लेख – पेपरफुटी व कॉपीमुक्त परीक्षांचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अनंत बोरसे

शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकार, कॉपी, पेपरफुटीचे लागलेले ग्रहण, यामुळे शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे, गुणवत्ता घसरली आहे, दरवर्षी लाखो विद्यार्थी डिग्री घेऊन बाहेर पडत आहेत. त्यामुळे बेरोजगारांची संख्या भरभर वाढत आहे. परीक्षार्थींच्या खऱया गुणवत्तेचा कस लागायचा असेल तर कॉपी, पेपरफुटीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना होणे गरजेचे आहे. कायदे, नियम कितीही केले तरी ते पाळण्याची सर्वांची मानसिकता असणे गरजेचे आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी बीड, जालना, अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी खुद्द पालकच कॉपी पुरवताना दिसत होते. कॉपीमुक्त – पेपरफुटीमुक्त परीक्षांचे आव्हान या वर्षीदेखील आहे तसेच आहे.

राज्यात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असलेली बारावीच्या परीक्षा झाली. त्यानंतर दहावी आणि इतर परीक्षा सुरू आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे एक वेगळे महत्त्व आहे. यावरच विद्यार्थ्यांची पुढील दिशा ठरते, करिअर घडते. कुठल्याही परीक्षांचा मुख्य उद्देश असतो तो गुणवत्तेचा कस परीक्षार्थीच्या आकलनाची क्षमता, विषयांचा सखोल अभ्यास आणि यावरच ठरते ती गुणवत्ता. मात्र गेल्या काही वर्षांपासून केवळ शैक्षणिक परीक्षा नव्हे तर नोकरभरतीची परीक्षा असो की पदोन्नतीसाठीची परीक्षा असो, या सगळ्या परीक्षांना कॉपी आणि पेपरफुटीचे ग्रहण लागले आहे आणि यामुळे खऱया गुणवत्तेचा कस लागत नाही की गुणवंतांना संधी मिळत नाही. दरवर्षी कॉपीमुक्त परीक्षांसाठी शिक्षण मंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जातात, शासन आदेश निघतात तरीदेखील कॉपी मोठय़ाप्रमाणावर होते, काही परीक्षा केंद्रात तर तेथील शाळा, शाळेचे शिक्षक, संस्थाचालक यांच्या मदतीनेच कॉपी पुरवली जाते तर अगदी पोलीस बंदोबस्त असतानादेखील कॉपी पुरवली जाते, कॉपी पुरवणे, पेपर फोडणे यात मोठी आर्थिक देवाणघेवाण होते तसेच आपल्या शाळेचा निकाल चांगला लागावा यासाठी अनेक शाळा, संस्था हेदेखील कॉपी पुरवण्यात सहभागी असतात हे अनेकदा अधोरेखित झाले आहे. काही परीक्षा केंद्रे तर यासाठी कुप्रसिद्ध आहेत. या वर्षी स्थानिक प्रशासनाने परीक्षा केंद्र परिसरातील पाचशे मीटरपर्यंत झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत.

दरवर्षी कॉपी प्रकरणात सापडल्यास कारवाईचा इशारा दिला जातो, परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचा इशारा दिला जातो, काही वेळा थातुरमातुर कारवाई होतेदेखील. तर अनेकदा पेपर तपासणारे शिक्षकच मार्क वाढविण्याचे अनेक प्रकार घडतात. या वर्षी परीक्षा केंद्रांवर ड्रोनच्या सहाय्याने नजर ठेवली जाणार असे सांगितले गेले. कॉपी करताना पकडला गेल्यास गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला. त्याच बरोबर भरारी पथकाचीदेखील करडी नजर असणार आहे. याच संदर्भात मध्यंतरी शिक्षकांच्या अदलाबदलीचा विषय चर्चेत आला होता. मात्र त्याला काही शिक्षक संघटनांनी विरोध केला. कोणत्याही परीक्षा केंद्रात गैरप्रकार घडला तर तसे करणाऱयांवर थेट अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे. मात्र तरीदेखील गैरप्रकार होण्याचे काही केल्या थांबताना दिसत नाही.

