामध्ये सातत्य आणि शिस्त राखणे. हे एक जीवनकाwशल्य आहे. कारण जो विद्यार्थी स्वतः शिकायला शिकतो, तो आयुष्यभर कुठेही मागे राहत नाही.

‘स्व-अध्ययना’चे प्रकार

‘स्व-अध्ययन’ अनेक प्रकारे केले जाऊ शकते. विद्यार्थ्यांनी आपापल्या सोयीप्रमाणे विविध पद्धतींचा वापर करावा.

वाचनाधारित ‘स्व-अध्ययन’ ः पाठय़पुस्तक, अतिरिक्त पुस्तके, संदर्भग्रंथ वाचून विषय समजून घेणे.

लेखनाधारित ‘स्व-अध्ययन’ ः  कठीण प्रश्न लिहून सराव करणे, नोट्स बनविणे व स्वतः चाचणी घेणे.

दृकश्राव्य ‘स्व-अध्ययन’ ः व्हिडीओ, चार्ट, नकाशे, आकृत्या, व्हिडीओ अशा माध्यमांचा उपयोग करून समज वाढवणे.

गट व ‘स्व-अध्ययन’ ः मित्रांसोबत चर्चा करून, एकमेकांना शिकवून आणि शंका विचारून शिकणे.

स्व-मूल्यमापन ः दर आठवडय़ाला स्वतःच्या अभ्यासाचे मूल्यमापन करणे – काय जमलं, काय अजून शिकायचं आहे?

‘स्व-अध्ययन’ कसे करावे?

अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा. दररोज ठरावीक वेळ अभ्यासाला द्यावा. अभ्यास जितका नियमित तितके यश निश्चित.

कोणताही धडा आधी पाठय़पुस्तकातून वाचा. त्यानंतरच संदर्भ पुस्तकांचा आधार घ्या.

चार्ट, नकाशे, फ्लॅशकार्ड वापरा. माहिती मनात जास्त वेळ टिकते आणि पटकन आठवणीला येते.

संदर्भ पुस्तकांचा योग्य उपयोग करा उदाहरणे, सराव प्रश्न, मॉडेल पेपर्स सोडवा. जितका सराव जास्त तितकी संकल्पना दृढ.

शंका मनात ठेवू नका. ती शिक्षक, मित्र यांच्याबरोबर चर्चा करून शंकांचे निराकरण करा किंवा पुस्तकातून त्याचे समाधान शोधा. ही सवय विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासू वृत्ती जागृत करते.

दर रविवारी एक तास स्वतःची परीक्षा घ्या. यामुळे लक्षात राहण्याची क्षमता वाढते.

जेव्हा विद्यार्थी स्वतः शिकतो तेव्हा मेंदू माहिती खोलवर प्रक्रिया करतो, स्वतः काढलेले निष्कर्ष जास्त काळ लक्षात राहतात. चार्ट, नकाशे, रंग, चित्रे यामुळे आठवण अधिक मजबूत होते,

पुनरावृत्तीमुळे मेंदू त्या माहितीला ‘महत्त्वाची’ म्हणून साठवतो. म्हणूनच ‘स्व-अध्ययना’त केलेला अभ्यास मनात दीर्घकाळ राहतो आणि भविष्यातही कामाला येतो. ‘स्व-अध्ययना’चा दीर्घकालीन फायदा आहे. परीक्षेतील गुण सुधारतात, आत्मविश्वास वाढतो, शिकण्याची जिज्ञासा वाढते, स्पर्धा परीक्षा सोपी वाटतात, आयुष्यभर स्वतंत्र विचार करणारा विद्यार्थी घडतो, वेळेचे व्यवस्थापन सुधारते, जबाबदारीची जाणीव निर्माण होते, व्यक्तिमत्त्व विकासावर मोठा परिणाम होतो, आज केलेले ‘स्व-अध्ययन’ उद्याची मोठी संधी निर्माण करते. ‘स्व-अध्ययन’ हा एक संकल्प आहे स्वतःला निरंतर सुधारत राहण्याचा, आपल्या क्षमतेची जाण ठेवण्याचा आणि जे शिकतो ते स्वतःच्या व समाजाच्या विकासासाठी वापरण्याचा. त्यामुळे आपण स्वतःला शिकवण्याचा निर्धार केला तर यश आपोआप आपल्या मार्गावर येते. ‘स्व-अध्ययन’ करणारा विद्यार्थी बाह्य परिस्थितींवर अवलंबून राहत नाही. तो वेळ, संसाधने आणि संधी यांचा सुयोग्य उपयोग करून स्वतःचा मार्ग तयार करतो.

आजच्या बदलत्या शैक्षणिक वातावरणात विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबी, आत्मविश्वासपूर्ण व जबाबदार शिकणारा घडवणे ही काळाची गरज आहे. पारंपरिक अध्यापन पद्धतींसोबतच विद्यार्थ्यांमध्ये ‘स्व-अध्ययना’ची सवय विकसित करणे आवश्यक ठरते. ‘स्व-अध्ययन’ ही अशी शिक्षण पद्धती आहे जी विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमतेनुसार, गतीनुसार आणि आवडीनुसार शिकण्याची संधी देते.

(लेखिका श्रमिक विद्यालय, जोगेश्वरी (पूर्व) येथे सहशिक्षिका असून महाराष्ट्र शासन, व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था येथे करीअर समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत.)