
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
इतिहास साक्ष आहे की, व्हिएतनाम असो वा अफगाणिस्तान, केवळ हवाई ताकदीच्या जोरावर मोठी राष्ट्रे युद्ध जिंकू शकलेली नाहीत. इराणच्या संदर्भातही जर अमेरिकेला किंवा इस्रायलला निर्णायक विजय हवा असेल तर त्यांना जमिनीवरील युद्धाचा धोका पत्करावाच लागेल. जोपर्यंत ‘बूट्स ऑन द ग्राऊंड’ (Boots on the Ground) म्हणजेच सैनिकांचे पाय जमिनीवर पडत नाहीत, तोपर्यंत शत्रू शरणागती पत्करणार नाही.
गेल्या सहा आठवडय़ांपासून सुरू असलेले इराण-अमेरिका-इस्रायल युद्ध केवळ पारंपरिक लष्करी संघर्ष नसून आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि सायबर युद्ध यांचा संगम असलेले एक बहुआयामी युद्ध आहे. या संघर्षाने संपूर्ण मध्यपूर्वेतील सामरिक संतुलन ढासळवले असून जागतिक राजकारण, ऊर्जा पुरवठा आणि आर्थिक स्थैर्यावर त्याचे दूरगामी परिणाम होत आहेत.
युद्धाच्या सुरुवातीला इराणने आक्रमक भूमिका घेत अमेरिकन तळांवर आणि इस्रायलवर हल्ल्यांची मालिका सुरू केली, परंतु अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त आणि तंत्रज्ञानाधारित प्रत्युत्तरामुळे इराणच्या लष्करी क्षमतेवर मोठा आघात झाला आहे. तरीदेखील संघर्ष अजूनही निर्णायक टप्प्यावर पोहोचलेला नाही आणि त्याचा विस्तार होण्याची शक्यता कायम आहे.
पहिल्या टप्प्यात इराणने आक्रमणाची सुरुवात करत आपली ‘असममित युद्ध’ (Asymmetric Warfare) रणनीती प्रभावीपणे वापरली. इराणने लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक मिसाईल्सचा वापर करून अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील लष्करी तळांवर हल्ले केले. इस्रायलच्या प्रमुख शहरांना लक्ष्य करून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. ‘कामीकाझे’ (आत्मघाती) ड्रोनचा मोठय़ा प्रमाणावर वापर करून नौदल जहाजे, तेलसाठे आणि पायाभूत सुविधा लक्ष्य करण्यात आल्या. कमी खर्चात जास्त नुकसान करण्याचा हा प्रयत्न होता. मात्र इस्रायलच्या अत्याधुनिक Iron Dome संरक्षण प्रणालीमुळे बहुतांश हल्ले हवेतच निष्प्रभ करण्यात आले. त्यामुळे नागरी हानी मोठ्या प्रमाणात टळली.
दुसऱया टप्प्यात इराणच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देताना अमेरिकेने ‘प्रेसिजन स्ट्राईक’ तत्त्वावर आधारित कारवाई केली. अमेरिकेने टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्र्ााचा वापर करून इराणच्या कमांड सेंटर, हवाई संरक्षण प्रणाली आणि क्षेपणास्त्र तळांवर अचूक हल्ले केले. स्टेल्थ फायटर जेट्स (उदा. ई-35) आणि प्रगत ड्रोनच्या मदतीने ‘सर्जिकल स्ट्राईक्स’ करण्यात आले. सायबर युद्धाच्या माध्यमातून इराणची संचार व्यवस्था, वीजपुरवठा आणि ऊर्जा नेटवर्क विस्कळीत करण्यात आले. या टप्प्यात अमेरिकेने ‘नॉन-कॉन्टॅक्ट वॉरफेअर’ची प्रभावी अंमलबजावणी करत शत्रूला थेट भिडण्याऐवजी दुरूनच त्याची क्षमता खिळखिळी केली.
यानंतर अमेरिका आणि इस्रायलने एकत्रितपणे “Epic Fury” नावाची संयुक्त मोहीम राबवली. सुमारे 900 हवाई हल्ल्यांद्वारे इराणच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. क्षेपणास्त्र साठे, ड्रोन उत्पादन केंद्रे आणि कमांड अँड कंट्रोल सिस्टम उद्ध्वस्त करण्यात आली.
इराणचे सर्वोच्च नेतृत्व या प्रचंड दबावाखाली आले असले तरी त्यांनी पूर्णतः शरणागती पत्करलेली नाही. उलट, त्यांनी ‘दीर्घकालीन प्रतिकार’ (Prolonged Resistance) धोरण स्वीकारले आहे.
इराणच्या लष्करी क्षमतेवर मोठा परिणाम झाला असून त्यांची 70-80 टक्के क्षमता नष्ट झाल्याचे मानले जाते. हवाई संरक्षण प्रणाली, क्षेपणास्त्र साठे आणि कमांड सेंटर मोठय़ा प्रमाणात उद्ध्वस्त झाले आहेत. या युद्धात नागरी भागांवर मोठा परिणाम झाला आहे. रुग्णालये, शाळा, विद्यापीठे आणि निवासी क्षेत्रांवर हल्ले झाले. हजारो नागरिक विस्थापित झाले आहेत. इराणची अर्थव्यवस्था कोसळण्याच्या उंबरठय़ावर आहे. तेल उत्पादन आणि निर्यात मोठय़ा प्रमाणात घटली आहे. अमेरिकेवर युद्धखर्चाचा ताण वाढत आहे.
