मागोवा- कसं वाचवायचं मुलांना?

>>आशा कबरेमटाले

आपल्याकडे आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय हे सहज लक्षात येतं. सर्व आर्थिक स्तरांत, वयोगटांत दिसणाऱया या गंभीर समस्येचा मागोवा…

हिंदुस्थान जगातील सर्वाधिक आत्महत्या होणारा देश आहे. कितीतरी आत्महत्या नोंदल्याही जात नसताना आपण हा बदलौकिक कमावला आहे. देशातील जनतेच्या आरोग्याशी निगडित महत्त्वाची समस्या असताना त्यासंदर्भात काय उपाययोजना केली जातेय?

प्रसारमाध्यमे सनसनाटी पद्धतीने सर्व तपशीलांसह आत्महत्यांच्या बातम्या देतात. या चुकीच्या पद्धतीमुळे
‘कॉपीकॅट स्युसाइड्स’ होतात. म्हणजे एका आत्महत्येच्या बातमीमागे इतर काही आत्महत्या. किमान हे एवढं थांबवण्यासाठी तरी आपण नक्कीच पावलं उचलू शकतो.  कोवळ्या वयाची, तारुण्याच्या-प्रौढत्वाच्या उंबरठय़ावरची मुलं जगण्यापासून नाउमेद होऊन अर्धवट प्रवास सोडून निघून जातात, तेव्हा आपण हबकतो, सुन्न होतो. पण त्यासंदर्भातली परिस्थिती बदलावी याकरिता आपण व्यक्तिगत अथवा सामाजिक पातळीवर काही करतो का? आत्महत्यांच्या संदर्भात सक्रियपणे काम करणारे मनोविकार तज्ञ (सायकिअॅट्रिस्ट) डॉ. हरीश शेट्टी यांच्या मते, कुटुंब, मोहल्ला पातळीवर आपण काम करण्याची गरज आहे. एखादी इमारत, सोसायटी, काका-मामा-मावशी आणि शाळा अशा पातळीवर ही समस्या हाताळता येऊ शकते. सरकारने मानसोपचारांविषयी वाटणारी लाज, संकोच दूर करण्याकरिता मोहीम राबवावी. यात थेट पंतप्रधानांपासून सारे सहभागी झाल्यास ती प्रभावी ठरू शकेल.

आज आपल्या आकांक्षा मोठय़ा झाल्या असून संवाद मात्र खुंटला आहे. एका कुटुंबात एकत्र राहणाऱयांमध्येही भावनिक बंध दिसत नाहीत. एकमेकांसोबत घालवला जाणारा वेळ इतका कमी आहे की, त्यात फक्त जुजबी गोष्टीच बोलल्या जातात. अभ्यास केलास का, परीक्षा कधी आहे, अमुक हवे आहे. इतकेच! यापलीकडचे बोलण्यासाठी मात्र बराच अधिक वेळ एकत्र घालवायला हवा.

डॉ. शेट्टी म्हणतात, आज मुले तीन ठिकाणी शिकतात. शाळा, क्लासेस आणि आईचा क्लास. अनेक गोष्टी मुलांवर लादल्या जातात.

उच्चभ्रू वर्गात व्यावसायिक जबाबदाऱया व जीवनशैलीमुळे आई-वडिलांकडे मुलांसाठी पुरेसा वेळ नाही, तर गरीब वर्गात कामामुळे, प्रवासावर खर्ची होणाऱया वेळामुळे कुटुंबाने एकत्र घालवण्याचा वेळ कमी झालाय. उशिरा घरी पोहोचणे, टीव्ही पाहणे, उशीरा झोपणे, अवेळी येणारे पाणी… कारणे भिन्न आहेत, पण झोप सर्वच आर्थिक गटांत अपुरीच दिसते. आम्हाला हे मिळत नव्हते, ते मिळत नव्हते, याचा उल्लेख पालक करतात. तू एकुलता एक आहेस, तुला जे पाहिजे ते आम्ही देतो, याचाही उच्चार होतो. पण हवे ते सगळे मिळत गेल्यानेच घात होतो. छोटे-छोटे नकार पचवण्याची क्षमताच विकसित होत नाही. दुःखं झेलण्याची सवय लागत नाही. परिस्थितीशी जुळवून घेण्याची मानसिकता तयार व्हावी लागते, ती तयार होत नाही. हे सारे जगण्याचा भाग कोण आणि कसे बनवणार?

डॉ. शेट्टी सुचवतात, छोटय़ा, न्युक्लिअर कुटुंबांनी इतर तशाच कुटुंबांसोबत वेळ घालवावा. ‘पूल पेरेंटिंग करावे,’ म्हणजे काय तर, चार कुटुंबांतील एकाला गणित चांगले येत असल्यास त्या एकाने सगळ्यांच्या मुलांना गणित शिकवावे. एकाने सगळ्यांना सायकल शिकवावी. मग तुमची मुले कदाचित तुमच्यापेक्षा या काका-मामांचे अधिक ऐकतील.

