
>> दयानंद पाटील
मागील 13 वर्षांत डहाणू विभागातील प्रवासी संख्या झपाटय़ाने वाढत गेली असून सुरू असलेल्या डहाणू लोकलच्या फेऱया कमी पडू लागल्या आहेत, पण फेऱया वाढविण्याच्या मागणीला पश्चिम रेल्वेकडून नकारात्मक उत्तरे दिली जात आहेत आणि विविध कारणे दिली जात आहेत. डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविण्यासंदर्भात सर्वांनी पुन्हा एकदा एप्रिलपासून येणाऱ्या नवीन वेळापत्रकाआधी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. डहाणू विभागातील प्रवाशांच्या सोयीसाठी डहाणू लोकलच्या कमीत कमी पाच अप आणि पाच डाऊन अशा फेऱया उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करायला हवा.
डहाणू लोकल 16 एप्रिल 2013 ला सुरू होऊन पुढील महिन्यात 13 वर्षे पूर्ण होत आहेत. डहाणू लोकल सुरू झाली त्या वेळी सुरुवातीला 10 अप, 10 डाऊन फेऱया सुरू करण्यात आल्या होत्या त्यातील 9अप 9 डाऊन पूर्णपणे नवीन फेऱया होत्या, तर एक फेरी डहाणू शटलची फेरी बंद करून होती.
आज डहाणू लोकलच्या 21 अप, 21 डाऊन अशा फेऱया जरी होत असल्या तरी काही फेऱया मेमू आणि डीएमयू गाडय़ा बंद करून त्यांच्या जागी धावत आहेत. जसे की, 03 मेमू आणि 03 डीएमयू म्हणजे 6 फेऱया या मेमू आणि डीएमयूऐवजी सुरू करण्यात आल्या होत्या. म्हणजे मागील 13 वर्षांत डहाणू लोकलच्या 21 फेऱया होतात त्यात फक्त पाच फेऱया वाढविण्यात आल्या आहेत असे निदर्शनास येते.
मागील 13 वर्षांत डहाणू विभागातील प्रवासी संख्या झपाट्याने वाढत गेली असून सुरू असलेल्या डहाणू लोकलच्या फेऱया कमी पडू लागल्या आहेत पण फेऱया वाढविण्याच्या मागणीला पश्चिम रेल्वेकडून नकारात्मक उत्तरे दिली जात आहेत आणि विविध कारणे दिली जात आहेत.
डहाणू येथून सकाळी 7ः05 वाजता सुटणारी विरार लोकल कोरोना काळात बंद केली होती. डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ही लोकल पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यासाठी एकदा प्रत्यक्ष गेलो असता रेल्वे अधिकाऱयांनी असे काही उत्तर दिले की, आम्ही ही लोकल सुरू करतो, परंतु मागून येणारी एक्स्प्रेस तिच्यावर आदळेल. दुसरा एक अधिकारी म्हणायला लागला की, ही लोकल सुरू केली तर विरार येथे 9 च्या नंतर पोहोचेल. कारण मागून येणाऱया एक्स्प्रेससाठी केळवे रोड येथे लूपला घ्यावी लागेल. तथापि ही लोकल विरार येथे 8.20 पर्यंत कशी पोहोचेल हे संस्थेने दाखवून दिले होते, परंतु रेल्वे अधिकारी मानण्यास तयारच नव्हते. अर्थात पुढे पश्चिम रेल्वेनेच ही लोकल 12 ऑक्टोबर 2024 पासून सुरू केली आणि ती विरार येथे 8.20 ऐवजी 8.10लाच पोहोचली, तिच्यावर कुठलीच एक्स्प्रेस आदळली नाही. वेळेच्या आधी पोहोचवली. सांगण्याचे तात्पर्य हेच की सगळे शक्य असते, परंतु रेल्वे नाहक आडकाठी करत असते, न पटणारी कारणे देते, असे वाटू लागले आहे.
दुसरे उदाहरण म्हणजे डहाणू लोकल सुरू होण्याआधीचे आहे.त्या वेळी मेमूच्या फेऱया वाढविण्यासाठी मागणी होत असे आणि त्या वेळीसुद्धा पाथ नॉट अव्हेलेबल असे उत्तर मिळत असे आणि 136.6 टक्के लोड आहे असे म्हणत असे, परंतु हायकोर्टाने आदेश देताच चमत्कार झाला. एकदोन नव्हे, तर 16 एप्रिल 2013 रोजी डहाणू लोकल सुरू झाली आणि जवळ जवळ 20 फेऱया सुरू झाल्या. कुठे गेली सर्व रेल्वेची कारणे? आजही पश्चिम रेल्वेकडून पाथ नॉट अव्हेलेबल आणि रेल्वे लाइनवर असलेला भार वाढीव टक्क्यांनी दिला जात आहे.
तथापि अजूनही पश्चिम रेल्वेची भीती अशी वाटते की, विरार-डहाणू दरम्यान जेव्हा केव्हा चौपदरीकरण पूर्ण होईल तेव्हा डहाणू लोकलच्या फेऱया वाढवताना धोरण कसे असेल? फेऱया वाढवताना हात आखडता घेतला जाईल का? फेऱया वाढवताना कुठली कारणे पुढे केली जातील का? असे म्हणावे लागते त्याचे कारण म्हणजे विरारनंतर चर्चगेटपर्यंत ज्या लोकल धावतात, त्या तीन तीन मिनिटांनी आणि तेथेही रेल्वेवर भार अतिशय मोठय़ा टक्क्यांनी आहे. बरं, डहाणू येथून वाढणाऱया लोकल विरारपर्यंत ठीक आहेत, परंतु विरारच्या पुढे कशा प्रकारे सामावून घेतल्या जातील हे पाहण्यासारखे राहील आणि त्या वेळी कदाचित रेल्वेकडून असे उत्तर दिले जाऊ शकते की, विरार-बोरिवली पाचवी -सहावी रेल्वे लाइन पूर्ण होईल तेव्हा चर्चगेटपर्यंत थेट जास्तीच्या फेऱया उपलब्ध केल्या जाऊ शकतील आणि हे तांत्रिकदृष्टय़ा खरेही आहे.
दि. 1 एप्रिल 2026 पासून पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलचे नवीन वेळापत्रक सादर होणार आहे त्यात डहाणू लोकलच्या फेऱया वाढविण्याबाबत कसा निर्णय घेण्यात येईल हे पाहण्यासारखे आहे.प्रवाशांची अपेक्षा आहे की, डहाणू लोकलच्या काही फेऱ्या 15 डब्यांच्या करण्यात याव्यात तसेच खालील वेळांत काही वाढीव फेऱया सुरू करण्यात याव्यात अशी अपेक्षा आहे.
डहाणू लोकलच्या फेऱया वाढविण्यासंदर्भात सर्वांनी पुन्हा एकदा एप्रिलपासून येणाऱया नवीन वेळापत्रकाआधी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. डहाणू विभागातील प्रवाशांच्या सोयीसाठी डहाणू लोकलच्या कमीत कमी 5 अप आणि 5 डाऊन अशा फेऱ्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करायला हवा.
डहाणूहून मुंबईकडे जाण्यासाठी (अप)
1) पहाटे – 3ः50
2) सकाळी – 7ः40
3) संध्याकाळी – 4ः45
4) संध्याकाळी – 6ः15
5) रात्री – 11ः30
विरारहून डहाणूकडे जाण्यासाठी (डाऊन)
1) सकाळी – 7ः30
2) दुपारी – 2ः30
3) संध्याकाळी – 5ः30
4) रात्री – 8ः00
5) रात्री – 10ः15































































