
>> प्रा. विजया पंडित
उपचार आणि नशापान यात असणारी रेषा खूपच पुसट आहे. भारतात कोडिनचा दुरुपयोग थांबविण्यासाठी काऊंटवरच्या सर्रास विक्रीवर बंदी घालणे, डिजिटल प्रिस्क्रिप्शन सिस्टम, फार्मा कंपनीसाठी उत्पादनाची मर्यादा आखून ठेवणे, सीमेवर देखरेख यांसारखे उपाय गरजेचे. त्याच वेळी युवकांतही जनजागृती मोहीम राबविली पाहिजे. एकुणातच कोडिनचे औषध वरदान असले तरी चुकीच्या हातात पडल्यास ते जीवघेणे ठरू शकते. भारतात त्याची बेकायदा तस्करी आणि वाढती चटक पाहता या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. वेळीच पावले उचलली नाहीत तर आगामी काळात हे संकट आणखी गडद होईल.
गेल्या काही काळापासून कोडिनआधारित खोकल्याच्या औषधांची तस्करी आणि त्याचा नशेसाठी होणारा वापर तसेच अनेक राज्यांत जादा डोस घेतल्याने झालेले मृत्यू चिंताजनक आहेत. कोडिनने देशात खळबळ उडविली आहे. दीर्घकाळ दुखणे आणि खोकल्यावरील उपचारांसाठी वापरले जाणारे औषध आज सार्वजनिक आरोग्यावर गंभीर संकटाच्या रूपातून उभे राहिले आहे. कोडिन हे ‘सायलेंट एपिडेमिक’ म्हणून सांगितले जात आहे. त्याचा वापर कायदेशीर आहे, परंतु त्याचा दुरुपयोग वेगाने वाढत चालला आहे. अशा वेळी कोडिन म्हणजे काय आणि ते कसे काम करते, ते धोकादायक का आहे आणि जगभरात त्यावर निर्बंध का लादले ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
कोडिन हे प्रत्यक्षात एक ओपिऑईड असून ते ‘अफू पोस्ता’पासून नैसर्गिकरीत्या मिळते. ते मॉर्फिनचे प्रो-ड्रग आहे. शरीरात गेल्यानंतर ते मॉर्फिन होते. आरोग्य शास्त्रात त्याचा वापर दुखणे कमी करणे, खोकला थांबवणे आणि अतिसार थांबविणे यासाठी केला जातो. भारतासह दक्षिण आशियाई देशांत कोडिनआधारित औषधांचा दीर्घकाळापासून वापर केला जात आहे आणि मेडिकल स्टोअरमध्येदेखील सहजपणे उपलब्ध होते. सहज उपलब्धता हे त्याच्या दुरुपयोगास कारणीभूत ठरत आहे.
हे औषध नैसर्गिक रूपाने अफूच्या झाडांपासून दुधासारख्या पदार्थात आढळून येते. कच्च्या अफूत एक ते तीन टक्क्यांपर्यंत कोडिन असते. या कोडिनमध्ये रासायनिक प्रक्रियेतून बदल केला जातो आणि त्यातून मॉर्फिनची निर्मिती केली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत नियंत्रित वातावरणात करण्यात येते. कारण मॉर्फिन, कोडिन आणि त्याच्या उत्पादनाचा दुरुपयोग हा धोकादायक मानला जातो.
कोडिनचा इतिहास रंजक आहे. अफूचा वापर प्राचीन काळापासून केला जातो. इजिप्त, मेसोपोटामिया, ग्रीस, चीन आणि भारतापर्यंत अफूला वेदना निवारण, गुंगी आणणे आणि मनाला शांत करणारा घटक पदार्थ म्हणून ओळखले जाते. आधुनिक शास्त्राrय रूपात कोडिनचा शोध 1832 मध्ये फ्रान्सचे शास्त्रज्ञ पियरे जीन रिबिकेट यांनी लावला. त्यांचे संशोधन महत्त्वाचे ठरण्यामागचे कारण म्हणजे कोडिनला मॉर्फिनच्या तुलनेत अधिक हलके आणि अपेक्षेपेक्षा अधिक सुरक्षित मानले जाणे. या कारणामुळे हे औषध कमी काळात जगभरात लोकप्रिय झाले आणि जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील त्याचा समावेश अत्यावश्यक औषधांच्या यादीत केला. मात्र त्याचे दुष्परिणाम समोर येऊ लागल्याने समस्या निर्माण होऊ लागल्या. कोडिन शरीरात गेल्यानंतर ते मॉफिनमध्ये परावर्तित होत असले तरी त्याचा थेट परिणाम मेंदूच्या ओपिऑयड रिसेप्टर्सवर पडतो. ही प्रक्रिया दुखणे कमी करते. खोकला कमी करते आणि प्रसंगी श्वास घेण्याची प्रक्रियादेखील कमी करते. त्याचे गरजेपेक्षा अधिक वापर केल्यास ती धोकादायक पातळी गाठते. झोप, अस्वस्थता, धुंदी, श्वास थांबणे आणि गंभीर प्रकरणात तर मृत्यूदेखील ओढवतो. मुलांवर त्याचा दुष्परिणाम अधिक प्रमाणात दिसून आला. मुलाच्या शरीरात कोडिन इतक्या वेगाने मॉर्फिनमध्ये परावर्तित होते की, त्याचा अंदाज बांधणे कठीण आहे. काही मुलांत ही प्रक्रिया एवढी वेगात होते की, किंचित प्रमाणातील कोडिनदेखील शरीरात विषाक्त प्रमाणात मॉर्फिन तयार करणारे ठरू शकते. त्यामुळे श्वास थांबण्याचा धोका वाढतो. युरोप आणि अमेरिकेतही अशी काही प्रकरणे घडली आहेत. त्यानंतर जगातील अनेक देशांनी बारा वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांना कोडिन देण्यास मनाई केली आहे.
