
>> शुभांगी बागडे
कॅनडाच्या संरक्षण सेवेत कार्यरत राहून कॅनडा ते भारत असा सत्यानंद गायतोंडे यांच्या कार्याचा विस्तारलेला आलेख. पोलीस दलाची प्रतिमा अधिकाधिक उंचावली जावी यासाठीचे त्यांचे प्रयत्न नवी उमेद देणारे आहेत.
जगभरातील विविध क्षेत्रात मराठी माणसाने मोहोर उमटवली आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांची कामाबाबत असलेली श्रद्धा आणि समर्पित वृत्ती. कामाबाबत श्रद्धा, समर्पण आणि मुख्यत शिस्त याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले सत्यानंद गायतोंडे यांनी कॅनडामधील इंटेलिजन्स ब्युरोमध्ये कामाचा ठसा उमटवला आहे.
गिरगावातील मराठमोळ्या वातावरणात वाढलेले सत्यानंद गायतोंडे आज आंतरराष्ट्रीय पातळीवर संरक्षण सेवेत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. संरक्षण क्षेत्रात कार्यरत राहण्यासाठी अनुरूप असेच त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. शिस्त, कामातील नैपुण्य, विविध भाषांचे ज्ञान, छाप पाडणारी देहबोली आणि संवाद कौशल्य या गुणांसोबत त्यांच्यातील वक्तादेखील कार्यरत आहे. आपल्या पोलीस सेवेतील कारकीर्दीत प्राप्त झालेल्या अनुभवांचा आणि कौशल्याचा फायदा इतरांना व्हावा याकरिता सत्यानंद यावर आधारित व्याख्यान देतात. मार्गदर्शनपर अशा व्याख्यानांसाठी त्यांना विविध देशांतून आमंत्रित केले जाते. आतापर्यंत त्यांनी अनेकविध विषयांवर व्याख्यान दिले असून भारतातील व्याख्यानांची शंभरी त्यांनी पार केली आहे.
सत्यानंद यांची मूळ आवड मार्शल आर्ट्स. या क्रीडा प्रकारात ते पारंगत असून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मार्शल आर्टमधील तंत्राचा त्यांना त्यांच्या कामात खूप लाभ झाला. इंग्लंडमध्ये शिक्षण घेतल्यानंतर ते काही वर्षे मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते. त्यानंतर कॅनडामधील पोलीस सेवेत कार्यरत होते. पोलीस सेवेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. वेगवेगळ्या प्रोजेक्टवर मुख्य पदावर काम केले. या अनुभवाच्या आधारावरच त्यांची कॅनडातील इंटेलिजन्स ब्युरोसारख्या महत्त्वाच्या विभागात निवड झाली. याबाबत ते सांगतात, “पोलीस सेवेतील कामाचा दांडगा अनुभव या क्षेत्रात कामी आला. मुळात ही दोन्ही क्षेत्रं देशाच्या प्रशासनाशी निगडित आहेत. देशातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीवर महत्त्वाची जबाबदारी असते, दडपण असते. इंटेलिजन्समधील कामात गोपनीयता हा अत्यंत महत्त्वाचा आणि आवश्यक भाग. यात सर्व वैशिष्ट्ये आत्मसात असलेल्या व्यक्तीवरच कामाची जबाबदारी दिली जाते. ती मी पार पाडत आहेच. यात आतापर्यंत मी जे शिकलो- मग ते मार्शल आर्ट असो वा फिटनेस- अनेक परकीय भाषांचे ज्ञान व एकूण संपूर्ण सकारात्मक व्यक्तिमत्त्व, त्या साऱ्याचा इथे फायदा झाला.” सत्यानंद गायतोंडे यांचे व्यक्तिमत्त्व संरक्षा सेवेला साजेसे असे आहे. जगण्यातील सकारात्मकता आणि शिस्त याच्या जोरावर यश फार दूर ठेवू शकत नाही, असे ते म्हणतात. त्यामुळेच जगभरात त्यांचा चाहतावर्ग विस्तारलेला आहे.