शिक्षण श्रेत्र किती बरबटलेले हे अनेकदा अधोरेखित झाले आहे. देशाचा किंवा राज्याचा कारभार हाकताना आयएएस, आयपीएस या पदांचे महत्त्व मोठे आहे, राज्यव्यवस्था याच कार्यपालिकेच्या मदतीने राज्यकारभार करते. या पदावर नियुक्ती होताना तितक्याच अग्निपरीक्षेच्या दिव्यातून कसोटय़ा पार करून जावे लागते, त्यासाठी केंद्रीय स्तरावर यूपीएससी तर राज्यात एमपीएससी मार्फत परीक्षा घेतल्या जातात, सर्वतोपरी काळजी, नियम अटी, यांचे पालन करून सर्व प्रक्रियांचे काटेकोर पालन करूनच, उमेदवारांची निवड केली जात असणार, मात्र गेल्या काही वर्षांपासून युपीएससी असो की एमपीएससी असो की इतर परीक्षा घेणाऱया संस्थांच्याही कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, पुण्यातील ‘पूजा’ प्रकरणावरून तर ते अधिक स्पष्ट झाले आहे. राजकीय पक्ष, नेते, वरिष्ठ नोकरशहा, अधिकारी, कंत्राटदार, दलाल, उद्योगपती यांची एक भ्रष्ट साखळी निर्माण झाली आहे आणि या साखळीने सगळ्याच यंत्रणा पोखरल्या गेल्या आहेत. ओळख, वशिला, पैसा, राजकीय वरदहस्त, सत्तेची साथ असेल तर सगळे काही विकत घेता येते, कोणताही, नियम, कायदा याला बगल देता येते. विद्यादानाचे पवित्र क्षेत्र असो की डॉक्टर, इंजिनीअर, वकील यासारखे पांढरपेशी व्यवसाय असो की सरकारी क्षेत्रातील नोकरभरतीसाठी होणाऱया स्पर्धा परीक्षा, नोकरीभरती, सगळीकडे प्रत्येक टप्प्यावर भ्रष्टाचार बोकाळला आहे चिरीमिरी दिल्याशिवाय कुठलेच काम होत नाही. आता तर चिरीमिरीची मजल करोडो रुपयांपर्यंत पोहचली आहे. भ्रष्टाचार हे कालातीत सत्य आहे. जगभर भ्रष्टाचार बोकाळला आहे. परीक्षा आणि गैरप्रकार, घोटाळे हे गेल्या काही वर्षांपासून समीकरणच बनले आहे आणि गैरप्रकाराविरुद्ध परीक्षार्थींनी आवाज उठवला, आंदोलने केली तर त्यांचा सहानुभूतीने विचार करण्याऐवजी आंदोलने दडपली जातात. त्यांना राष्ट्रद्रोही, अर्बन नक्षलवादी ठरवले जातात आणि खऱया गुन्हेगारांना पाठीशी घालत विद्यार्थ्यांवरच कारवाईचा बडगा उगारला जातो.

शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकार, कॉपी, पेपरफुटीचे लागलेले ग्रहण, यामुळे शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे, गुणवत्ता घसरली आहे, दरवर्षी लाखो विद्यार्थी डिग्री घेऊन बाहेर पडत आहेत. त्यामुळे बेरोजगारांची संख्या भरभर वाढत आहे. परीक्षार्थींच्या खऱया गुणवत्तेचा कस लागायचा असेल तर कॉपी, पेपरफुटीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना होणे गरजेचे आहे. कायदे, नियम कितीही केले तरी ते पाळण्याची सर्वांची मानसिकता असणे गरजेचे आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी बीड, जालना, अमरावती जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी खुद्द पालकच कॉपी पुरवताना दिसत होते. कॉपीमुक्त – पेपरफुटीमुक्त परीक्षांचे आव्हान या वर्षीदेखील आहे तसेच आहे.