मध्यपूर्वेतील स्थैर्य धोक्यात आले आहे. इतर देश (सौदी अरेबिया, तुर्की) या संघर्षात अप्रत्यक्षपणे सहभागी होण्याची शक्यता वाढली आहे. सध्याच्या इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षात, महिनाभर चाललेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांनंतर युद्ध एका ‘स्टेलमेट’कडे (काsंडी) झुकले आहे, ते म्हणजे आधुनिक युद्धशास्त्रात एक मूलभूत सत्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे ः हवेतून शत्रूला जखमी करता येते, पण त्याला पराभूत करण्यासाठी जमिनीवर पाय ठेवावाच लागतो. युद्ध जिंकण्यासाठी आणि शत्रूची लढण्याची क्षमता पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी जमिनीवरील युद्ध (Ground Offensive) आवश्यक ठरणार आहे.
हवेतून सोडलेली क्षेपणास्त्रे शत्रूच्या इमारती किंवा शस्त्रसाठे नष्ट करू शकतात, परंतु त्यातून नेमके किती नुकसान झाले आहे, याचा अचूक अंदाज (Battle Damage Assessment) लावणे कठीण असते. शत्रू अनेकदा आपले महत्त्वाचे तळ जमिनीखाली किंवा डोंगराळ भागात लपवतो. जोपर्यंत पायदळ तिथे जाऊन प्रत्यक्ष ताबा मिळवत नाही, तोपर्यंत तो पुन्हा डोके वर काढू शकतो.
पाच हजार ते सात हजार सैनिक तैनात करण्याची तयारी अमेरिकेने सुरू केली आहे. विशेष दल (Special Forces) इराणच्या उर्वरित क्षेपणास्त्र तळांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतील. तेहरानसारख्या महत्त्वाच्या शहरांवर नियंत्रण मिळवण्याचे उद्दिष्ट असू शकते.
अमेरिकेला इराणवर पूर्ण विजय मिळवण्यासाठी जमिनीवरील युद्ध अपरिहार्य ठरेल. इस्रायल हवाई समर्थन व संरक्षण प्रणालीद्वारे महत्त्वाची भूमिका बजावेल. इराणची लष्करी आणि आर्थिक क्षमता वेगाने घटत असल्याने दीर्घकाळ युद्ध टिकवणे कठीण जाईल. अर्थात गोरिला युद्ध आणि प्रॉक्सी गटांच्या माध्यमातून इराण संघर्ष लांबवू शकतो. नागरी हानी प्रचंड प्रमाणात वाढू शकते. युद्धाचा विस्तार संपूर्ण मध्यपूर्वेत होण्याची शक्यता आहे.
जमिनीवरील युद्ध खालील चार प्रमुख उद्दिष्टांसाठी आवश्यक आहे
- नेतृत्वाचा खात्मा ः शत्रूचे राजकीय आणि लष्करी नेतृत्व सुरक्षित बंकर्समध्ये बसून युद्ध चालवते. हवाई हल्ल्यांपासून हे बंकर्स सुरक्षित असू शकतात. जमिनीवरील सैन्याला या अड्डय़ांवर धाडी टाकून नेतृत्व ताब्यात घेणे किंवा नष्ट करणे शक्य होते.
- लढण्याची क्षमता शंभर टक्के नष्ट करणे ः जोपर्यंत शत्रूच्या तोफा, रणगाडे आणि क्षेपणास्त्र लाँचर्सवर प्रत्यक्ष ताबा मिळवला जात नाही, तोपर्यंत तो ‘गनिमी काव्या’ने युद्ध सुरूच ठेवतो.
- महत्त्वाच्या शहरांवर ताबा ः युद्ध संपवण्यासाठी शत्रूची राजधानी किंवा महत्त्वाची औद्योगिक शहरे (उदा. तेहरान किंवा इस्फाहान) ताब्यात घेणे गरजेचे असते, ज्यामुळे शत्रूचे मनोबल पूर्णपणे खचते.
- तेल निर्यात बेटे आणि ऊर्जा स्रोत ः इराणसारख्या देशाची आर्थिक शक्ती त्यांच्या तेल निर्यात करणाऱया बेटांवर (उदा. खार्क आयलंड) अवलंबून आहे. या बेटांवर लष्करी नियंत्रण मिळवल्याशिवाय त्यांची आर्थिक रसद तोडता येत नाही.
इतिहास साक्ष आहे की, व्हिएतनाम असो वा अफगाणिस्तान, केवळ हवाई ताकदीच्या जोरावर मोठी राष्ट्रे युद्ध जिंकू शकलेली नाहीत. इराणच्या संदर्भातही जर अमेरिकेला किंवा इस्रायलला निर्णायक विजय हवा असेल तर त्यांना जमिनीवरील युद्धाचा धोका पत्करावाच लागेल. जोपर्यंत ‘बूट्स ऑन द ग्राऊंड’ (Boots on the Ground) म्हणजेच सैनिकांचे पाय जमिनीवर पडत नाहीत तोपर्यंत शत्रू शरणागती पत्करणार नाही.































































