
>> विशाल फुटाणे, [email protected]
कलात्मक सौंदर्यासोबत देवतांच्या विविध शक्तींचे एकत्रित रूप दर्शविण्याचा प्रयत्न करणारी शिल्पं आपल्याला आढळतात. यातीलच एक गंडभेरुंड. भारतीय मंदिरकलेत गंडभेरुंडाची शिल्पे दुर्मिळ आहेत. मात्र दक्षिण भारतात काही ठिकाणी त्याची उदाहरणे आढळतात. आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथील हे शिल्प सांस्कृतिक इतिहासातील विचारसंघर्ष, आध्यात्मिक प्रयोग आणि कल्पनाशक्तीची साक्ष देणारी जिवंत परंपरा दर्शवते.
दक्षिण भारतातील अनेक प्राचीन मंदिरांच्या प्राकारभिंतींवर काही अशी दुर्मिळ आणि विलक्षण शिल्पे आढळतात की, ती पाहताना केवळ कलात्मक सौंदर्यच नव्हे तर पुराणपरंपरा, तंत्रमार्ग आणि पंथीय विचारसरणींचा एक गुंतागुंतीचा इतिहास उलगडत जातो. अलीकडे आंध्र प्रदेशातील नल्लमला पर्वतरांगांमध्ये वसलेल्या पवित्र तीर्थक्षेत्र श्रीशैलम येथे भेट दिली असता मंदिराच्या प्राकाराच्या भिंतीवर कोरलेले एक अत्यंत दुर्मिळ शिल्प पाहण्याचा योग आला. दोन डोकी असलेला भव्य पक्षी, उघडलेल्या तीक्ष्ण चोची, विशाल पंख आणि शक्तिशाली नखांसह उभा असलेला हा काल्पनिक प्राणी म्हणजे गंडभेरुंड.
प्रथमदर्शनी हे शिल्प कल्पनारम्य वाटते, परंतु त्यामागे पुराणकथा, तांत्रिक परंपरा आणि शैव-वैष्णव पंथांतील तत्त्वचर्चेचा एक महत्त्वपूर्ण संदर्भ दडलेला आहे.
पुराणपरंपरेनुसार भगवान विष्णूंनी असुरराज हिरण्यकश्यपाचा संहार करण्यासाठी भगवान नृसिंह यांनी उग्र अवतार धारण केला. अर्धा मनुष्य आणि अर्धा सिंह असे हे रूप अत्यंत प्रचंड ाढाsधाचे प्रतीक मानले जाते. हिरण्यकश्यपाचा वध केल्यानंतरही नरसिंहाचा आवेश शांत झाला नाही. राक्षसाच्या रक्ताची उष्णता आणि युद्धाचा आवेग यामुळे त्यांचा ाढाsध अधिकच तीव्र झाला व देवतांनाच त्यांची भीती वाटू लागली. देवतांना वाटले की, हा अनियंत्रित आवेश संपूर्ण सृष्टीचा विनाश करू शकतो. या संकटातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी महादेवांकडे धाव घेतली. देवतांच्या विनंतीवरून भगवान शिव यांनी शरभ नावाचे एक विलक्षण रूप धारण केले. शरभ हा अर्धा सिंह आणि अर्धा पक्षी अशा अद्भुत रचनेचा प्राणी मानला जातो. तांत्रिक परंपरेतील काही ग्रंथांनुसार त्याच्या विशाल पंखांमध्ये देवी दुर्गा आणि काली यांच्या शक्ती सामावलेल्या होत्या. शरभाने नरसिंहाला आपल्या पंखांच्या कवेत घेऊन त्यांचा उग्र आवेश शांत करण्याचा प्रयत्न केला.
मात्र या कथेला पुढे आणखी एक विलक्षण वळण मिळते. नरसिंहाच्या प्रचंड ऊर्जेतूनच आणखी एक भयावह रूप प्रकट झाले गंडभेरुंड. दोन डोकी असलेला हा विशाल पक्षीराज काळ्या रंगाचा, तीक्ष्ण दातांचा आणि विस्तीर्ण पंख असलेला असा वर्णिला जातो. तांत्रिक परंपरेत हे रूप विष्णूच्या उग्र आणि विध्वंसक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. कथेनुसार शरभ आणि गंडभेरुंड यांच्यात अठरा दिवस भयंकर संघर्ष झाला. या संघर्षात दोन महान दैवी शक्ती आमनेसामने आल्या. अखेरीस नरसिंहाने स्वतच्या उग्र ऊर्जेवर नियंत्रण मिळवले आणि हा संघर्ष थांबवला. त्यानंतर विष्णू आणि शिव दोघेही पुन्हा आपल्या मूळ शांत स्वरूपात प्रकट झाले व विश्वाचा संभाव्य विनाश टळला. या गंडभेरुंडाचा उल्लेख भागवत पुराणासारख्या प्रमुख पुराणग्रंथांमध्ये आढळत नाही, परंतु काही प्रादेशिक ग्रंथांमध्ये, विशेषत शैव तांत्रिक परंपरेतील साहित्यामध्ये त्याचे वर्णन येते. त्यामुळे ही कथा केवळ पौराणिक कल्पना नसून शैव आणि वैष्णव पंथांतील तत्त्वचर्चेचे प्रतीक म्हणूनही पाहिली जाते. काही शैव ग्रंथांमध्ये शरभाने नरसिंहाला शांत केले असे वर्णन आहे, तर वैष्णव परंपरेत गंडभेरुंड हे शरभापेक्षा अधिक शक्तिशाली रूप मानले जाते. अशा प्रकारे या कथेत दोन पंथांतील आध्यात्मिक वादांचे प्रतिबिंब दिसते. तंत्रमार्गात देवतांच्या मूलशक्तींचा संयोग करून नव्या देवतेची निर्मिती करण्याची संकल्पनादेखील आढळते आणि गंडभेरुंडाची कल्पना कदाचित त्याच परंपरेतून विकसित झाली असावी.
तांत्रिक परंपरेत अष्टमुख गंडभेरुंड ही आणखी एक रोचक संकल्पना आढळते. या रूपात आठ भिन्न शक्तींचा संगम मानला जातो. नरसिंह, वराह, हयग्रीव, व्याघ्र, गरुड, वानरेंद्र, भल्लुक इत्यादी उग्र शक्तींचे प्रतीकात्मक स्वरूप या अवतारात समाविष्ट केले जाते. या संकल्पनेतून देवतांच्या विविध शक्तींचे एकत्रित रूप दर्शविण्याचा प्रयत्न दिसतो. भारतीय मंदिरकलेत गंडभेरुंडाची शिल्पे अत्यंत दुर्मिळ आहेत. तरीही दक्षिण भारतात काही ठिकाणी त्याची उदाहरणे आढळतात. आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथे प्राकारभिंतीवर त्याचे प्रभावी शिल्प दिसते. कर्नाटकातील बेळगावी या प्राचीन नगरातही त्याचे उल्लेखनीय उदाहरण आहे, तर तेलंगणातील यादगीर येथे लक्ष्मी नृसिंह मंदिरात गंडभेरुंडाच्या रूपाची पूजा केली जाते.
इतिहासाच्या दृष्टीने गंडभेरुंडाचे आणखी एक महत्त्वाचे स्थान म्हणजे म्हैसूरचे राजघराणे. वाडियार राजवंशाने गंडभेरुंडाला आपले शाही प्रतीक म्हणून स्वीकारले होते. शक्ती, साहस आणि अजिंक्यत्वाचे प्रतीक मानून हा द्विमुखी पक्षी त्यांच्या राजमुद्रेवर वापरला गेला. पुढे हेच प्रतीक कर्नाटक राज्याच्या अधिकृत चिन्हामध्येही समाविष्ट झाले आणि आजही कर्नाटकच्या ओळखीचा भाग म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणूनच गंडभेरुंड ही केवळ एक काल्पनिक प्राणीमूर्ती नाही, ती भारतीय पुराणपरंपरेतील कल्पनाशक्ती, तांत्रिक साधना, पंथीय तत्त्वचिंतन आणि मंदिरकलेतील प्रतीकवाद यांचे एक अद्वितीय मिश्रण आहे.
श्रीशैलमच्या मंदिर प्राकारावर कोरलेले ते दुर्मिळ शिल्प पाहताना असे जाणवते की, भारतीय मंदिरकला केवळ श्रद्धेची अभिव्यक्ती नसून ती आपल्या सांस्कृतिक इतिहासातील विचारसंघर्ष, आध्यात्मिक प्रयोग आणि कल्पनाशक्तीची साक्ष देणारी जिवंत परंपरा आहे.
(लेखक पुराततत्व संशोधक आहेत.)
































































