मुद्दा – डहाणू विभागातील रेल्वे समस्या

>> दयानंद पाटील, सचिव, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था

मध्यंतरी केळवे रोड स्थानकाजवळ घडलेली घटना ही केवळ एका गाडीपुरती मर्यादित नव्हती, ती आपत्कालीन व्यवस्थापनातील गंभीर त्रुटींचा स्पष्ट पुरावा होती. 59023 वलसाड फास्ट पॅसेंजर गाडी उभी असताना तिच्या इंजिनातून धूर निघाला आणि काही वेळातच त्याचे आगीत रूपांतर झाले. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गाडी थांबवली असली तरी खरी अडचण तेव्हा जाणवली, जेव्हा आग विझविण्यासाठी बोलावलेल्या अग्निशमन गाडय़ा प्रत्यक्ष अपघातस्थळी पोहोचू शकल्या नाहीत. चिखलमय, खड्डेयुक्त आणि अरुंद रस्ते, रेल्वे रुळाजवळील अपुरी पोहोच आणि नियोजनाचा अभाव यामुळे वाहने लांबच थांबवावी लागली. शेवटी पाइपलाइन ओढून आग विझविण्यात आली.

यापूर्वीही अनेकदा असेच अनुभव आले आहेत. दररोज लाखो प्रवासी प्रवास करणाऱ्या या मार्गावर गाडय़ांची संख्या वाढली असली तरी आपत्कालीन व्यवस्थापनाच्या मूलभूत गरजा मात्र कायम दुर्लक्षित राहिलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर डहाणू-विरार चौपदरीकरण प्रकल्प ही एक मोठी संधी आहे. केवळ अतिरिक्त रेल्वेमार्ग बांधणे हा उपाय नाही, तर आपत्कालीन परिस्थितीत योग्य रीतीने परिस्थिती हाताळता येईल अशी ठोस यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. रेल्वे रुळांना समांतर रस्ते, स्थानकांवर अत्यावश्यक वाहनांसाठी प्रवेश मार्ग, पर्यायी वाहतूक सुविधा आणि नियमित सराव (मॉक ड्रिल) अशा बाबींचा विचार या प्रकल्पात समाविष्ट व्हायला हवा.

केळवे रोडवरील प्रसंग ही एक धोक्याची सूचना देणारी घटना आहे. शासन, रेल्वे प्रशासन, स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन या सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन योग्य नियोजन केले तरच प्रवाशांचा विश्वास टिकून राहील आणि भविष्यातील धोके कमी करता येतील, किंबहुना टाळता येतील.

इ.स. 2013 मध्ये सुरू झालेल्या डहाणू लोकल 12 व्या वर्षात मार्गक्रमण करत असताना ज्या 21 अप 21 डाऊन फेऱ्या उपलब्ध आहेत त्या वाढत्या प्रवासी संख्येमुळे कमी पडू लागल्या आहेत आणि गर्दीचे प्रमाण इतके वाढले आहे की, सफाळे, वैतरणा स्थानकांत प्रवाशांना लोकलमध्ये चढणे जिकिरीचे झाले आहे. तसेच विरार स्थानकात डहाणू लोकलमध्ये उभे राहणे कठीण झाले आहे

डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविणे अतिशय आवश्यक असून काही लोकल 15 डब्यांच्या करणे गरजेचे आहे. आज डहाणू लोकलच्या किमान 5 अप आणि 5 डाऊन अशा फेऱ्यांची आवश्यकता असून तशा फेऱ्या सुरू करणे शक्य आहे. कारण न्यू उमरगाव ते न्यू सफाळे हा मालवाहतूक रेल्वेमार्ग स्वतंत्ररीत्या सुरू झाला आहे. त्यामुळे प. रेल्वेच्या मुख्य मार्गावरील अंदाजे 20 मालगाडय़ा dfcc मार्गावर वळविण्यात आल्याने बऱ्यापैकी ‘स्पेस’ उपलब्ध झाली आहे.

डहाणू लोकलच्या किमान पाच फेऱ्या अंदाजे खालील वेळेत अपेक्षित आहेत.

मुंबईकडे जाण्यासाठी डहाणूहून (अप) 

1) पहाटे 3:50 2) सकाळी – 7:45 3) संध्याकाळी- 4:45 4) संध्याकाळी- 6:15 5) रात्री – 11:30

डहाणूकडे जाण्यासाठी विरारहून (डाऊन)

1) सकाळी- 6:34 2) दुपारी – 2:24 3) संध्याकाळी- 5:30 4) रात्री- 8:10 5) रात्री- 10:15

4 सप्टेंबर 2025 पासून कोरोना काळात सफाळे स्थानकात बंद केलेला 22927-28 लोकशक्ती एक्स्प्रेस गाडीचा थांबा पूर्ववत केल्यामुळे सफाळेवासीयांच्या पहाटेच्या गाडीचा प्रश्न सुटला असला तरी ही गाडी मुंबईकडे जाताना डहाणू, वाणगाव, उमरोळी, केळवे रोड आणि वैतरणा स्थानकांत थांबत नसल्याने या स्थानकांतील प्रवाशांचा पहाटेच्या गाडीचा प्रश्न ‘जैसे थे’ राहिला आह़े

गेल्या वर्षी 12 ऑक्टोबर 2024 पासून उपनगरीय लोकलचे नवीन वेळापत्रक अमलात आले होते आणि डहाणू लोकलच्या 2 अप, 2 डाऊन नवीन फेऱ्या वाढविण्यात आल्या होत्या. आता येणाऱ्या नवीन वेळापत्रकातसुद्धा वरीलप्रमाणे डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात आल्यास विरार-डहाणू चौपदरीकरण पूर्ण होईपर्यंत प्रवाशांना काही अंशी गर्दीच्या त्रासातून मुक्तता मिळेल आणि सुखकर प्रवास करता येईल.