
>> ईशान खन्ना
भारताच्या वायू प्रदूषणाच्या संकटाकडे सहसा नेहमीच्याच चौकटीतून पाहिले जाते. हिवाळ्यातील धुकं, वाहनांमधून निघणारे धूर, शेतीतील अवशेष जाळल्यानंतरचे धूर आणि नियमांच्या अंमलबजावणीतल्या त्रुटी. या प्रदूषणाला कधी पर्यावरणीय समस्या म्हणून मांडले जाते, तर कधी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून. तर अनेकदा केवळ ऋतूमधील गैरसोय म्हणून त्याकडे पाहिले जाते. मात्र या संकटाचा आणखी एक फारसा न उलगडलेला पैलू आहे. वायू प्रदूषण आता भारतातील लोकांचे वार्धक्य लवकर येण्यावर थेट परिणाम करू लागले आहे.
जगातील सर्वाधिक प्रदूषित असलेल्या 20 शहरांपैकी तब्बल 13 शहरे भारतात आहेत. जानेवारी महिन्यात सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (CREA) यांनी तपासलेल्या भारतातील जवळपास निम्म्या शहरांनी राष्ट्रीय वायू गुणवत्तेची मर्यादा ओलांडली. इतकेच नव्हे तर जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेली दररोजची सुरक्षित मर्यादाही पार केली. महाराष्ट्रातील शहरेही याला अपवाद नाहीत. मुंबईमध्ये PM2.5 चे प्रमाण सातत्याने सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त नोंदवले जाते, ज्यात हार्वर्डच्या एका अभ्यासानुसार, एकटय़ा मुंबईतच दरवर्षी सुमारे 5,100 मृत्यूंसाठी वायू प्रदूषण कारणीभूत ठरते.
त्याच वेळी भारतातील लोकांचे वार्धक्य झपाटय़ाने वाढत चालले आहे. 2036 पर्यंत देशात 60 वर्षांवरील लोकांची संख्या जवळपास 23 कोटींवर पोहोचेल आणि 2050 पर्यंत भारत जगातील सर्वात जास्त ज्येष्ठ नागरिक असलेल्या देशांपैकी एक ठरेल. घसरत चाललेली हवेची गुणवत्ता आणि वाढत चाललेली ज्येष्ठ नागरिकांची संख्या या दोन गोष्टी एकत्र आल्याने आरोग्य व्यवस्था, कुटुंब व्यवस्था आणि देशाची आर्थिक उत्पादकता यांच्यावर दूरगामी परिणाम होणार हे मात्र नक्की.
दीर्घकाळ वायू प्रदूषणाच्या संपर्कात राहिल्यामुळे हृदयाचे आजार, रक्तदाब, स्ट्रोक, मधुमेह, हाडांचा कमकुवतपणा आणि मेंदूच्या आजारांचा धोका लवकरच वाढतो हे सिद्ध झाले आहे. भारतात हे आजार आधीच मृत्यू आणि अपंगत्वाची प्रमुख कारणे आहेत. वायू प्रदूषण नागरिकांच्या तारुण्यातच शरीराला ‘हळूहळू नुकसान’ पोहोचवते आणि ते ज्येष्ठ नागरिक बनल्यावर या आजारांना घेऊनच जीवनातील असंख्य आव्हानांना तोंड द्यावे लागते. हा हानीकारक परिणाम आरोग्यावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. 2023 मध्ये वायू प्रदूषणामुळे भारतात अंदाजे 232 दशलक्ष निरोगी आयुष्य संपले. वृद्ध लोकांचा याचा प्रचंड मोठा वाटा होता. कारण वयस्क झालेले शरीर पर्यावरणीय ताणातून सहज बरे होत नाही. आयुष्य वाढत जाते. त्यामुळे वायू प्रदूषणामुळे उद्भवणारे दीर्घकालीन आजार या वयात जीवनाच्या दर्जावर म्हणजेच आरोग्यावर थेट परिणाम करतील. भारतामध्ये आजच्या काळात लोकांचे एकूण आयुष्य जेवढे असते त्यामधून निरोगी आयुष्य फारच कमी असते. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे आयुष्य निरोगी जीवन जगण्याऐवजी जास्त काळ आजारपणांसोबतच जगावे लागते.
