
>> भगवान परळीकर
ज्ञान प्रबोधिनीच्या सोलापूर आणि धाराशीव जिह्यातील हराळी संस्थेमध्ये गेली तीन दशके ज्ञानदानासाठी आयुष्य वेचणाऱया डॉ. स्वर्णलता भिशीकर यांचे नुकतेच निधन झाले. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुशीत घडलेल्या आणि राष्ट्रकार्यात झोकून दिलेल्या भिशीकर कुटुंबात 1 मे 1951 ला लताताईंचा नागपुरात जन्म झाला. संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक आणि ‘तरुण भारत’चे दिवंगत भूतपूर्व संपादक चंद्रशेखर तथा बापूसाहेब भिशीकर यांच्या त्या कन्या होत. ‘तरुण भारत’च्या संपादकपदाच्या जबाबदारीमुळे भिशीकर कुटुंबीय पुण्यात आले. त्यामुळे लताताईंचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांचा संपर्क विवेकानंदांच्या शैक्षणिक तत्त्वावर आधारित ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक असणाऱया डॉ. विनायक विश्वनाथ तथा आप्पा पेंढसे यांच्याशी आला. डॉक्टर होण्याचे आईवडिलांचे स्वप्न उराशी बाळगून फर्ग्युसन महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकत असलेल्या लताताईंकडून नियतीची मात्र वेगळीच अपेक्षा होती. डॉ. आप्पा पेंढसे यांच्याशी आलेल्या संपर्कातून लताताईंच्या जीवनाला वेगळीच कलाटणी मिळाली. त्यामुळे मानसशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी एमएचे शिक्षण पूर्ण केले. 1981 साली राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवून ‘वाचन कौशल्यांचा विकास’ या विषयात संशोधन करून विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी मिळवली. याच काळात ज्ञान प्रबोधिनीमध्ये युवती कार्यकर्त्या म्हणून सक्रिय झाल्या. ज्ञान प्रबोधिनीच्या प्रज्ञा मानस संशोधिकामध्ये दहा वर्षे वाचन कौशल्य व आनुषंगिक मानसशास्त्री य संशोधन व प्रशिक्षिण यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हानिया येथे दोन महिने त्यांनी अतिथी व्याख्यात्या म्हणूनही काम केले. 1989 मध्ये अवंतिकाबाई केळकर यांच्या सोलापुरातील बालविकास मंदिर या शाळेचे ज्ञान प्रबोधिनीकडे हस्तांतर झाले. ही जबाबदारी उचलण्यात ज्ञान प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा ताम्हणकर यांच्या बरोबरीनेच लताताईंचा सिंहाचा वाटा होता. सोलापुरात एकही पूर्वप्राथमिक शिक्षण प्रशिक्षण केंद्र नाही हे लक्षात घेऊन त्यांनी 1991 शिशू अध्यापिका विद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली. सोलापूर आणि धाराशीव जिह्याला कर्मभूमी मानून त्या तीन दशके तेथील शैक्षणिक क्षेत्रात ज्ञान प्रबोधिनीत कार्यरत होत्या. सामाजिक कार्याबरोबरच लताताईंच्या विचारांना अध्यात्माची जोड होती. अध्यात्म व मानसशास्त्र या विषयांतल्या सखोल अभ्यासामुळे त्यांची अमेरिका व कॅनडा येथील शहरांत व्याख्याने व प्रवचने झाली आहेत. विवेकानंद यांचे चरित्र ‘युगनायक’ तसेच ‘चैतन्यसागर रामकृष्ण’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. याशिवाय रामकृष्ण मठाचे भूतपूर्व अध्यक्ष स्वामी रंगनाथानंद यांच्या ‘द मेसेज ऑफ उपनिषदाज’ या सहाशे पानी गंथाचा अनुवाद त्यांनी मराठीत केला आहे. रिचर्ड बाक याचे ‘जोनाथन सीगल’, रवींद्रनाथ टागोर यांची ‘गीतांजली’, समीर राम लिखित ‘लिव्हिंग विथ हिमालया मास्टर्स’, ज्येष्ठ कार्यकर्त्या विमला ठकार यांचा ‘आत्मोल्हास’ ही त्यांनी मराठीत अनुवाद केलेली पुस्तके आहेत. 1993 च्या किल्लारी भूपंपानंतर डॉ. स्वर्णलता भिशीकर यांची मराठवाडय़ाशी नाळ जोडली गेली. भूपंपानंतर ज्ञान प्रबोधिनीचे अनेक कार्यकर्ते या भागात कार्यरत होते. लोहारा तालुक्यातील हराळी येथे ग्रामस्थांच्या आग्रहावरून ज्ञान प्रबोधिनीची निवासी शाळा उभारण्यात आली. 56 एकरच्या विस्तीर्ण परिसरात ज्ञान प्रबोधिनीने हराळी येथे विविध प्रकल्प राबविले आहेत. आजूबाजूच्या परिसरातील अनेक मुले या शाळेत गुणवत्तापूर्वक शिक्षण घेत आहेत. ही वास्तू उभारण्यात लताताईंचे मोठे योगदान होते. सोलापूर शहरातील झोपडय़ांमध्ये अठराशे साक्षरता केंद्रे चालविण्यात लताताईंचा पुढाकार होता. सोलापूर जिह्यात 18 बाल कामगार पुनर्वसन केंद्र आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी कुमठे येथे साखर शाळा चालू करण्यात त्यांचे योगदान होते. सिद्धरामेश्वराच्या पवित्र भूमीत त्यांनी सत्संग विभागाच्या माध्यमातून नवे आध्यात्मिक दालन सोलापूरकरांसाठी खुले केले. ओघवत्या लेखनशैलीबरोबरच रसाळ वाणीचे योगदान लाभलेल्या लताताईंना अनेक पुरस्कारही मिळाले होते.