
<<< ब्रिगेडियर हेमंत महाजन >>>
भारतीय हवाई दलातील लढाऊ स्क्वॉड्रन्सची संख्या सातत्याने कमी होत आहे, लढाऊ विमानांची संख्या अत्यंत अपुरी आहे. या गंभीर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी भारताने केवळ योजना आखण्याऐवजी त्यांची जलद अंमलबजावणी केली पाहिजे. ऑक्टोबर 2025 पासून भारताकडे फक्त 29 लढाऊ विमान स्क्वॉड्रन असतील. पाकिस्तानकडे 25 आहेत. ही जवळपासची समानता आहे आणि ती भीतिदायक आहे
भारताच्या हवाई दलाला (IAF) चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसोबत एकाच वेळी मुकाबला करण्याची क्षमता राखण्यासाठी 42 लढाऊ स्क्वॉड्रन्सची आवश्यकता आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ही क्षमता वाढण्याऐवजी सातत्याने कमी होत आहे. सध्या हवाई दलाकडे 31 लढाऊ विमानांची स्क्वॉड्रन्स आहेत. ऑक्टोबर महिन्यात दोन जुन्या मिग-21 विमानांची स्क्वॉड्रन्स सेवेतून निवृत्त होणार आहेत. त्यामुळे आपल्याकडील स्क्वॉड्रन्सची संख्या घटून 29 वर येईल. याचा अर्थ आपल्याकडे उपलब्ध लढाऊ विमानांची संख्या अत्यंत अपुरी आहे.
लढाऊ विमानांची संख्या वाढवण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न केले जात आहेत, परंतु ते अत्यंत अपुरे पडत आहेत. स्वदेशी बनावटीची तेजस विमाने भारतीय हवाई दलात सामील होण्यासाठी प्रयत्नशील आहेत, परंतु या विमानांसाठी आवश्यक असलेले इंजिन आपण भारतात तयार करू शकलेलो नाही. परिणामी आपल्याला ही इंजिने अमेरिकेकडून मिळणे अपेक्षित होते. अनेक वेळा करारावर सह्या होऊनही अमेरिका अजूनही GE ची (जनरल इलेक्ट्रिक) इंजिने पुरवण्यासाठी तयार नाही. या समस्येवर मात करण्यासाठी आपण फ्रान्सकडूनही विमानांच्या इंजिनचे सहउत्पादन (co-production) करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र या केवळ सध्या तरी योजनाच आहेत.
ऑक्टोबर 2025 पासून भारताकडे फक्त 29 लढाऊ विमान स्क्वॉड्रन असतील. पाकिस्तानकडे 25 आहेत. ही हवाई दलाच्या बाबतीत जवळपासची समानता आहे आणि ती भीतिदायक आहे, विशेषतः पाकिस्तानचा मित्र चीनकडे 66 स्क्वॉड्रन असल्याने. एका स्क्वॉड्रनमध्ये साधारणपणे 18-20 लढाऊ विमाने असतात. पुढच्या दोन महिन्यांत भारताकडे 522 लढाऊ विमाने असतील. पाकिस्तानकडे 450, तर चीनकडे 1200 आहेत. हवाई दल प्रमुख ए. पी. सिंग म्हणाले की, भारताला दरवर्षी किमान 40 लढाऊ विमानांचा समावेश करणे आवश्यक आहे. सध्या हे अशक्य दिसत आहे.
तज्ञांचे म्हणणे आहे की, भारताने आपला नवीन फायटर विमाने बनवण्याचा वेग वाढवला नाही, तर जुनी मिराज, जॅग्वार आणि इतर मिग प्रकारची विमानांची स्क्वॉड्रन टप्प्याटप्प्याने बाहेर काढली जातील आणि 10 वर्षांत भारताकडे पाकिस्तानपेक्षा कमी लढाऊ स्क्वॉड्रन असतील. या चिंतेचे तत्काळ कारण म्हणजे भारतीय हवाई दलाकडून आपली शेवटची दोन मिग-21 स्क्वॉड्रन बाहेर काढणे आहे, परंतु यामागे अनेक वर्षांपासूनची मोठी कारणे आहेत.
2015 मध्ये 126-जेट मध्यम मल्टिरोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट करार रद्द झाल्यामुळे भारताकडे असलेल्या लढाऊ विमानांच्या संख्येत मोठा फरक पडला व विमान संख्या कमी झाली. भारताने फ्रान्ससोबतच्या सरकारी-ते-सरकारी कराराद्वारे मिळवलेली 36 राफेल विमाने IAFच्या जुन्या लढाऊ विमानांच्या ताफ्याच्या तुलनेत अजिबात पुरेशी नव्हती. भारताने नौदलासाठी आणखी 26 राफेलची ऑर्डर दिली आहे.
भारताची पाकिस्तानवरील हवाई श्रेष्ठता टिकवून ठेवण्यासाठी स्वदेशी तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट ही मोठी योजना होती. IAF कडे सध्या तेजस मार्क-1ची फक्त दोन स्क्वॉड्रन आहेत, म्हणजे 38 लढाऊ विमाने आहेत. सुधारित तेजस मार्क-1ए जेट्सची डिलिव्हरी, ज्यापैकी 83 HAL द्वारे वितरित केली जाणार आहेत, अनेक उत्पादन डेडलाइनमधून पुढे सरकली आहे. एकही विमान सेवेत नाही. हे अंशतः GE च्या इ404 इंजिनच्या वितरणातील मोठ्या विलंबांमुळे आणि अंशतः एस्ट्रा एअर-टू-एअर क्षेपणास्त्रांच्या एकत्रीकरणातील अद्याप न सुटलेल्या तांत्रिक समस्यांमुळे आणि काही गंभीर एव्हिओनिक्सच्या दुरुस्तीमुळे आहे.
IAF ला आशा आहे की, आणखी 97 तेजस मार्क-1ए येतील, तसेच अधिक शक्तिशाली GE F-414 इंजिनसह आणखी 108 तेजस मार्क-2 प्रकारची विमाने येतील. हे इंजिन 80 टक्के तंत्रज्ञान हस्तांतरणासह भारतात सहउत्पादित केले जाणार आहे, पण हे सर्व सध्या कागदावरच आहे. भारताने स्वदेशी जेट इंजिन विकसित करण्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. ’कावेरी’ प्रकल्पातील चुकांमधून शिकून परदेशी तंत्रज्ञान हस्तांतरणासोबतच (ToT) देशांतर्गत संशोधन आणि विकासासाठी (R&D) मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी. यासाठी खासगी क्षेत्राचा सहभाग आणि परदेशी कंपन्यांसोबतचे संयुक्त उपक्रम (Joint Ventures) वाढवावेत.
आधुनिक युद्धाचे स्वरूप बदलत असताना केवळ पारंपरिक लढाऊ विमानांवर अवलंबून न राहता अत्याधुनिक ड्रोन आणि मानवरहित हवाई वाहनांच्या (UAVs) विकासात, उत्पादनात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी. यासाठी खासगी कंपन्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. भारताला एक विशेष ड्रोन ‘कोर’ची आवश्यकता आहे. भारतीय हवाई दलातील लढाऊ स्क्वॉड्रन्सची संख्या सातत्याने कमी होत आहे, लढाऊ विमानांची संख्या अत्यंत अपुरी आहे. या गंभीर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी भारताने तातडीने आणि कठोर पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ योजना आखण्याऐवजी त्यांची जलद अंमलबजावणी हाच कळीचा मुद्दा आहे.