
>> डॉ. सतीश देसाई
दैनिक ‘सामना’ दिल्लीचे ब्युरो चीफ नीलेशकुमार सुशिला मधुकरराव कुलकर्णी यांचे ‘संसद भवन ते सेंट्रल विस्टा…’ हे पुस्तक म्हणजे पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणे दिल्लीच्या या कालावधीत झालेल्या बदलांचे अचूक चित्रण आहे. संसदीय लोकशाहीच्या अनुषंगाने येणाऱया प्रश्नांचे यामधून पूर्णपणे निराकरण होते. या काळातील राजधानी दिल्लीत झालेल्या अनेक प्रसंग, घडामोडींचे लेखक नीलेशकुमार कुलकर्णी साक्षीदार असल्यामुळे त्या घटनांचा बोलका इतिहासच त्यांनी या पुस्तकात मांडला आहे. त्याच्या जोडीला त्यांनी रेखाटलेले दोन्ही वास्तूंचे वर्णन अत्यंत यथार्थ व त्या त्या घटनानुरूप प्रत्यक्ष डोळय़ासमोर उभे करणारे झाले आहे.
स्वातंत्र्य चळवळीच्या कुंडात ज्या अनेक थोर ज्ञात-अज्ञातांनी आपले जीवन हवन केले, अशांचा या पुस्तकात केलेला उल्लेख त्यांच्याविषयीचा आदर वाढविणारा व प्रेरणादायी वाटतो. मोगल साम्राज्य हिंदुस्थानात प्रस्थापित होण्याच्या पूर्वीपासून दिल्ली व महाराष्ट्राचा अविभाज्य संबंध आहे आणि तो महाराष्ट्रातील अनेक राजधुरिणांच्या कर्तबगारीने अधोरेखित झाला आहे. थोडक्यात, मध्यवर्ती राज्यकारभाराचे एक चाक दिल्ली असेल तर दुसरे चाक महाराष्ट्र असे खचितच म्हणता येईल. याचे उदाहरण म्हणून आदरणीय यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख केल्यास त्याची प्रचीती येते. ‘संसद भवन ते सेंट्रल विस्टा…’ या अभ्यासपूर्ण व संशोधन करून लिहिलेल्या पुस्तकातून लेखकाने पहिले पंतप्रधान नेहरू ते मोदी यांच्यापर्यंतच्या पंतप्रधानांनी आपापल्यापरीने केलेल्या देशहिताचा, देशसेवेचा उल्लेख आवर्ज्नू केला आहे.
संसदेवर झालेल्या हल्ल्याचे व संसद भवनातील घुसखोरीचे ‘आँखों देखा हाल’ लेखकाने निर्भीडपणे मांडला आहे व तो ‘सामना’च्या परंपरेतील वाटतो. अशा या अभ्यास व संशोधनपूर्ण लेखनामुळे हे पुस्तक या विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्कृष्ट संदर्भ ग्रंथ म्हणून आणि राजकीय कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत प्रबोधन करणारे आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.