शेजारधर्म पाळा हे आज सांगावे लागत आहे. शेजारच्या घरात कुणी मरून पडते, कुजल्यासारखा वास येऊ लागतो, तेव्हा आपण तक्रार करतो? इमारतीत कुणी गेल्याचे आपल्याला निव्वळ नोटीस बोर्डावर वाचून कळते.

मी किनई शाळेत मुलाला सोडायला गेले की, उग्गाच त्या बाकीच्या आयांसारखी हिच्या-तिच्याशी गप्पा मारत बसत नाही, कथित आधुनिक मम्मांची विचारसरणी ही अशी दिसते. जोडले न जाण्याचा अभिमान बाळगतो आज आपण.

डॉ. शेट्टी म्हणतात, मुलांना वाचवायचे असेल तर त्यांच्या भोवती एक समुदाय उभा करा. आजचे जगणे सोपे नाही हे लक्षात घ्या. मुलाला त्याच्या स्वतःच्या सहनशक्तीच्या बळावर आपण सोडू शकत नाही. मी जेव्हा-जेव्हा पालकांना हे तुम्ही तुमच्या नणंदेला वा दीराला का सांगत नाही? त्यांना हे हाताळण्यात सामील का करून घेत नाही, असे विचारतो. तेव्हा उत्तर मिळते, नणंदेला? छे, ती अख्ख्या जगाला सांगत फिरेल. मदत तर दूरच राहील.

कुणाचा कुणावर आज विश्वास नाही. एकेकटे बेटासारखे जगणे. संवाद तुटलेला. मग मुलांनी तरी आपली दुःख, नैराश्य कुणापाशी बोलून दाखवायचे?

पालकांनी आपल्या विवंचना मुलांशी शेअर कराव्यात. अर्थात त्यांच्या वयाला साजेशा पद्धतीनेच. म्हणजे आई-वडिलांनाही समस्या असतात आणि ते त्यांना कसे तोंड देतात हे मुलांना कळेल. परिस्थितीवर तोडगा काढण्यात मुलांनाही सामील करा, त्यांचा सल्ला घ्या.

आकांक्षा, महत्त्वाकांक्षा असण्यात गैर काही नाही. पण त्याहीपेक्षा आपल्या मुलाच्या क्षमतेचा, त्याच्या आवडीनिवडींचा, त्याच्या व्यक्तिमत्वाचा ‘स्वीकार’ थोडा मोठा असू द्या. डॉ. शेट्टींचा आणखी एक सल्ला. वयात आलेला मुलगा-मुलगी प्रेमात पडली. मग तिचा तो जोडीदार कुठल्याही जाती-धर्माचा का असेना, त्याला-तिला घरी बोलवा. बोला. जगात माणसे जितक्या संख्येने प्रेमात पडतात, त्यापेक्षा कितीतरी अधिक संख्येने ‘ब्रेकअप्स’ होतात. तरुण वयातील मुलांना हे सांगून ठेवा. त्यातली मजाही गमतीजमतीत सांगता येते. हे अनुभव जगण्याची शहाणीव वाढवतात हेही. ‘सुंदर न दिसणाऱया’ मुलांना आजच्या दिखाव्याच्या जगात अधिक सांभाळायला हवे. आपले शरीर, रंगरूप याचा स्वीकार करणे लहानपणापासून त्यांच्या मनावर बिंबवायला हवे.

मोबाईल फोन वा तत्सम उपकरणांच्या अतिवापरातूनही आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याची नोंद आता जागतिक पातळीवर घेतली जातेय. समाजमाध्यमांचे दुष्परिणाम उजेडात येतायत. याबाबतीत शाळांनी पुढाकार घेऊन काम केले पाहिजे. महाराष्ट्रातील एक छोटेसे गाव आहे, ‘मोहित्यांचे वडगाव.’ अतिशय छान पद्धतीने या गावाने रोज संध्याकाळी सात ते साडेआठ या वेळेत सर्व गावकऱयांनी मोबाईल, टीव्ही दूर ठेवण्याची योजना राबवली आहे! ओळखीच्या कुटुंबांना, शेजाऱयांना, शाळेतील मुलांना सोबत घेऊन असा प्रयत्न करता येऊ शकेल.

निसर्गाशी संपर्क वाढवणे गरजेचे झाले आहे. किती मुले आज ऊन, वारा, पाऊस, माती यांच्या संपर्कात खेळत मोठी होतात याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा आहे.

मुलांच्या मानसिक समस्यांमध्ये कुटुंबातील समस्यांचा मोठा वाटा असतो हे लक्षात घेतले पाहिजे व आवश्यक तिथे पालकांनी स्वतःही मानसोपचारांची मदत घेतली पाहिजे. मानसोपचार घेण्याविषयी समाजात जी लाज किंवा संकोच बाळगला जातो, तो दूर केला जाण्याची तर नितांत गरज आहे.

[email protected]