तस्करी आणि गैरवापर
दुसरी समस्या म्हणजे कोडिनआधारित औषधांची तस्करी आणि त्याचा नशेसाठी होणारा वापर होय. भारत आणि बांगलादेश तसेच भारत-नेपाळ सीमेवर गेल्या दहा वर्षांत कोडिन औषधांची तस्करी वाढली आहे. यामागचे कारण म्हणजे ग्रामीण आणि सीमा भागांत अनेक युवकांना कोडिनचे सेवन हे दारूपेक्षा कमी स्वस्तातील वाटणे. फेन्सिडिल, कोरेक्स आणि कोडेक्ससारख्या औषधांचा वापर नशेसाठी केला जातो. अनेक ठिकाणी तर कोडिनआधारित औषधांच्या बाटल्या शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात विकताना आढळून येतात. तस्करीदेखील अतिशय संघटितपणे केली जाते. फार्मा वितरकाकडून किंवा मेडिकल दुकानातून मोठय़ा प्रमाणात औषधांची खरेदी केली जाते. त्यासाठी बनावट पावत्या आणि बनावट परवान्याचा वापर केला जातो. त्यानंतर ते लहान बाटलीतून वितरित केले जाते, जेणेकरून पकडण्याचा धोका कमी राहील. त्यानंतर सीमा भागातील गावांतील नागरिक, महिला आणि तरुणांना थोडे पैसे देऊन त्यांना सीमेपलीकडे पाठविले जाते. त्यामुळे माफियांना मोठा फायदा होतो.
भारतात औषधी नियंत्रण कायदा आहे. त्यानुसार डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवर लिहून दिल्यावरच कोडिनयुक्त औषध देणे बंधनकारक आहे, परंतु देशातील कोणत्याही भागात हे औषध सहजपणे मिळते. ग्रामीण भागात मेडिकल दुकानावरची देखरेख नावाला आहे. अनेकदा बनावट पावत्यांच्या आधारावर या औषधांचा मोठा साठा केला जातो. तसेच हे औषध बेकायदा नेटवर्कच्या माध्यमातून सहजपणे बाहेर जाते. सीमा भागात बीएसएफ, एनसीबी, पोलिसांकडून वेळोवेळी मोहिमा राबविल्या जातात. मात्र तस्करांचे जाळे एवढे वाढले की, त्याला मुळापासून बाहेर काढणे कठीण होऊ लागले आहे.
परदेशातील स्थिती
जगातील अनेक देशांनी कोडिनवर अनेक निर्बंध घातले आहेत. अमेरिकेत कोडिनला नियंत्रणाखाली आणले आहे आणि डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय त्याच्या सेवनास मनाई करण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये लहान मुलांना कोडिनचे औषध देण्यास बंदी आहे. तसेच खोकल्यासाठी त्याच्या विक्रीवरदेखील नियम आले आहेत. ऑस्ट्रेलियाने 2018 मध्ये काऊंटवरवर त्याची विक्री थांबविली आहे. युरोपीय संघात बारा वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांना कोडिन घेण्यास मनाई आहे. याउलट दक्षिण आशियात त्याचे नियम कमकुवत आहेत. या कारणामुळेच कोडिनयुक्त औषधांचा बाजार आणि तस्करीचे ठिकाण म्हणून दक्षिण आशियाकडे पाहिले जात आहे. तज्ञांच्या मते, कोडिन उपयुक्त औषध असले तरी त्याचा दुरुपयोग धोकादायक आहे. उपचार आणि नशापान यात असणारी रेषा खूपच पुसट आहे. भारतात कोडिनचा दुरुपयोग थांबविण्यासाठी काऊंटवरच्या सर्रास विक्रीवर बंदी घालणे, डिजिटल प्रिस्क्रिप्शन सिस्टम, फार्मा कंपनीसाठी उत्पादनाची मर्यादा आखून ठेवणे, सीमेवर देखरेख यांसारखे उपाय गरजेचे. त्याच वेळी युवकांतही जनजागृती मोहीम राबविली पाहिजे. एकुणातच कोडिनचे औषध वरदान असले तरी चुकीच्या हातात पडल्यास ते जीवघेणे ठरू शकते.





























































