जाऊ शब्दांच्या गावा – उलटा चोर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> साधना गोरे

महाराष्ट्रात पूर्वीपासून पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे ही पदे होती. या पदांवरील व्यक्ती गावातील विविध कामं करत. पुढं तेच त्यांचं आडनाव पडलं. असंच एक पद म्हणजे कोतवाल, पण हे पद इतर पदांप्रमाणे पूर्वापार होतं की ते मुघल काळात अस्तित्वात आलं, याविषयी अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. साहजिकच हे मतभेद या शब्दाच्या व्युत्पत्तीविषयी निर्माण होणं हे ओघानं आलं. आजही गावपातळीवरील विविध कामं करण्यासाठी कोतवाल हे पद आहे, पण आजच्या आणि पूर्वीच्या कोतवालाच्या कामात बराच फरक पडला आहे.

‘कोतवाल’ या शब्दाच्या फार्सी, संस्कृत आणि तुर्की अशा तीन व्युत्पत्ती सांगितल्या जातात. फार्सा भाषेत ‘कोत्वाल’ किंवा ‘कोतवाल’ शब्द आहे. त्याचा अर्थ आहे किल्लेदार. याच अर्थाच्या संस्कृतमधील ‘कोष्ठपाल’ या शब्दाचं रूप बदलून ते कोट्ठवाल, कोतवाल झालं, असं म्हटलं जातं. तुकाa ‘कोताउल’ शब्दावरून ‘कोतवाल’ शब्द आला असंही काही अभ्यासक मानतात. कृ. पां. कुलकर्णी यांनी ‘कोतवाल’ शब्दाचे अर्थ – शिपाई, पहारेवाला, फौजदारी गुन्हे तपासणारा अधिकारी, नगररक्षक असे दिले आहेत. दाते-कर्वे शब्दकोशात या शब्दाचे अर्थ पुढीलप्रमाणे आहेत – मराठा साम्राज्यातील नगररक्षकांचा मुख्याधिकारी, शहराचा मुख्य संरक्षक अधिकारी, फौजदार, पोलीस सुपरिंटेंडेंट. मात्र आज गावपातळीवरील कोतवाल या प्रशासकीय पदाचे काम पाहिले तर ते तलाठी, पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत यांच्या मदतनीसाचे आहे. त्यामध्ये तलाठी, तहसील किंवा न्यायालयाकडून आलेल्या नोटिसा संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवणं; जमिनीचे पंचनामे, सर्वेक्षण किंवा इतर कामांसाठी तलाठय़ाला मदत करणं; गावात घडलेल्या घटना, भांडणं, मृत्यू, जन्म, संशयास्पद हालचाली याबद्दलची माहिती पोलीस पाटील किंवा पोलिसांना देणं; सभा, ग्रामसभा, सरकारी कार्यक्रम किंवा तपासणीसाठी लोकांना कळवणं; अपघात, मृत्यू किंवा गुह्यांच्या वेळी पंचनामा करताना मदत करणं, ठरलेल्या वेळी गावाला पाणी सोडणं इ. कामांचा समावेश होतो.

आता प्रश्न पडतो की, आताच्या कोतवालाची कामं शिपाई पदाच्या स्वरूपाची आहेत. मग वरील कोशकारांच्या अर्थांमध्ये दिलेली इतर कामं कोतवाल कोणत्या काळात करत होते? तर दाते-कर्वे कोशातच याचं उत्तर मिळतं. त्यात म्हटलं आहे की, मराठा साम्राज्यात कज्जे तोडणे, बाजारातील वस्तूंचे भाव ठरवणे, खरेदी-विक्रीचे दस्तावेज नोंदवणे इ. कामे असत. याचा अर्थ, आजच्या पोलिसाची आणि तहसीलदाराची किंवा त्यापेक्षाही कितीतरी अधिक महत्त्वाची कामं त्यावेळी कोतवाल करत असत. भांडणतंटा सोडवण्याच्या कोतवालाच्या पूर्वीच्या कामामुळे कोकणात सब-इन्स्पेक्टरला कोतवाल म्हटलं जात असावं.

पूर्वीच्या आणि आजच्या कोतवालाची ही कामं पाहिली की, त्यावरून तयार झालेल्या शब्दप्रयोगांचे अर्थ सहज लक्षात येतात. लग्नात शोभेसाठी म्हणून घोडय़ावर साज घालून मिरवणुकीपुढं चालवतात. पूर्वी हा घोडा कोतवालाकडून भाडय़ाने मिळे. यावरून केवळ दिखाऊ, शोभेची वस्तू; कामाला निरुपयोगी, पण डामडौल करून राहणारी व्यक्ती यांना ‘कोतवाली घोडा’ म्हटलं जातं, तर तुरुंगाला म्हटलं जातं ‘कोतवाली पिंजरा’.

उंची, सणावारी मिरवणुकीसाठी घालायच्या पोशाखाला ‘कोतवालीचा पोशाख’ म्हणण्याची पद्धत होती. याचं कारण कोतवाल पदावरील व्यक्तीला भरपूर अधिकार असल्याने तिचा पोशाख उंची असणार हे ओघाने आलंच, पण पश्चिम महाराष्ट्रात या शब्दप्रयोगाला नकारात्मक अर्थ आहे. ‘काय कोतवालासारखी कपडी घातलीयेत!’ किंवा ‘कोतवालासारखं दिसतंय!’ यांसारखे शब्दप्रयोग ढिल्याढाल्या पोशाखाला उद्देशून केले जातात. एखाद्याने आपल्या अंगकाठीपेक्षा मोठ्या आकाराचा पोशाख केला की, तो बेढब दिसतो. त्यावरून हा शब्दप्रयोग केला जात असावा. मराठेशाहीत सरदारांचे पोशाख किंवा विजय तेंडुलकरांच्या ‘घाशीराम कोतवाल’ नाटकातील पात्रांचे चुण्यांचे घोळदार पोशाख डोळ्यांसमोर आणले की, वरील शब्दप्रयोगाचा अर्थ लगेच लक्षात येईल.

‘कोतवाल चावडेरी दरोडो’ अशी एक कोकणी म्हण आहे. म्हणजे, ज्याने संरक्षण करायचे त्याच्यावरच हल्ला होतो, एवढी अंदाधुंदी माजलेली असताना ही म्हण वापरतात. कोतवालाचा मुलगा एखाद्या गुह्यात सापडला तरी गुह्याच्या चौकशीचे काम त्याच्या बापाच्याच हाती असल्यामुळे तो त्याला वाचवू शकतो. म्हणजे सत्ताधाऱयाने किंवा त्याच्या आश्रिताने काहीही केले तरी त्यास दंड होत नाही, इतरांस मात्र होतो. अशा वेळी ‘कोतवालपुत्र सर्व अरिष्टांतून निभावून जातो’, असं म्हणतात.

कांगावखोर मनुष्याला उद्देशून ‘चोराच्या उलटय़ा बोंबा’ ही म्हण वापरली जाते. अगदी त्याच अर्थाची एक कोकणी म्हण आहे, ती म्हणजे ‘कोतवालाआधी चोरा बोंब’. ‘उल्टा चोर कोतवाल को डांटें’ ही हिंदीतली म्हणही आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. त्याच अर्थाची मराठीतली म्हण आहे – ‘उलटा चोर कोतवालाला दंडी’.