उमेद – अनुभवसमृद्ध `देणे समाजाचे’

>> पराग पोतदार

वेगवेळ्या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्थांचे कार्य प्रदर्शनाच्या माध्यमातून समाजासमोर मांडला जाणारा `देणे समाजाचे’ हा महोत्सव. वंचित समाजापर्यंत देण्याचा ओघ कायम राहावा हाच याचा मुख्य उद्देश आहे.

वेगवेगळ्या सामाजिक संस्थांची आपल्या कार्याबद्दल माहिती देण्यासाठी सुरू असलेली लगबग… ती माहिती जाणून घेऊन आवडणाऱया सामाजिक संस्थांना तिथल्या तिथे मदत करणाऱया महिला…तरुणांबरोबर वृद्धांचीही डोळ्यांत भरेल इतकी हजेरी… अनाथ चिमुरडय़ांनी आपल्या संस्थेची माहिती सांगण्यासाठी घेतलेला पुढाकार… आणि मेळघाट भागातील बैरागढ या दुर्गम गावातील आदिवासी लोकांसाठी कार्य करणारे पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांनी सपत्नीक लावलेली हजेरी यामुळे या वर्षीचा `देणे समाजाचे’ महोत्सव हा अनुभव समृद्ध करून गेला. तरुणांना या महोत्सवाने नवा श्वास, ऊर्जा व आत्मविश्वास तर दिलाच, पण चिमुरडय़ांनाही नवी स्वप्ने व दिशा देण्याची कामगिरी या महोत्सवाने निभावली.

समाजातील विविध प्रश्नांना कुणी शैक्षणिक क्षेत्रात, कुणी वंचित घटकातील मुलांच्या संगोपनात, कुणी पशुपक्ष्यांची सेवा करण्यात, कुणी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनात, महिला सबलीकरणात, कुणी फासेपारधी मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणात, कुणी ग्राम विकासात, तर कुणी शेतीविषयक प्रकल्पांत कार्य करतात. वेगवेळ्या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या, प्रामुख्याने ग्रामीण, निमशहरी भागांतल्या 24 सेवाभावी संस्थांचे कार्य प्रदर्शनाच्या माध्यमातून समाजासमोर मांडला जाणारा महोत्सव असे या महोत्सवाचे वैशिष्टय़ म्हणता येईल.

वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्य करणाऱया पुण्याबरोबरच बाहेरगावच्या सामाजिक संस्थांचे कार्य माहिती करून घेता यावे आणि सामाजिक संस्थांना मदत व्हावी या उद्देशाने गेली 21 वर्षे `देणे समाजाचे’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यंदा हे प्रदर्शन निवारा सभागृहात भरले होते. या प्रदर्शनाच्या आयोजक संस्था `आर्टिस्ट्री’च्या वीणा गोखले आहेत.

प्रयत्नांतून सुरू झालेला हा `दानयज्ञ’ 2005 पासून अविरत सुरू आहे. सुरुवातीला पुण्यापुरता मर्यादित असलेला हा उपाम काही वर्षांनी मुंबईतदेखील सुरू करण्यात आला. सामाजिक संस्थांना त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी जशी या प्रदर्शनाची मदत होते, तसेच ज्यांच्याकडे वेळ आहे आणि काही सामाजिक कार्य करायचे आहे, ती मंडळीदेखील यानिमित्ताने या संस्थांशी जोडली जातात.

आजपर्यंत जवळपास 285 सामाजिक संस्था या उपामाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचल्या आणि अंदाजे 18 कोटींपेक्षा जास्त निधीची भरीव मदत सेवाभावी संस्थांना मिळाली आहे. या प्रदर्शनाद्वारे समाजापर्यंत पोहोचण्यासाठी सहभागी संस्थांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही.

या प्रदर्शनाचे उद्घाटन पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांच्या हस्ते झाले. या वर्षी या उपामात बीड, बुलढाणा, जळगाव, अकोला, मेळघाट, पुणे, जालना, सातारा, कोल्हापूर, अमरावती, इंदापूर अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात कार्यरत असणाऱया संस्था सहभागी झाल्या आहेत. अनेकविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या या समाजसेवी संस्थांचे कार्य मुळातूनच समजून घेण्यासारखे आहे.

याविषयी वीणा गोखले म्हणतात, या सर्व संस्था निवडताना त्यांना मी स्वत भेट देते. या भेटीतून संस्थांची निवड पारखून केली जाते, जेणेकरून योग्य प्रकारे कार्य करणारी संस्थाच समाजापर्यंत पोहोचेल आणि त्या संस्थांना मदत होईल. हे प्रदर्शन जरी वर्षातून एकदाच असले तरी याची तयारी वर्षभर सुरू असते. विविध संस्थांना प्रत्यक्ष भेटी देण्यासाठी प्रवासाच्या वेळेसह संस्थेच्या अभ्यासासाठी आवश्यक वेळ दिला जातो. हा उपाम म्हणजे एक व्रत असल्याच्या भावनेतून अत्यंत पारदर्शकपणे सुरू असल्यामुळे तो बाविसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे.