प्रासंगिक – देशमुखांसारखा ‘मराठी बाणा’ दाखवावा!

>> योगेंद्र ठाकूर

संयुक्त महाराष्ट्राचा लढा म्हणजे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या इतिहासातील एक देदीप्यमान पर्व आहे. या पर्वात लोकसभेतील डॉ. सी.डी. देशमुखांच्या भाषणांनी मराठी अस्मितेचा अंगार फुलवला. मराठी स्वाभिमानी बाण्याचे दर्शन देशाला घडवले. आज 14 जानेवारी हा डॉ. सी. डी. देशमुखांचा जन्मदिन आहे. त्यांची आज आठवण येणे अपरिहार्य आहे. कारण आज राज्यनिर्मितीच्या 66 वर्षांनंतर मुंबईतील मराठी माणसाला आपल्या अस्तित्वासाठी लढाई करावी लागत आहे. महाराष्ट्रद्वेष्टय़ा सत्ताधाऱ्यांविरुद्ध झगडावे लागत आहे. आजही केंद्र सरकारचा मुंबईकडे बघण्याचा दृष्टिकोन तोच आहे. कॉ. श्रीपाद अमृत डांगे, साथी एस.एम. जोशी, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. सी.डी. देशमुखांसारखा मराठी बाणा मराठी माणसाला दाखवावा लागेल. मुंबई महाराष्ट्रात राहण्यासाठी पुकारलेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि मुंबईसाठी डॉ. सी.डी. देशमुख यांनी आपल्या केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा दिलेला राजीनामा हे मराठी बाण्याचे जाज्वल्य दर्शन घडवते.

21 नोव्हेंबर 1955 रोजी गृहमंत्री मोरारजी देसाईंच्या पोलिसांनी निरपराध मराठी निदर्शकांवर गोळीबार केला तेव्हा या बेछूट गोळीबारात 105 माणसे ठार झाली. यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अधिकच पेटली. जुलै 1956 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांशी साधकबाधक चर्चा न करता तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मुंबई केंद्रशासित करण्याचा महाराष्ट्रविरोधी निर्णय घेतला. त्याचा निषेध म्हणून डॉ. सी.डी. देशमुख यांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला. हिंदुस्थान सरकारने न्यायमूर्ती फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली ‘राज्य पुनर्रचना आयोग’ स्थापन केला होता. महाराष्ट्रद्वेष्टय़ा अमराठी लोकांचा, गुजराती व्यापाऱ्यांचा महाराष्ट्रात मुंबई ठेवण्यास तीव्र विरोध होता. त्याप्रमाणे केंद्रीय मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतला की, महाराष्ट्र, गुजरात आणि मुंबई शहर अशा तीन राज्यांची निर्मिती करावी. हा निर्णय सी.डीं.ना पटला नाही. आर्थिकदृष्ट्या ही योजना योग्य नाही, असा इशाराही त्यावेळी त्यांनी दिला. मुंबई वेगळी केली तर मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या गोरगरीब लोकांना, मराठी कामगार-कर्मचारी वर्गाला रोजगारापासून वंचित राहावे लागेल. पर्यायाने महाराष्ट्रात बेरोजगारी-गरिबी वाढेल अशी त्यांनी भूमिका मांडली आणि धोका दाखवला. सी.डीं.ना केंद्राचा निर्णय न पटल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष देवगिरीकर यांना पह्नवरून नाराजी कळवली. देवगिरीकरांनादेखील हा निर्णय आवडला नाही. देवगिरीकर, भाऊसाहेब पाटसकर आणि आळतेकर हे सी.डीं.ना भेटण्यासाठी दिल्लीला गेले. त्यावेळी या निर्णयाविरोधात सर्वांनी राजीनामे द्यायचे ठरले. परंतु काँग्रेसचे नेते हायकमांडला घाबरले. ‘मी काँग्रेसचा एक पैशाचा लाचार नाही. तेव्हा माझा राजीनाम्याचा निर्णय कायम आहे.’ मुंबई केंद्रशासित करण्याचे विधेयक लोकसभेत मांडले तेव्हा पुन्हा एकदा राजीनामा स्वीकारण्याची विनंती सी.डीं.नी पंतप्रधान नेहरूंना केली. त्यावेळी सी.डीं.ना ‘थोडं थांबा’ असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. पंतप्रधानांनी काँग्रेस विधिमंडळाच्या बैठकीत सी.डीं.ना आपली भूमिका मांडण्याची परवानगी दिली. सी.डीं.नी भूमिका मांडली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. कारण हायकमांडचा निर्णय आधीच झाला होता. या बैठकीतील राग-रंग पाहून सी.डी. बैठकीतून उठले आणि म्हणाले, “मी विरोध नोंदवून लोकसभेतील माझ्या सदस्यत्वाचा राजीनामा देईन. त्यावेळी पंतप्रधान नेहरूंसह ज्येष्ठ मंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी त्यांना बैठक सोडून जाऊ नका असा सल्ला दिला, पण तो सी.डीं.नी मानला नाही. आपण राजीनामा का देत आहोत याची सर्व पार्श्वभूमी त्यांनी लोकसभेत सांगितली आणि अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देऊन सभागृह सोडले. लोकसभेतील सी.डी. देशमुखांच्या भाषणांनी मराठी अस्मितेचा अंगार फुलवला. राजीनाम्याच्या दुसऱ्या दिवशी आचार्य दोंदे आणि आचार्य अत्रे हे डॉ. सी.डी. देशमुखांना भेटावयास गेले. तेव्हा चिंतामणराव म्हणाले, “इतके दिवस संयुक्त महाराष्ट्रासंबंधी मी काहीही कुठे बोलत नव्हतो. म्हणून महाराष्ट्रातले कित्येक लोक माझ्यावर चिडले होते. पण दारूगोळा हा जमवून ठेवायचा असतो. वाटेल तसा रस्त्यावर उधळायचा नसतो ही माझी भूमिका होती. शत्रूच्या सैनिकांच्या डोळ्यांचा पांढरा भाग दिसू लागला म्हणजे मग बंदुका उडवा असे डय़ूक ऑफ वेलिंग्टन आपल्या सैनिकांना सांगत असे. योग्य प्रसंगी मी माझी तोफ डागली म्हणून त्याचा एवढा परिणाम झाला.

डॉ. सी.डी. देशमुखांनी आपल्या जाज्वल्य मराठी अस्मितेचे दर्शन साऱ्या जगाला घडवले. मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेची निवडणूक उद्या होत आहे. मुंबईवरील मराठी ठसा पुसण्याचा प्रयत्न महाराष्ट्रविरोधी भाजपसह महायुतीतील नेते करीत आहेत. मुंबईवरील महाराष्ट्राचा हक्क आणि ठसा पुसून टाकायचे षड्यंत्र पुन्हा एकदा केंद्र व राज्यातील सत्ताधारी करीत आहेत. तेव्हा मराठी माणसाने डॉ. सी. डी. देशमुखांसारखा ‘मराठी बाणा’ दाखवून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव हाणून पाडावा!