वेब न्यूज – डानाकिल डिप्रेशन

हवामान बदलाच्या आणि त्यामुळे जगावर होत असलेल्या परिणामांच्या चर्चा सोशल मीडियावर कायम चालू असतात. हवामान बदलाचे जगाच्या विविध भागांत कसे परिणाम होत आहेत, यावर चर्चा सुरू असताना सध्या डानाकिल डिप्रेशन हा उत्तर आफ्रिकेतील प्रदेश त्याच्या काही खास वैशिष्टय़ांमुळे चर्चेचा विषय बनला आहे. आजवर काहीसा दुर्लक्षित असलेला हा भाग जगातील सर्वात उष्ण प्रदेश आहे हे कळल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. डानाकिल डिप्रेशन येथील सरासरी तापमान हे वर्षभर 35 डिग्री सेल्सियसच्या आसपास असते. येथे पाऊसदेखील तुरळक म्हणजे वर्षाला 100 ते 200 मिलीमीटर इतकाच पडतो. हा भाग समुद्रसपाटीपासून सुमारे 125 मीटर खाली आहे. यापेक्षा जास्त दुर्दैवी म्हणजे हा प्रदेश फक्त पृष्ठभागावर अशांत नाही, तर जमिनीखालीदेखील अशांत आहे. हे ते ठिकाण आहे, जिथे तीन टेक्टॉनिक प्लेट्स एकत्र येतात. या प्लेट्स दरवर्षी 1 ते 2 सेंटिमीटरने एकमेकांपासून दूर जात आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून भूगर्भातला लाव्हा इथे कायम बाहेर पडत असतो. या परिसरात अनेक ज्वालामुखी आहेत, जे कायम लाव्हा आणि राख बाहेर टाकत असतात. अत्यंत उष्ण आणि कोरडे हवामान असलेल्या या भागात जागोजागी पडलेल्या खड्डय़ांमध्ये लाव्हा उसळताना दिसतो, तर अनेक ठिकाणी बाहेर पडलेल्या आणि थंड झालेल्या लाव्हामुळे निर्माण झालेल्या छोटय़ा मोठय़ा टेकडय़ा दिसतात. भूगर्भात असलेल्या आगीमुळे इथे अनेक गरम पाण्याचे झरेदेखील निर्माण झालेले आहेत. विशेष म्हणजे इथे बाहेर पडणारे गरम पाणी लगेच सुकल्याने अनेक ठिकाणी मिठागरेदेखील तयार झाली आहेत. अशा या भयानक प्रदेशात लोकवस्ती आहे हे जाणून अजून आश्चर्य वाटते. इथे अराफा समुदायाचे लोक निवास करतात आणि या प्रदेशाला आपली मातृभूमी मानतात. 1974 मध्ये मानवी इतिहासातील ऑस्ट्रेलोपिथेकस प्रजातीचा एक सांगाडा शास्त्रज्ञांना इथे मिळाला होता. मानवी उक्रांतीचे पहिले ठिकाण म्हणूनदेखील या भागाला ओळखले जाते.