>> राहुल माळी
डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांच्या एकूण 37 लेखांचा समूह म्हणजे त्यांचे ‘कृपावंत’ हे पुस्तक. हे पुस्तक प्रकाशित होऊन तब्बल नऊ वर्षांनी माझ्या हाती आले, पण या पुस्तकाला पाहताच मला खात्री झाली की, पुस्तकाला माझ्यापर्यंत नाही, तर मलाच या पुस्तकापर्यंत पोहोचायला एवढा कालावधी लागला. या पुस्तकास ज्येष्ठ पत्रकार व तत्त्वज्ञान व संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सुभाष देसाई यांची प्रस्तावना लाभली आहे. या प्रस्तावनेत त्यांनी ‘संत परंपरेचा दमदार, कसदार आढावा’ अशा समर्पक शब्दांत प्रस्तुत पुस्तकाचे वर्णन केले आहे. तसेच त्यांचे लेखकाविषयी असणारे प्रेम, जिव्हाळा व लेखकाच्या आध्यात्मिक अभ्यासाविषयी असलेला त्यांचा अगम्य विश्वास दर्शवतो.
‘तुका म्हणे गुरुभजनी । देव भेटे जनी वनी ।।’ या मथळ्याखाली व्यक्त केलेल्या लेखकाच्या मनोगतातून किंचितही अहंकाराची भावना डोकावत नाही हे विशेष. कित्येक वर्षे ‘करवीर काशी’ या साप्ताहिकाचे संपादक पद भूषवूनदेखील आपल्या कार्य कर्तृत्वाचे श्रेय ते ईश्वराला देताना पाहून नवल वाटते. किंबहुना त्यांची नम्रता व लीनता दिसून येते.
या पुस्तकाचे एका वाक्यात स्पष्टीकरण करायचे म्हटले तर असे म्हणता येईल की, महाराष्ट्रातील संत परंपरेची समर्पक, अभ्यासपूर्ण व मार्मिक ओळख करून देणारा अनमोल ठेवा म्हणजे कृपावंत हे पुस्तक होय. अगदी सहज ओघवत्या भाषेत पुष्पमालेप्रमाणे केलेली लेखांची गुंफण वाचकाला अलगद ईश्वर सान्निध्यात घेऊन जाते. भगवंतापासून-भक्तांपर्यंत सर्वांनाच स्पर्श करणाऱया या लेखमालेतून काही अपरिचित आणि प्रसिद्धीविन्मुख थोर सत्पुरुषांचा परिचय होतो.
निंबाळ येथील प्रसिद्ध आध्यात्मिक सत्पुरुष ‘गुरुदेव रानडे’ यांची गुरुपरंपरा काडसिद्धेश्वर महाराजांच्यापर्यंत जाऊन पोहोचते हे वाचून मला फारच समाधान वाटले. तसेच सोळाव्या शतकात प्रसारित झालेल्या एकनाथांच्या ‘भारुड’ या काव्यप्रकारावरील यातील तीन लेख महाराष्ट्राच्या लोकपरंपरेची तोंडओळख करून देतात. अध्यात्म व संतसाहित्यात रूची असणाऱया प्रत्येकांच्या संग्रही असावे असे हे पुस्तक आहे.
कृपावंत
लेखक : डॉ. सुनीलकुमार सरनाईक
प्रकाशक : अथर्व प्रकाशन, कोल्हापूर
पृष्ठे :144 मूल्य : रु. 170.