पोलीस सेवा हे क्षेत्र वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करते. या कामाला कोणतेच मर्यादित स्वरूप नाही, परंतु यातील प्रत्येक काम हे समाजाभिमुख असल्याने पोलीस सेवेची प्रतिमा चांगली राखण्याची महत्त्वाची जबाबदारी पोलिसांना पार पाडावी लागते. ही पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये कशी आत्मसात करावीत याबाबत मार्गदर्शन करण्याकरिता सत्यानंद यांना जगभरातून पाचारण केले जाते. आपल्या महाराष्ट्र पोलीस दलासाठी सत्यानंद यांनी विशेष मॉडेल विकसित केले असून त्या त्या विभागातील जबाबदाऱयांवर आधारित कार्यक्षमता, समस्या, कमतरता आणि त्यावरील मात अशा स्वरूपाचे मार्गदर्शन ते करतात.
आतापर्यंत जगातील विविध देशांत त्यांची ही लेक्चर्स झाली असून त्यामुळे त्यांची वेगळी ओळख तयार झाली आहे. याबाबत सत्यानंद सांगतात, “पोलीस सेवा हे क्षेत्र समाजातील प्रत्येक घटकाशी जोडलेले असते. त्यामुळे सेवा हा भाव ठेवत, संपूर्ण कामात विशिष्ट भूमिका घेत नैपुण्य, कौशल्य आणि प्रशासनाची प्रतिमा राखणारी कार्यक्षमता कशी राखावी यासाठी या लेक्चर्सच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते. महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा बदलण्यात आपले योगदान असावे यासाठी मी प्रयत्नशील असतो.”
सत्यानंद यांची भारतातील विविध पोलीस दलांसाठीही मार्गदर्शनपर व्याख्याने झाली आहेत. या मार्गदर्शनात मार्शल आर्टचा विशेष लाभ झाल्याचे ते सांगतात. त्यांच्या व्याख्यान मॉडेलची सुरुवात मार्शल आर्ट प्रशिक्षणानेच होते. यासोबत मानसिक संतुलन, फिटनेस, संवाद कौशल्य, निर्णय क्षमता, परिपूर्ण कार्यक्षमता, रागावरील नियंत्रण अशा अनेक विषयांबाबत मार्गदर्शन केले जाते. त्यांच्या या प्रशिक्षणाचा लाभ झाल्याचे सेवेतील अधिकारी वर्ग कळवतो तेव्हा सत्यानंद यांना आपले प्रयत्न सार्थकी लागल्याचे समाधान मिळते.
सत्यानंद गायतोंडे यांच्या कार्याचा आढावा घेताना महाराष्ट्राच्या मुशीत घडलेले त्यांचे संस्कार ठळकपणे अधोरेखित होतात. कॅनडाच्या संरक्षण सेवेत कार्यरत राहून कॅनडा ते भारत असा त्यांच्या कार्याचा विस्तारलेला आलेख नवी ऊर्मी देणारा, उमेद जागवणारा आहे.
भारतातील वाहतूक पोलीस दलासाठी काम करण्यावर सत्यानंद यांचा विशेष भर आहे. या विभागातील अनेक त्रुटी व कमतरता त्यांना लक्षात आल्या. तसेच एका अपघाती घटनेमुळे त्यांचा वाहतूक पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. वाहतूक पोलीस विलास शिंदे यांना ‘ट्रफिक पोलीस’ म्हणून कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. या घटनेनंतर सत्यानंद यांनी वाहतूक पोलीस दलासाठी विशेष मार्गदर्शन करीत कर्तव्य, नियम, त्यासाठीची तयारी, कार्यक्षमता, प्रतिमा याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विविध केंद्रांवर व्याख्याने दिली आणि या अनुभवाच्या आधारावर त्यांनी `Police Officer Safety & Traffic Management’ हे पुस्तक लिहिले. केवळ वाहतूक पोलीसच नव्हे, तर भारतातील वाहतूक व्यवस्थेचा चेहरा बदलण्यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरणारे असे आहे. सत्यानंद यांचे हे प्रयत्न नक्कीच स्तुत्य म्हणायला हवेत. त्यांच्या या योगदानामुळे वाहतूक विभागाची प्रतिमा बदलण्यास सुरुवात झाली आहे असे म्हणता येईल.