
>> विकास परसराम मेश्राम
आतापर्यंत जागतिक तापमानवाढीचा शेती आणि हवामान चक्रावर होणाऱ्या परिणामांचे अभ्यास निष्कर्ष समोर येत होते; परंतु मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्यांवर हवामान बदलाचा इतका संवेदनशील अभ्यास पहिल्यांदाच समोर आला आहे. एका अहवालानुसार, गेल्या वर्षी एकटय़ा भारतात सुमारे पाच कोटी विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटा आणि अति उष्णतेचा फटका बसला होता. 2024 मध्ये जगातील 85 देशांमधील 24.2 कोटी मुलांचे शिक्षण अतिवृष्टीमुळे विस्कळीत झाले.
युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड (युनिसेफ) च्या ‘लार्ंनग इंटरप्टेडः ग्लोबल स्नॅपशॉट ऑफ लायमेट-रिलेटेड स्कूल डिसप्शन इन 2024’ या अहवालातील धक्कादायक निष्कर्षांमुळे मुलांबद्दलची चिंता वाढली आहे. गेल्या वर्षी एकटय़ा भारतात सुमारे पाच कोटी विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटा आणि अति उष्णतेचा फटका बसला होता, असे हा अहवाल सांगतो. आतापर्यंत जागतिक तापमानवाढीचा शेती आणि हवामान चक्रावर होणाऱ्या परिणामांचे अभ्यास निष्कर्ष समोर येत होते; परंतु मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्यांवर हवामान बदलाचा इतका संवेदनशील अभ्यास पहिल्यांदाच समोर आला आहे. यामुळे पालक आणि शिक्षणतज्ञांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. हवामान बदलाचे मुलांवर आणि शिक्षणावर होणारे हानिकारक परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी धोरणे बनवण्याची व त्यांची त्वरित अंमलबजावणी करण्याची सरकारची जबाबदारी या अहवालामुळे वाढली आहे.
हवामान बदलाच्या बाबतीत भारताला अत्यंत संवेदनशील देश म्हणून घोषित करण्यात आले आहे. युनिसेफच्या अहवालानुसार, 2024 मध्ये जगातील 85 देशांमधील 24.2 कोटी मुलांचे शिक्षण अतिवृष्टीमुळे विस्कळीत झाले. प्रभावित विद्यार्थ्यांपैकी 74 टक्के विद्यार्थी हे कमी आणि निम्न-मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये असून त्यांचा सरासरी बाल हवामान जोखीम निर्देशांक (सीसीआरआय) 10 पैकी 7 आहे. 85 देश-प्रदेशांमधील शाळा हवामान धोक्यांमुळे प्रभावित झाल्याचे या अहवालातून दिसून आले आहे. तसेच 23 देशांमध्ये अनेक वेळा शाळा बंद झाल्याचे हा अहवाल दर्शवतो. यामध्ये दक्षिण आशिया हा सर्वात जास्त प्रभावित प्रदेश होता, ज्यामध्ये 128 दशलक्ष विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण हवामान बदलांमुळे विस्कळीत झाले. त्यानंतर पूर्व आशिया आणि पॅसिफिक प्रदेशात 50 दशलक्ष विद्यार्थी प्रभावित झाले. सप्टेंबर 2024 मध्ये हवामानाशी संबंधित समस्यांमुळे सर्वाधिक शाळा व्यत्यय नोंदवले गेले. या महिन्यात किमान 18 देशांमध्ये शाळांचे वर्ग अधिक काळासाठी स्थगित केले. यागी चक्रीवादळामुळे पूर्व आशिया आणि पॅसिफिक प्रदेशामध्ये 1.6 कोटी मुलांना फटका बसल्याचे ‘युनिसेफ’च्या अहवालातून दिसून आले आहे. याचबरोबर आफ्रिकेत जिथे 10.7 कोटींहून अधिक मुले आधीच शाळेबाहेर आहेत, तेथे गेल्या वर्षी हवामानाशी संबंधित व्यत्ययांमुळे आणखी 20 कोटी मुलांना शाळा सोडण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे हा अहवाल सांगतो.
