फिरस्ती – तीन टेकड्यांवर वसलेला कनकुप्पे दुर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रांजल वाघ, [email protected]  

कर्नाटकच्या सफरीतील दुर्गरत्न कनकुप्पे जो होयसळचालुक्यांशीही नातं सांगतो. या कनकुप्पे किल्ल्यावर 18 व्या शतकाच्या  शेवटच्या दशकात मराठय़ांचा भगवा जरीपटका फडकत होता. आज्ञापत्र या आपल्या ग्रंथात रामचंद्रपंत अमात्य लिहितातगडाच्या आश्रयाने एखादा डोंगर असावा की जो गडास मारक होय, तरी तो डोंगर खोदून काढावा. इतके घडे तरी त्यावरही एखादा बुरूज किंवा एखादा कोट बांधून मुख्य गडाशी मिळवून घ्यावा.’ 

हाच सिद्धांत वापरून अनेक गडकिल्ले बांधलेले पाहायला मिळतात. महाराष्ट्रात पुरंदर-वज्रगड, अंकाई-टंकाई, राजमाची असे अनेक जुळे किल्ले आहेत, तर छत्रपती शिवरायांनी बांधलेली, सध्या तामीळनाडूमध्ये असलेली स्वराज्याची तिसरी राजधानी ‘जिंजी’ ही तर तब्बल 3 डोंगरांवर वसली आहे. आमच्या कर्नाटकच्या सफरीत आम्ही असे अनेक जुळे किल्ले पाहिले, पण 2022 मध्ये आम्हाला आडवाटेला एक उपेक्षित दुर्गरत्न गवसले. 3 टेकडय़ांवर पसरलेला हा दुर्ग थेट होयसळ-चालुक्यांशी नातं सांगतो आणि आश्चर्य म्हणजे, या किल्ल्यावर 18 व्या शतकाच्या शेवटच्या दशकात मराठय़ांचा भगवा जरीपटका फडकत होता.

बेन्ने डोशासाठी प्रसिद्ध असणाऱ्या दावणगेरे शहराच्या पूर्वेस आणि 7 डोंगरावर पसरलेल्या चित्रदुर्गाच्या किल्ल्याच्या उत्तरेस ‘कनकुप्पे’ नावाचं एक छोटंसं खेड लागतं. त्या गावाच्या मागच्या टेकडीवर आपल्याला काही तटबंदी दिसते. तोच हा कनकुप्पे दुर्ग. सुरुवातीला हा दुर्ग जेव्हा आपण खालून पाहतो तेव्हा वर काय दिव्य वाढून ठेवलंय लक्षात येत नाही.  डोंगराच्या मध्यभागी असलेल्या तटबंदीत लपलेला, किल्ल्याच्या प्रथम प्रवेशद्वारातून आपण पाऊल आत टाकले की लक्षात येतं की, मुख्य किल्ल्याच्या उजवीकडे असलेल्या टेकडीवरसुद्धा तटा-बुरुजांचे थर चढले आहेत आणि यातील कोणत्याही टेकडीवर चढल्यावर या दोघांच्या पलीकडे असलेली एक मोठी किल्लेवजा टेकडी नजरेस पडते. म्हणजे हा किल्ला 3 टेकडय़ांवर पसरला आहे आणि या तिन्ही टेकडय़ांच्या मध्यभागाला तटा-बुरुजा-दरवाजांचे कुंपण घालून सुरक्षित करून घेण्यात आले आहे.

होयसळ, चालुक्य, बहामनी राजवटी पाहिलेल्या, जगलूर तालुक्यात असलेल्या या किल्ल्याला विजयनगर साम्राज्याच्या काळात आजूबाजूचा परिसर आणि व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वापरण्यात यायचे. चित्रदुर्गच्या पाळेगार नायकांच्या ‘चिक्कनायकाने’ हा बांधला असं म्हणतात. तीनही टेकडय़ांवर मुबलक पाणीसाठा करून ठेवण्यात आलेला आहे. टेकडय़ांच्या पायथ्याशी एक बारव आहे आणि देवीचं देऊळदेखील. आजही अनेक इमारतींचे अवशेष, जोती टिकून आहेत.

छत्रपती शिवरायांनी आपल्या दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान या भागातून प्रवास जरी केला नसला तरी थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पहिल्या कर्नाटक स्वारीत त्यांनी चित्रदुर्ग येथील नायकांकडून चौथाई-सरदेशमुखी गोळा केली तेव्हा कनकुप्पेचा त्यात समावेश असण्याची शक्यता आहे. पुढे नानासाहेब पेशव्यांनी जेव्हा कर्नाटकात थेट श्रीरंगपट्टणपर्यंत मुसंडी मारली तेव्हा चित्रदुर्गचे पाळेगार नायक मराठय़ांचे मांडलिक बनले.

1761 मध्ये पानिपतच्या युद्धात झालेलं मराठय़ांचं नुकसान पाहून हैदरने कर्नाटकात मुसंडी मारून चित्रदुर्ग, कनकुप्पे आपल्या ताब्यात आणला खरा, पण माधवराव पेशव्यांनी 1770-71 मध्ये हा भाग पुन्हा मराठय़ांच्या अधिपत्याखाली आणला. पुढे टिपू सुलतानाविरोधात मराठय़ांनी इंग्रजांसोबत आघाडी उघडली तेव्हा 1791 मध्ये सरदार परशुरामभाऊ पटवर्धन यांनी हा संपूर्ण प्रदेश कनकुप्पेसोबत काबीज करून स्वराज्यात आणला.

मराठय़ांशी एक दीर्घ नातं सांगणारा असा हा दुर्लक्षित, पण दुर्ग स्थापत्याचा एक वेगळं आविष्कार असलेला कनकुप्पे दुर्ग इतिहासप्रेमींनी नक्की पाहावा.