
>> राम महादेव कदम
राष्ट्रीय चर्मकार संघ या संघटनेने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. त्या निमित्ताने आज (14 मार्च 2026) संध्याकाळी 5 वाजता चर्मकार समाजाचा ‘निर्धार मेळावा’ धारावीच्या डॉ. मनोहर जोशी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त लेख.
वर्णव्यवस्था आणि जातीभेद पूर्वीसारखे आता राहिलेत तरी कुठे? असा सवाल आजकाल चर्चांमध्ये मानभावीपणे विचारला जातो, पण आजही दलितांवर ग्रामीण भागात होणारे अत्याचार, हिंसक हल्ले विसरले जातात. दलितांमधील इतर अनुसूचित जातींच्या आणि आदिवासींमधील महिलांवरही अत्याचारांच्या घटना राज्यात घडत आल्या आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय चर्मकार संघ झटत आहे. राज्यातील चर्मकार समाजात एकूण 34 जाती आहेत. त्यांना अंधश्रद्धा, कर्मकांडे यातून मुक्त करण्यासाठी प्रबोधन आणि जागृतीवर या संघटनेने कायम भर दिला आहे. त्यातून परिवर्तनाला चालना मिळू लागली आहे. आता चर्मकार समाजही महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांच्या विज्ञानवादी विचारांची कास धरू लागला आहे, न्यायासाठी संघर्षाला सिद्ध होऊ लागला आहे.
बाबुराव माने हे तब्बल चार दशके चर्मकार समाजाच्या हितासाठी निरनिराळ्या संघटनांच्या माध्यमातून झटत आहेत, त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय चर्मकार संघ हा 2001 पासून खऱ्या अर्थाने वाढीस लागला. आजघडीला प्रत्येक तालुक्यात जवळपास 30 क्रियाशील कार्यकर्ते संघटनेसाठी कार्यरत आहेत. संत रविदास यांच्या सोबतच महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही फोटो घरात असले पाहिजेत ही पूर्वअट कार्यकर्त्यांना चर्मकार संघाने लागू केलेली आहे. त्यामुळे चर्मकार समाज आणि आंबेडकरी, बहुजनवादी चळवळ त्यांच्यात सुसंवाद, समन्वय वाढू लागला आहे.
राष्ट्रीय चर्मकार संघ ही संघटना सध्या अनेक आघाडय़ांवर काम करत आहे. तिचे कार्य हे गटई कामगारांना स्टॉल मिळवून देणे आणि त्यांच्या अडचणींचे निवारण करण्यापुरते मर्यादित नाही. अन्याय – अत्याचारांच्या प्रकरणांत गुन्हेगारांना शिक्षा मिळेपर्यंत लढण्याची आमची भूमिका ठाम राहिली आहे. संघटनेचे एक ज्येष्ठ नेते अॅड. नारायण गायकवाड यांच्यासारखे निष्णात वकील अॅट्रॉसिटी अॅक्टखाली दाखल झालेले पीडितांचे खटले विनामूल्य लढवत आले आहेत. खेडोपाडी चर्मकार कुटुंबांच्या वडिलोपार्जित जमिनी जातदांडग्यांनी, धनदांडग्यांनी गिळंकृत केल्याची प्रकरणे अधूनमधून समोर येत असतात. अशा अनेक प्रकरणांत ती जमीन मुक्त करून चर्मकार कुटुंबांना मिळवून देण्यात संघटनेला यश आले आहे.
तसेच दलित विकासाच्या सरकारी योजनांचा लाभ चर्मकार समाजाला मिळवून देण्यासाठी जाणकार कार्यकर्ते जिल्हा-तालुका पातळीवर परिश्रम घेत आहेत. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेद्वारे चर्मकार समाजातील मजुरी काम करणाऱया अनेक भूमिहीन बांधवांना कसण्यासाठी जमीन मिळवून देण्यात आली आहे. त्यातून त्यांच्या कुटुंबांना स्थैर्य प्राप्त झाले आहे. त्यातून संघटनेबद्दलचा समाजातील विश्वास वाढला आहे.
मात्र कोणत्याही संघटनेला राज्यात सर्वदूर पोहोचण्यात, विस्तारण्यात संसाधनांच्या अभावामुळे मर्यादा पडत असतात. शिवाय गाव, तालुका पातळीवर सर्वच समाजांच्या असंख्य स्थानिक संस्था – संघटना कार्य करत असतात. ते लक्षात घेता चर्मकार समाजातील तशा छोटय़ा मोठय़ा संस्था, संघटनांना जोडण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार संघाने चर्मकार ऐक्य परिषद स्थापन केली आहे. त्याला उत्तम प्रतिसाद मिळून सुमारे 25 संस्था, संघटना त्या परिषदेत सहभागी झाल्या आहेत.
उपवर्गीकरण अमान्य
दलितांना आरक्षणाचा लाभ कितपत पोहोचला याचा हिशेब एकदाचा केंद्र आणि राज्य सरकारांनी मांडला पाहिजे. तसेच राखीव जागांचा अनुशेष किती आहे, हे जगासमोर आले पाहिजे, पण त्याऐवजी आरक्षणाच्या लाभाचा जातीनिहाय हिशेब मांडत उपवर्गीकरण लागू करण्याचा खटाटोप सुरू झाला आहे. त्यातून अनुसूचित जातींना आपापसात झुंजवण्याची खेळी केली जात आहे. त्याला बळी पडणे हा आत्मघात आहे. त्यामुळे चर्मकार समाजाने उपवर्गीकरणाला राज्यात मुळीच पाठिंबा दिलेला नाही. देशातील सफाई कामगारांमध्ये 92 टक्के कामगार हे अनुसूचित जाती, जमातीमधील आहेत हे एक अहवाल मांडत केंद्र सरकारने अलीकडेच कबूल केले आहे. हीन दर्जाच्या सेवा दलितांपुरत्या मर्यादित करण्याचाच हा प्रकार नाही काय?































