दीर्घकालीन आजार आणि शरीराच्या कमजोरीमुळे शरीराची हालचाल कमी होते, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक आपला 90 टक्के वेळ जास्त घरात घालवतात. घरात मोकळी हवा मिळू शकत नाही. त्यामुळे झ्श्2.5 स्तर वाढतो. स्वयंपाकाचा धूर, धूळ आणि वाहतुकीमुळे रस्त्यांमधून येणारा धूर यामुळे हवेतील प्रदूषण बाहेरील पातळीपेक्षा जास्त असू शकते. मुंबईसारख्या दाट वस्तीच्या शहरांमध्ये हे सतत होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये दीर्घकालीन आजारांचा धोका अधिक वाढतो.
वायू प्रदूषण, आरोग्य चर्चेचा केंद्रबिंदू आहे ‘सँडविच जनरेशन’: 30-40 वयोगटातील लोक जे त्यांचे करीअर सांभाळत असतात, मुलांना वाढवतात आणि वयस्क पालकांची काळजी घेतात, त्यांच्यासाठी वायू प्रदूषणामुळे आरोग्य खर्च वाढतो, कामाची उत्पादकता कमी होते आणि दीर्घकालीन आजार लवकर सुरू होतात. त्याचबरोबर त्यांच्या मुलांनाही याचा फटका बसतो. लहान वयात प्रदूषित हवा श्वासातून घेतल्यामुळे फुप्फुसाची वाढ मंद होते. IQ सुमारे 20 गुणांनी कमी होतो. वेळेपेक्षा लवकर जन्म होण्याचा, उंची कमी होण्याचा आणि ऑनिमियाचा धोका वाढतो, ज्यामुळे ते मोठे झाल्यावरही जास्त असुरक्षित राहतात. त्यामुळे प्रत्येक पिढी तिच्या मागच्या पिढीपेक्षा वृद्धावस्थेत गेल्यावर आरोग्याने दुर्बल असल्याचे दिसून येते.
भारताची 2047 पर्यंत विकसित देश होण्याची इच्छा 2050 मधील लोकसंख्या बदलाशी जुळते. शतकाच्या मध्यभागी सुमारे 350 दशलक्ष भारतीय नागरिक ज्येष्ठ नागरिक बनलेले असतील. याचा अर्थ असा की, हवा, आरोग्य सेवा, शहर नियोजन आणि सामाजिक सुरक्षा यावर आज आपण जे धोरण ठरवतो, ते फक्त आर्थिक वाढ नाही, तर शेकडो दशलक्ष लोकांचे वृद्धत्व कसे राहील, हेही ठरवेल.
वृद्धांची जास्त संख्या होत चाललेल्या भारतासाठी तयारी करण्याचा अर्थ असा की, स्वच्छ हवा ही प्रतिबंधक आरोग्य सेवा म्हणून पाहणे. याचा अर्थ फक्त स्वच्छ वाहतूक, उद्योग आणि चांगल्या रचनेच्या शहरांमध्ये गुंतवणूक करणे नाही, तर ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे आणि त्यांची काळजी घेण्याची उत्पादने व सेवा ही सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा मुख्य आधार बनवणे हेसुद्धा आहे. याचा अर्थ असासुद्धा होतो की, ज्येष्ठ नागरिकांची काळजी ही फक्त वैद्यकीय सेवा नाही, तर सामाजिक आणि आर्थिक जबाबदारीदेखील आहे. आज घेतलेल्या निर्णयांवर ठरेल की, भारत 2047 पर्यंत फक्त वृद्ध आणि श्रीमंतच होईल का? की तितकाच निरोगी, टिकाऊ आणि वृद्धावस्था आनंदाने जगणारासुद्धा बनेल.






























































