
>> दिलीप ठाकूर
एखाद्या चित्रपट संगीत उपग्रह वाहिनीवर सत्तरच्या दशकातील ‘रूप तेरा ऐसा दर्पण मे ना समाये’ (चित्रपट ‘एक बार मुस्कुरा दो’), ‘कोई माने या ना माने कल तक थे अन्जाने’ (चित्रपट ‘अधिकार’) ही किशोर कुमारने गायलेली गाणी पाहताना आजच्या पिढीतील चित्रपट रसिकांना प्रश्न पडतो, पडद्यावर ही गाणी साकारणारा अभिनेता कोण? त्याचे नाव देब मुखर्जी. होळीच्या दिवशी म्हणजेच 14 मार्च रोजी देब मुखर्जी यांचे वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी दीर्घकालीन आजाराने निधन झाले.
देब मुखर्जींची आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीसमोर ओळख म्हणजे काजोल, तनिषा मुखर्जी, शर्बनी मुखर्जी यांचे सख्खे काका, रानी मुखर्जीचे चुलत काका आणि ‘वेक अप सिद’, ‘ये जवानी ये दीवानी’, ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचे वडील. खरं तर हिंदी चित्रपटसृष्टीत मुखर्जी कुटुंबाची अतिशय मोठी आणि वैशिष्टय़पूर्ण परंपरा. चित्रपट निर्माते शशधर मुखर्जी यांनी गोरेगाव येथे 1955 साली फिल्मीस्तान स्टुडिओ व चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली. त्यानंतर 1959 साली अंधेरी पश्चिमेकडील आंबोली येथे फिल्मालय स्टुडिओ व चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली. त्यांच्या मुलांनी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. शोमू मुखर्जी चित्रपट निर्मितीत, रोनो मुखर्जी दिग्दर्शनात उतरले तर जॉय मुखर्जी आणि देब मुखर्जी नायक म्हणून या क्षेत्रात आले.
देब मुखर्जी यांचा पहिला चित्रपट ’तू ही मेरी जिंदगी’ 1965 साली प्रदर्शित झाला. हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट अर्थात कृष्णधवल होता. फिल्मालय स्टुडिओचीच ही निर्मिती व रोनो मुखर्जीचे दिग्दर्शन. चित्रपटात छाया देवी, हीरा सावंत, पॉल शर्मा इत्यादींच्याही भूमिका. या चित्रपटातील ‘जिधर भी तू है’ हे गाणे लोकप्रिय ठरले. देबचा भाऊ जॉय मुखर्जी तेव्हा नायक म्हणून जम बसवत होता. त्याच सुमारास सुधीर, जितेंद्र, विश्वजीत, राजेश खन्ना, नवीन निश्चल, अजय साहनी (नाव बदलून परीक्षित साहनी), धीरज, विनोद मेहरा असे करत करत अमिताभ बच्चन असे अनेक नवीन चेहरे आले आणि देब मुखर्जींसमोरचे आव्हान वाढत गेले. देब मुखर्जी यांनी कधी नायक तर कधी सहनायक अशी वाटचाल कायम ठेवण्यास प्राधान्य दिले. ‘आंसू बन गये फूल’, ‘संबंध’, ‘अभिनेत्री’, ‘एक बार मुस्करा दो’, ‘अधिकार’, ‘दो आंखे’, ‘जिंदगी जिंदगी’ असे करता करता छोटय़ा भूमिकेतही रस घेतला. ‘मै तुलसी तेरे आंगन की’, ‘आंसू बने अंगारे’, ‘हैवान’, ‘कराटे’, ‘बातो बातो मे’, ‘किंग अंकल’, ‘ममता की छाव मे’, ‘गुरू हो जा शुरू’ असे करत करत विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘कमिने’पर्यंत (2009) काम केले. काही वर्ष त्यांनी फिल्मालय स्टुडिओ व त्यातील मिनी थिएटर यांचाही कारभार पाहिला. कालांतराने त्या स्टुडिओचा बराचसा भाग व्यावसायिक संकुलासाठी दिला गेला. नवरात्रातील उत्तर मुंबई दुर्गापूजेचे अर्थात दुर्गोत्सवाचे भव्य दिमाखदार आयोजन हेही त्यांचे वैशिष्टय़. या वेळी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री आवर्जून भेट देतात. देब मुखर्जी यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील मुखर्जी खानदानातील एक कलाकार पडद्याआड गेला.