
>> अशोक बेंडखळे
शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र देशात स्वराज्याची स्थापना करून त्यांच्या हयातीत त्याचा बराच विस्तार केला आणि ती राजनीती महाभारत, मनुस्मृती व पादिकांच्या नीती ग्रंथातील तत्त्वास अनुसरून होती. ती राजनीती नेमकी काय होती हे सांगणारे ‘शिवाजीची राजनीती’ पुस्तक भास्कर वामन भट यांनी लिहिले असून पुण्याच्या राजवाडे संशोधन मंडळाने ते प्रसिद्ध केले आहे. ( इ.स. 1941) 436 पानांचे हे पुस्तक बऱ्याच संदर्भांसह दिले असून त्याच्या वाचनातून अनेक शतके कोटय़वधी लोकांमध्ये ज्या प्रकारचा मानव जन्मास आलेला नाही असे शिवाजी महाराज लोकोत्तर महापुरुष होते ही प्रतिमा मनावर ठसते.
शिवाजीराजांनी विजापूर बादशहा, दिल्लीचे मुघल, पोर्तुगीज, गोवळकोंडय़ाचा नवाब या प्रबळ सत्ताधाऱ्यांशी झगडा करून स्वराज्याचा विस्तार केला आणि तो त्यांनी विशिष्ट राजनीतीच्या आश्रयाने केला. प्रारंभी ध्येय होते. ते असे- ‘दक्षिण देश सर्व म्लेंछानी ग्रासला आहे. प्रजेस बहुत पीडा जाली, धर्म अगदी बुडाला तेव्हा धर्म रक्षणार्थ प्राण वेचून धर्म रक्षावा आणि आपले परामांनी नवीन दोस्त संपादावे’ या ध्येयासाठी त्यांनी क्रमाक्रमाने पावले टाकली. राज्याचा कोषागार, दुर्ग, सैन्य व आरमार युद्धपद्धती आणि प्रजेचे रक्षण या बाबींमधून राजांचे वेगळेपण जाणून घेता येते.
स्वराज्य स्थापनेसाठी अफाट सैन्य, कोशा वाचून शक्य नव्हते. कोशवृद्धीसाठी अनेक योजना अमलात आणल्या. मुलखातील जमिनीची पाहणी करून व धाऱ्याची रक्कम निश्चित ठरवून त्याच्या वसुलीसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. सैन्याचा प्रचंड खर्च भागविण्यासाठी आदिलशहाच्या व मोगल बादशहाच्या मुलखातील मोठमोठ्या शहरातील पेठांची लूट केली.सुरत, बऱहाणपूर, कारवार श्रीरंगपट्टम, नाशिक, कल्याण, भिवंडी अशा चौदा शहरांची लूट करून प्रचंड द्रव्य मिळवले.
शिवाजीराजांच्या स्वराज्याची मजबुती त्यांच्या किल्ल्यात होती. त्यामुळे त्यांच्या काळात दुर्गांचे महत्त्व कायम राहिले. स्वराज्याच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या स्थळी नवीन किल्ल्यांची आवश्यकता आहे व कोणता महत्त्वाचा किल्ला शत्रूच्या ताब्यातून घेणे आवश्यक आहे, हे राजांना तत्काळ ध्यानात येई व त्या धोरणाने ते हालचाली करीत. त्यांच्या कारकीर्दीत 360 किल्ले त्यांच्याकडे होते. या किल्ल्यांच्या डागडुजीसाठी व देखभालीसाठी प्रचंड खर्च येई तो ते करीत. महाराजांनी स्वराज्य रक्षणास्तव व वृद्धीस्तव अनेक पुरातन दुर्ग जिंकून वा नवीन बांधून त्यांची जोपासना केली.
राजांनी सुरुवातीच्या तात्पुरत्या मावळे लोकांच्या सैन्यातूनच खडी सेना निर्माण केली. त्यांचे दल दोन प्रकारचे होते. एक पायदल, दुसरे घोडदल. युद्धकलेचे ज्ञान व शिक्षण शिपायांना देण्याची खबरदारी घेतली जाई, तसेच शिपायांची मनोरचना बनविण्यासाठी घेतली जाई. इंग्रजांचे आरमार बलिष्ट होते, त्याची दहशत राजांच्या लक्षात आली व स्वतचे आरमार अल्प काळात तयार केले. समुद्राच्या काठालगत त्यांनी किल्ले बांधले. त्यामुळे समुद्राच्या बाजूने शत्रूकडील हल्ल्याच्या प्रतिकाराचे साधन व आरमारास आश्रयाची जागा मिळाली.
युद्ध पद्धतीचा विचार करताना मोंगलानी उत्तरेत कूटयुद्ध पद्धतीचा वापर करून यश मिळवले हे राजांनी पाहिले होते. तेव्हा स्वराज्य स्थापनेचे ध्येय ठेवल्यावर व खडे सैन्य तयार केल्यावर या कूटयुद्ध पद्धतीचाच आश्रय घेतला. त्यांनी घोडदलास फार महत्त्व देऊन हे दल उत्तम प्रकारचे तयार केले. सुरत शहरावर लुटीसाठी स्वारी करताना जव्हार व रामनगरच्या राजांनी त्यांच्या राज्यातून सैन्य नेण्यास परवानगी नाकारली तेव्हा त्या राज्यांवर स्वारी करुन ती राज्ये काबीज केली. हा एक कूटनीतीचा भाग इतर शहरांसाठीही वापरला. राजे अनेक राज्यांच्या दरबारात आपले हेर विपुल द्रव्य देऊन ठेवीत.
त्याकाळात जंजिरेकर सिद्दी तसेच पोतुर्गीज राज्यकर्त्यांकडून हिंदू लोकांचा मुसलमानांपेक्षा अधिक छळ होत असे. राजांनी हिंदू धर्मीयांना भारतखंडातील कोणत्याही राज्यसत्तेखाली असले तरी त्यास त्यांचे धर्मानुसार आचरण करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असावे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा जुलूम होऊ नये अशी स्थिती राजांनी निर्माण केली. कधी त्या राज्यसत्तेला तंबी देऊन तर कधी त्यांच्यावर स्वारी करून. राजानी मुसलमान धर्मीयांना पवित्र असलेल्या कुराण आणि मशीद पूज्य मानून त्यांचा अपमान केला नाही. तसेच मुसलमान धर्मीयांची मने अकारण दुखावली नाहीत. त्यामुळे सामान्य मुसलमानांच्या मनात राजांविषयी आदर व प्रेम उत्पन्न झाले.
राजनीतीची दोन प्राणभूत तत्त्वे म्हणजे शक्ती आणि युक्ती ही होत. शिवाजीराजांच्या आयुष्यात पाच प्राणघातक संकटे आली. पाचही वेळी त्यांनी युक्तीचा आश्रय घेऊन सुटका केली. शक्ती व युक्ती या तत्त्वांचा राजांच्या ठायी सर्वोत्कृष्ट मिलाफ झाला होता आणि त्यावर अनुपमेय यश प्राप्त केले. राजसत्ता टिकविण्यासाठी राजनीतीचे ज्ञानही आवश्यक असते. शिवाजी महाराजांकडे ते पुरेपूर होते याचे सुंदर विवेचन या पुस्तकातून मिळते हे या पुस्तकाचे यश होय.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)



























































