
>> संजय कऱ्हाडे
चला मित्रांनो. उठा, मरगळ झटका. दुसऱ्या कसोटीसाठी नव्याने आशा-अपेक्षा बांधा, ताज्या आणाभाका विणा. कसोटी बार्ंमगहॅमच्या एजबॅस्टनला सुरू होतेय अन् हवामान नावाच्या बेइमान प्रेयसीचा नाद सोडला तर खेळपट्टी पहिल्या कसोटीसारखीच असणार!
इंग्लंडने संघ बदललेला नाहीये हिंदुस्थानने मात्र दोन बदल केलेत. थकलेल्या बुमराला विश्रांती देऊन नितीशकुमार रेड्डीला घेतलंय आणि साशंकतेच्या समुद्रात गटांगळय़ा खाणाऱ्या शार्दुलला किनारी बसवून वॉशिंग्टन सुंदरला पाण्यात उतरवलं आहे. बाकी यशस्वी, राहुल, साई, कर्णधार गिल, उपकर्णधार ऋषभ आणि करुण हे सहा फलंदाज कायम ठेवलेत. यष्टिरक्षक ऋषभ फलंदाजीचा सूत्रधार ठरलाय. त्यामुळे नितीश रेड्डीला संघात घेण्याची ऐट आपण मारलेली आहे खरी, पण सहा फलंदाजांप्रमाणे जाडेजा, सिराज आणि प्रसिध कृष्णही संघात टिकून ठेवलेले आहेत.
थोडक्यात, सिराज अन् प्रसिध वेगवान गोलंदाज, नितीश कुमार मध्यम गती आणि जाडेजाच्या साथीला वॉशिंग्टन दुसरा फिरकी गोलंदाज असा आपला शस्त्रभाता असणार आहे. या साडेचार गोलंदाजांना 20 बळी घेणं जमणार आहे का?
दौऱ्यावरील निवड समितीने दुसरी कसोटी अनिर्णित राखण्याच्या दृष्टीने पाऊल उचलल्याचं स्पष्ट दिसतंय. नितीश आणि वॉशिंग्टन आपले खालच्या फळीतले रक्षणकर्ते म्हणूनच चिन्हीत होतायत. कुलदीप, अर्शदीप किंवा आकाशदीप संघात येण्याच्या शर्यतीत हरलेत ते इथेच. हा सामना अनिर्णित राखायचा अन् बुमरा माहेरी जाऊन, खाऊन पिऊन, टुणटुणीत ताजातवाना झाला की मग जमलं तर लॉर्ड्सला जिंकण्याच्या वाटे कूच करायचं! हिंदुस्थानचा हा दृष्टिकोन समजून-उमजून बुडत्यात पाय टाकण्यासारखा ठरू शकतो!
तसंच, बॅझबॉलचा सापळाही संघव्यवस्थापनाला चक्रावून गेलाय. सामन्याचा टॉस म्हणजे इकडे आड, तिकडे विहीर! टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करावी तर बॅझबॉलचा राक्षस समोर ठाकतोय. टॉस गमावला तर इंग्लंडला तेच हवंय! हाच तो राक्षस बाटलीत बंद करण्यासाठी आपली विचारसरणी अधिक स्पष्ट अन् सकारात्मक असणं आवश्यक होतं. असो.
हिंदुस्थानच्या क्रिकेटचं नवपर्व सुरू होतंय हे मान्य असेल तर पंत, राहुल आणि जाडेजाने आपला अनुभव कर्णधार गिलच्या झोळीत भरणं जरुरी आहे. तू चल, आम्ही कपडे सांभाळतो, अशी वृत्ती त्यांनी टाळणं त्यांच्याही कारकीर्दीसाठी उपयुक्त ठरेल.
जाडेजाने 81 कसोटींत 324 बळी घेतलेत आणि 3400हून अधिक धावा केल्यात. नावावर 100 कसोटी, 400 बळी आणि 4000 धावा लागणं त्यालाही नक्कीच आवडेल! हे फक्त दिग्गज कपिल देवला शक्य झालंय! कसोटी क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवणं सोपं नसतं. हिंदुस्थानने सी. के. नायडूंच्या नेतृत्वाखाली 1932 मध्ये पहिली कसोटी खेळली. गेल्या 93 वर्षांत फक्त 14 खेळाडू 100 कसोटी खेळू शकले आहेत. यात महान विश्वनाथ अन् अझरसारख्यांचासुद्धा समावेश नाही! राहुल आणि पंतनेही हीच गोष्ट गाठी मारणं आवश्यक आहे.
आमची काळजी नको. आम्ही आमची शिस्त पाळू – डावा पाय उजव्या पायावर किंवा उजवा सरळ आणि डावा मुडपलेला इत्यादी!
सावळागोंधळ!
बुमरा केवळ पहिली, तिसरी अन् पाचवी कसोटी खेळणार हे म्हणणं मालिकेच्या सुरुवातीलाच गोंधळ उडवून गेलं होतं. त्याने खेळलेल्या सामन्यात किती षटपं टाकायची हे ठरवणारी यंत्रणा आहे असंही सांगितलं गेलं. मग दुसऱ्या कसोटीसाठी एकदा संघ बुमराशिवाय जाहीर झाला. मग तो ‘उपलब्ध’ असल्याचं ऐकिवात आलं! शेवटी त्याचा संघात समावेश झाल्याच्या बातम्या! उत्सुकता तुमच्याएवढीच आमची!