
<<< स्पायडरमॅन >>>
बिहार राज्य कायमच काही ना काही कारनाम्यांमुळे चर्चेत असते. इथले राजकारणी असोत, चित्रपट किंवा चित्रपटातले कलाकार असोत, इथले गुंड असोत अथवा इथली प्रशासन व्यवस्था असो, काही ना काही विचित्र प्रकार करून कायम बातम्यांमध्ये असतात. इथली प्रशासन व्यवस्था आणि ती राबवणारे अधिकारी हा तर एखाद्या प्रबंधाचा विषय होऊ शकतो. गेल्या काही वर्षांत इथे घडलेल्या चित्रविचित्र निर्णयांनी, लाचखोरीने आणि राजेशाही मग्रुरीने इथले काही अधिकारी खूप चर्चेत होते. आता बिहारमध्ये एका पुत्र्याच्या नावाने निवासी प्रमाणपत्र देण्यात आल्याने हे राज्य आणि इथली प्रशासन व्यवस्था पुन्हा एकदा देशभरात चर्चेत आलेली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये निवडणूक आयोगातर्फे मतदार पुनरीक्षण अभियान चालवले जात आहे. या अभिनयामुळे इथे सध्या निवासी प्रमाणपत्राची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. या धांदलीत इथल्या मसौडी प्रभागाने एका कुत्र्याच्या नावाने निवासी प्रमाणपत्र वितरित करण्याचा पराक्रम केला आहे. जिल्हा प्रशासनाच्या आरटीपीएस कार्यालयातून देण्यात आलेले हे प्रमाणपत्र ‘डॉग बाबू’ या नावाने देण्यात आलेले आहे. हिंदी भाषेत देण्यात आलेल्या या प्रमाणपत्रामध्ये पिता का नाम ‘कुत्ता बाबू’ आणि मां का नाम ‘कुतीया देवी’ असेदेखील नमूद करण्यात आले आहे. यावर एका कुत्र्याचा फोटोदेखील देण्यात आला आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या निवासी प्रमाणपत्राचे फोटो सोशल मीडियावर वेगाने प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाला ही गोष्ट समजली. उशिराने जागे झालेल्या प्रशासनाने आता हे प्रमाणपत्र बनवणाऱ्या आणि ते वितरित करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ही बातमी लिहीत असताना, ज्या अधिकाऱ्याने हे प्रमाणपत्र बनवले त्याची ओळख पटल्याची माहिती पुढे आली आहे. या कामासाठी वापरण्यात आलेल्या संगणकाचीदेखील तपासणी करण्यात आली असून या अधिकाऱ्याला चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. सदर अधिकाऱ्याचे लवकरच निलंबनदेखील होण्याची शक्यता आहे.