हवामान बदलाचा केवळ मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत नाही, तर त्याचे इतरही अनेक परिणाम होतात. हवामान बदलाचा मुलांच्या शारीरिक आरोग्यावर, मानसिक आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम होतो. अति उष्णतेच्या आपत्तीमुळे नैराश्य, चिंता, झोपेचे विकार वाढीस लागतात. यामुळे शिकण्यात अडचणी येतात. मुलांच्या अभ्यासावर परिणाम होतो आणि परीक्षेचे निकाल अपेक्षेनुसार येत नाहीत. प्रौढांपेक्षा मुले शारीरिकदृष्ट्या हवामान व पर्यावरणीय धक्क्यांबाबत अधिक संवेदनशील आणि असुरक्षित असतात. पूर, दुष्काळ, वादळ आणि उष्णता यांसारख्या आपत्तींना तोंड देण्यास व टिकून राहण्यास मुले कमी सक्षम असतात. त्यामुळे त्यांचे जगणे, संरक्षण, विकास आणि सहभाग या मूलभूत अधिकारांवर हवामान बदलांचा प्रतिकूल परिणाम होतो. इतर संभाव्य परिणामांमध्ये अनाथत्व, तस्करी, बालकामगार, शिक्षण आणि विकासाच्या संधींचा तोटा, कुटुंबापासून वेगळे होणे, वेगळेपणा, बेघरपणा, भीक मागणे, आघात, भावनिक अडथळे, आजार इत्यादी गोष्टी आहेत.
हे संकट जगभर असले तरी दक्षिण आशियातील इतर देशांच्या तुलनेत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतात त्याचा परिणाम जास्त दिसून आला आहे. जागतिक तापमानवाढीच्या भयानक संकटावर नियंत्रण मिळवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे, जर देशात आणि जगात हरितगृह वायू नियंत्रित करण्यासाठी लवकरच जागतिक एकमत झाले नाही, तर येत्या काळात तापमान आणखी वाढू शकते. आतापर्यंत जागतिक तापमानवाढीचा शेती आणि हवामान चक्रावर होणाऱया परिणामांबाबत अभ्यासाचे निष्कर्ष बाहेर आले असले तरी मुलांबद्दल असा कोणताही संवेदनशील अभ्यास बाहेर आलेला नव्हता. युनिसेफने तो आणला हे एका अर्थाने बरेच झाले. हा अभ्यास देशातील धोरणकर्त्यांना इशारा देणारा आहे. मुलांना हवामान बदलाच्या परिणामांपासून वाचवण्यासाठी केवळ शिक्षणातच नव्हे तर आरोग्यादी इतर क्षेत्रांमध्येही मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे. 2050 पर्यंत मुलांवर उष्णतेच्या लाटांचा परिणाम आठ पटीने वाढू शकतो असे अभ्यासातून दिसून येत असल्याने, या ज्वलंत मुद्दय़ावर शिक्षणतज्ञांनी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी विचारमंथन करणे आवश्यक आहे.
जागतिक तापमानवाढीच्या संकटामुळे मुलांच्या शिक्षणात व्यत्यय येऊन त्यांच्या भविष्यावर प्रतिकूल परिणाम होईल, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या बाल निधीने दिला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे लहान मुलांना शाळेत जाणे शक्य होत नाही. पालकही अभ्यासापेक्षा त्यांच्या आयुष्याला प्राधान्य देतात. अशा परिस्थितीत शाळांच्या वेळा बदलून आणि वाढत्या उष्णतेशी संबंधित खबरदारीबद्दल जागरुकता वाढवून या संकटाचा सामना करता येईल. याशिवाय, हवामान बदलाचे आपल्या सार्वजनिक जीवनावर होणाऱया परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी देशात व्यापक अभ्यास आणि संशोधन करण्याची गरज आहे.
युनिसेफने केलेला अभ्यास हा ओस्लो विद्यापीठातील संशोधकांचा निष्कर्ष आहे. भारतीय परिस्थितीनुसार स्वदेशी अभ्यासातून निष्कर्ष समोर येण्यासाठी भारतीय विद्यापीठे आणि संशोधन संस्थांनी हे प्रयत्न केले पाहिजेत.
हवामान बदलाचे हे दूरगामी आणि आजवर अदृश्य रूपात राहिलेले परिणाम पाहता या गंभीर संकटाबाबत जागतिक पातळीवर सामूहिक उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत. पण या संकटाला तोंड देण्याबाबत श्रीमंत आणि शक्तिशाली देशांची उदासीनता आणि निष्काळजी वृत्ती विडंबनात्मक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातही मुलांच्या बालपणावर एक गडद सावली पडणे अटळ आहे. येत्या काही दशकांत जागतिक तापमान आणखी वाढेल, असा इशारा शास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी देत आहेत आणि त्यामुळे जर जगाने आताच काळजी घेतली नाही, तर एकविसाव्या शतकातील मुलांना भयानक आपत्तींपासून कोणीही वाचवू शकणार नाही.