ठसा – महादेव मोरे

>> प्रशांत गौतम

दलित, वंचित, शोषित, विडी कामगार, देवदासी, स्त्राr कामगार, ट्रक ड्रायव्हर, क्लीनर, वेश्या व त्यांचे दलाल, गॅरेज, हमाल अशा शोषित घटकांच्या जीवनाचे चित्रण करणारे, निपाणी, बेळगाव परिसरातील जनसामान्यांचे जीवन व त्यांचे दुःख साहित्यातून प्रभावीपणे मांडणारे लेखक म्हणजे महादेव मोरे. 16 कथासंग्रह, 18 कादंबऱयांमधून त्यांनी वंचित घटकांचे जीवन विलक्षण ताकदीने चित्रित केले. पहिल्या पिढीतील डॉ. आनंद यादव, प्राचार्य रा.रं. बोराडे यांच्यासारख्यांनी ग्रामीण साहित्याची ओळख करून दिली, तर साठनंतर याच पिढीतील महादेव मोरे यांनी आपल्या कथा-कादंबरी लेखानातून भरीव योगदान दिले. महादेव मोरे यांचा जन्म 22 जून 1939 रोजी बेळगाव जिह्यातील निपाणी येथे झाला. घरची परिस्थिती बेताची. वडील टॅक्सी चालक. लहान भाऊ पिठाची गिरणी चालवून कुटुंबाला हातभार लावत असे. महादेव मोरे यांच्यामधील लेखक समोर आला तो महाविद्यालयात असताना. महाविद्यालयाच्या हिरवळ भित्तीपत्रकाने कथा स्पर्धा जाहीर केली. यात त्यांनी ‘म्हाईचा दिवस ’ ही कथा लिहिली आणि ती प्रथम पारितोषक प्राप्त ठरली. पुढे ती नियतकालिकातही प्रकाशित झाली. सा. ‘स्वराज्य’मध्ये 22 ऑक्टोबर 1959मध्ये काही बदल करून हीच कथा आली आणि कथालेखन मोबदला म्हणून दहा रुपये मानधनही मिळाले. काही लिहिले की पैसे मिळतात, हे त्यांना समजले. लेखक म्हणून त्यांना आनंद वाटला; पण इंटरला नापास झाल्याने त्यांचे शिक्षण तेथेच थांबले. अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी कथालेखनास प्रारंभ केला. छान प्रतिसाद मिळत गेला. विविध पारितोषिके मिळाल्याने लेखनाची प्रेरणा मिळत गेली. निपाणीच्या शाळेत असतानाच त्यांची जडणघडण होण्यास सुरुवात झाली. शालेय जीवनात साने गुरुजी, वि.स. खांडेकर हे त्यांचे आवडते लेखक. नंतरच्या उमेदीच्या काळात पु.भा. भावे, अरविंद गोखले, शरश्चंद्र चटर्जी, अच्युत बर्वे हे आवडते लेखक होते. एवढेच नाही तर त्यांना गोखले आणि भावे यांच्या लेखनाने विलक्षण झपाटून टाकले. मोरे म्हणतात, ‘त्या काळात ग्रामीण लेखकांनी प्रभाव दाखवला नाही. त्यामुळेच मी विहीर, मोट, नाडा, चावडी, पाटील, अशा रुढ चाकोरीत अडकलो नाही, तर त्यापेक्षा वेगळे लिहू शकलो. म्हणूनच माझ्या कथा-कादंबरीत वखारीतील स्त्रिया, हमाल, दिवाणजी, बिछायती, तंबाखूचे जग आले. मोटार ड्रायव्हर, क्लीनर, मेस्त्राr, व्हल्कनायझर, वेल्डर हे विश्व आले. पुढे पोलीस आणि आरटीओ हेही पात्रात आले. जोगतिणीचे जग उभे राहिले.’

