नवलच – कृत्रिम बेटं किती?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरुण

सध्या आखाती प्रदेशात युद्धाचा आगडोंब उसळलाय आणि त्यामध्ये दुबईने प्रचंड पैसा खर्च करून समुद्रात तयार केलेल्या कृत्रिम ‘पाम आयलॅण्ड‘ किंवा माडाच्या आकाराच्या बेटाचाही ‘घास’ घेतला जातोय. ‘पाम जुमीरा’ नावाने ओळखल्या जाणाऱया कृत्रिम ‘माडा’ची रचना करण्यासाठी समुद्रात 1410 एकर जागेत भराव टाकण्यात आला. खरं तर दुबईच्या सत्ताधीशांना ‘पाम देहरा’चा (म्हणजे दर्या?) आकार सध्या आहे त्याच्या आठपट करायचा होता म्हणे… परंतु पैशांची टंचाई झाली आणि सध्या आहे ते बेट आकाराला आलं. आकाशी फोटोग्राफीतून ते माडाच्या (किंवा खजुराच्या) झाडासारखंच विस्तारलेलं दिसतं. याशिवाय त्यांना जगाच्या नकाशाच्या आकाराचं ‘द वर्ल्ड’ नावाचं बेटसमूह आणि विश्वाकार म्हणजे ज्यात ग्रह, नक्षत्र, आकाशगंगेच्या आकाराची बेटं असतील असा अनेक कृत्रिम बेटांचा समूह उभारायचा होता.

माणसाने ‘बनवलेलं’ सर्वांत मोठं बेट आहे नेदरलॅण्डसमध्ये. जवळपास 900 चौरस किलोमीटर भागातली खाडी बुजवून ‘फ्लोनोपोल्ड‘ नावाचा एक द्वीप-प्रांतच साकारला. त्याची राजधानी आहे लेलिसॅड. 1950 ते 60 या दशकभरात हे समुद्र हटवण्याचं काम चाललं होतं आणि त्यावर त्यावेळी 70 कोटी डॉलर खर्च झाले होते. जपानने तर ओकासा शहराजवळच्या उपसागरात 10 अब्ज डॉलर खर्चून बांधलेला विमानतळ जगाचं लक्ष वेधून घेतो. तो तयार करण्यासाठी त्यांना समुद्रात 180 क्युबिक मीटर भराव घालावा लागला. त्याच्या उभारणीसाठी 10 हजार कामगारांनी 1 कोटी मानवी तास (कामाचे तास) खर्ची घातले. 1994 मध्ये हा सागरी विमानतळ बांधून पूर्ण झाला. विमानतळानजीकच्या लोकांना विमानाच्या कर्कश आवाजाचा त्रास होऊ नये या उद्देशाने कानसाई विमानतळ समुद्रातच एक बेट तयार करून बांधला!

कतार देशातलं ‘पर्ल आयलॅण्ड‘ हा असाच मानवनिर्मित उपक्रम. राजधानी दोहा या शहराच्या किनाऱयाजवळच चार चौरस किलोमीटरचं एक कृत्रिम बेट बांधलं गेलं. ती जागा पूर्वी मोत्याचा शोध (सागरतळी जाऊन) घेणाऱया पाणबुडय़ांची (डायव्हर) होती. म्हणून या बेटाला पर्ल (मोती) बेट असं नाव देण्यात आलं.

अशा प्रकारे पृथ्वीवर समुद्र किंवा खारजमिनी हटवून कृत्रिमरीत्या बनवलेली सुमारे 300 बेटं आहेत. त्याचा उद्देश पर्यटन वाढवणे आणि विविध प्रकारच्या उद्योगांना चालना देण्याचा आहे. हे सारं करताना तिथल्या मत्स्य-जैववैविध्याचं काय होतंय किंवा झालं याची चिंता ‘शहाणा’ माणूस कशाला करेल?