त्यांना रोजनिशी लिहिण्याची सवय असल्याने कथा लेखन सोपे झाले आणि त्यानंतर कादंबरी लेखन हे अधिक सोपे झाले; त्याचे महत्त्वाचे फलित म्हणजे 16 कादंबरी लेखन आणि 18 कथा लेखन हे सांगता येईल. ‘तुझी कथा माझे शब्द’, ‘वस्ती’, ‘सूर्याखाली डोळा’, ‘वाट’, ‘कर्णफुले’ यासारख्या कथा वृत्तपत्रातील रविवार पुरवणीत येऊ लागल्या. पुढे तुझी कथा माझे शब्द, हे संग्रह रूपाने आले. ते ललित लेखनही करीत असत. तसेच त्यांनी काही बंगाली कथांचे रुपांतरीत लेखन केले. कादंबरी लिहून पाहवी, या उत्सुकतेने ‘पाव्हणा’ ही कादंबरी लिहिली. लेखन काळात तीन प्रकरणे ‘अलिबाबा’च्या अंकात प्रसिद्ध झाली. नंतर ती पुण्याच्या अभिरुची प्रकाशनाने प्रकाशित केली, हीच त्यांची पहिली कादंबरी. टॅक्सी ड्रायव्हर,क्लीनर, मेस्त्राr यांच्या आयुष्याचे चित्रण करणारी कादंबरी ‘एकोणिसावी जात’ ही ‘मेनका’मधून प्रकाशित झाली. या कादंबरीमुळे त्यांना नवीन कादंबरी लेखनासाठी विश्वास मिळाला. समीक्षकांना मोरे यांच्या कादंबरी लेखनात विषय, रचना, तंत्र, भाषा व शैली असल्याचे जाणवले आणि लेखकाला आपली म्हणून लेखनाची नेमकी वाट सापडली. त्यांनी केवळ श्रमजीवींचे विश्व आपल्या लेखनात आणले नाही तर त्यांनी सामाजिक आणि त्या राजकीय लढय़ातही सहभाग घेतला. विविध चळवळीतही ते सक्रिय होते. एका मुलाखतीत मोरे यांनी आपली लेखन प्रक्रिया सांगितली, ते म्हणतात, ‘पिठाच्या गिरणीत बसून मी लिहितो, दोन-चार ओळी लिहून झाल्या की ग्राहक दळण घेऊन येत, दळण आटोपून पुन्हा लिहायला सुरुवात केली की पहिले दुवे आठवावे लागतात. दिवसभर काम करून दमतो, तरीही रात्री गिरणीत बसूनच लिहितो, तेव्हा डास चावतात. उंदीर, घुशी इकडून तिकडे पळत असतात, त्यांना हाकलायला मी काठी घेऊन बसलेला असतो. एका हातात लेखणी, दुसऱया हातात काठी असे सुरू असे. दिवसभर अनेक स्वभावाचे ग्राहक दळण घेऊन येतात. प्रसंगी वाद-विवाद,भांडणही होतात; पण यामुळे माझा मूड खराब होत नाही. अशाही परिस्थितीत मी लिहितोच.’ मोरे हे 1960नंतरच्या काळातील महत्त्वाचे ग्रामीण साहित्यकार होत. तेव्हापासून ते 2024पर्यंतच्या प्रदीर्घ कालखंडात कथा-कादंबरीतून विपुल प्रमाणात लिखण केले. तंबाखू उत्पादकांचे आंदोलन हा झोंबड कादंबरीचा विषय, त्यातील स्थानिक राजकारण आल्याने लेखनच अस्सल व वेगळे ठरते. म्हणूनच आधुनिक आंदोलनाचा वेध घेणारी मोरे यांची झोंबड ही कादंबरी आजपर्यंतच्या मराठी ग्रामीण कादंबरीच्या इतिहासात पहिली कादंबरी ठरली. 1960नंतर शेती सहकार, शिक्षण यात अनेक चळवळी झाल्या, या घटनांचे पडसाद त्यांच्या लिखणात उमटल्याचे दिसते. मोरे हे अस्सल लोकजाणिवांचे लेखन करणारे ग्रामीण साहित्यकार होते.