आभाळमाया – ‘चतुर’ दीर्घिका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक

एक दीर्घिका किंवा गॅलॅक्सी म्हणजे सुमारे 100 ते 200 किंवा त्यापेक्षाही जास्त ताऱयांचा समूह. त्यामध्ये आपल्या सूर्यासारखे लाखो ‘साधारण’ तारे, काही अगदी लहान, तर काही अतिविशाल तारेही असू शकतात. आपल्या आकाशगंगा पिंवा ‘मिल्की-वे’ दीर्घिकेतच अब्जावधी तारे सामावले आहेत. मग त्यापैकी काही ताऱयांभोवती आपल्या सूर्यासारख्या ग्रहमाला असतीलच. अशा अनेक ताऱयांभोवतीच्या ग्रहमालांची नोंदही झाली आहे. मात्र त्यातल्या एखाद्या ताऱयाच्या एखाद्या ग्रहावर आपल्यासारखी विकसित झालेली जीवसृष्टी आहे की नाही त्याचा सुगावा लागलेला नाही. कुठेतरी केव्हातरी अगदी मायक्रोब म्हणजे अतिसूक्ष्म एकपेशीय वगैरे ‘जीव’ आढळतो आणि लगेच ‘जीवसृष्टी’ सापडल्याच्या खऱयाखोटय़ा बातम्यांना बहर येतो.

अर्थात आपल्या आकाशगंगेसारख्याच अब्जावधी दीर्घिकाही विश्वात आहेत. साहजिकच ताऱयांची संख्यासुद्धा ‘अगणित’ म्हणता येईल अशी. त्याभोवतीच्या ग्रहमालांमधल्या ‘ग्रहां’चा हिशोब मांडणंही अशक्य नसलं तरी कठीणच. तरीसुद्धा ‘दूर’ अंतराळात कोणीतरी (!) आहे का? आपल्याइतपत किंवा आपल्याहूनही अधिक विकसित ‘सजीव’ असेल का? भूतकाळात केव्हातरी ‘त्या’ प्रगत जिवांनी आपल्याकडे आतासारखी अत्याधुनिक उपकरणं नसताना आपल्याशी ‘संपर्क’ तर केला नसेल? की, आपल्याला काहीच उमजत नाही अशा समजुतीने ‘त्यांनी’ तो प्रयत्न सोडूनही दिला असेल? असे एक ना अनेक प्रश्न.

खरोखरच कोणी ‘प्रगत’ जीव कुठेतरी असता तर आपल्याला कळो न कळो त्यांनी या ग्रहावरच्या सजीवांचा वेध घेतलाच असता. शिवाय ते अतिप्रगत असतील तर त्यांना हेसुद्धा कळलं असेल की, आपण शारीरिक आणि बौद्धिक उत्क्रांतीच्या कोणत्या टप्प्यावर आहोत. थोडक्यात काय तर आपलं ‘व्हॉएजर-1’ यान आता सुमारे 26 अब्ज किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून एक ‘प्रकाशदिवस’ इतपं अंतर कापून अंतराळात जातंय तरी तिथल्या कुठल्या ‘कोणी’ आपल्याशी संधान साधलेलं नाही. मोठय़ा आशेने 1974 मध्ये आपण शौरी तारकासमूहाच्या दिशेने धाडलेला संकेतात्मक संदेशही ‘मध्ये’च कोणी ‘पकडल्या’चं ज्ञात नाही.

असा संपर्क होण्यासाठी एखाद्या ग्रहावरची प्रगत वस्तीच सापडायला हवी. आपल्याच दीर्घिकेत अशी शक्यता असलेले सुमारे 10 हजार ग्रहमालांचे जनक तारे आहेत असं समजलं जातं. तिथूनही काही साद अथवा प्रतिसाद नाही. बाकी हॉलीवूड-बॉलीवूडपटी ‘एलियन’ किंवा ‘जादू’च्या कथा हा केवळ पडद्यावरचा कल्पनाविलास.

आपल्या दीर्घिकेप्रमाणेच आपल्याला ठाऊक झालेल्या अनेक दीर्घिकांना आपण नावं दिली आहेत. एल-2 (लॅगरॅन्ज-2) बिंदूवर असलेली मानवनिर्मित, शक्तिशाली जेम्स-वेब अंतराळ दुर्बिण अगदी विश्वजन्माच्या काळातील दीर्घिकांचा, ताऱ्यांचा शोध घेतेय. येत्या शतकात कदाचित बाह्य जीवसृष्टीबद्दलची काही कोडी उलगडू शकतील आणि नवे कोडय़ात टाकणारे प्रश्नही समोर येतील. मात्र हा वैज्ञानिक प्रवास जितका आव्हानात्मक तितकाच रम्यही आहे.

आज आपण नामकरण केलेल्या ‘ड्रगनफ्लाय’ किंवा ‘चतुर’ दीर्घिकेविषयी. अरुंधती केश किंवा ‘कोमा बेरेनिसेस’ या तारकासमूहातली ड्रगलफ्लाय-44 ही एक दीर्घिका. 2016 मध्ये या दीर्घिकेचं वस्तुमान आपल्या सूर्याच्या एक ‘ट्रिलियन’ एवढं असण्याचं सुरुवातीला वाटलं ही अतिधूसर (अल्ट्रा डिफ्युज) दीर्घिका आहे. या दीर्घिकेचा अधिक अभ्यास करता तिचं वस्तुमान सूर्याच्या 160 अब्ज पट असल्याचं (नंतर) निष्पन्न झालं.

ड्रगनफ्लाय (म्हणजे पावसाळ्यानंतर दिसणारा चतुर) दीर्घिकेचं आणखी एक वैशिष्टय़ असं की, आपल्या आकाशगंगा दीर्घिकेतील ताऱयांमधून एकत्रितपणे जेवढा प्रकाश निर्माण होतो त्याच्या केवळ 1 टक्काच प्रकाश ही दीर्घिका देत असते. म्हणूनच या दीर्घिकेतील ‘कृष्णद्रव्य’ तथा ‘डार्क मॅटर’चा अभ्यास करण्यासाठी ‘डिमॉस’ हे उपकरण वापरून आणि आठ मीटर व्यासाच्या जेमिनी नॉर्थ दुर्बिणीचा उपयोग करून या दीर्घिकेच्या गाभ्यातील ‘आभा’ (हेलो) तपासण्यात आली.

या सर्व अभ्यासानंतर ड्रगनफ्लाय-44 ही दीर्घिका आपल्या दीर्घिकेसारखी चमचमणारी नसून धूसर का आहे याचा उलगडा झाला. दीर्घिकांचे असे अनेक प्रकार अवकाशात आहेत. 1924 मध्ये आपल्या आकाशगंगेबाहेरची आणि आपल्यापासून केवळ 22 लाख प्रकाशवर्षे दूर असणारी अॅन्ट्रोमीडा किंवा ‘देवयानी’ दीर्घिका एडविन हबल या वैज्ञानिकाने शोधून काढली. त्यामुळेच पहिल्या अवकाशी दुर्बिणीला त्याचं नाव देणं उचित ठरलं.

त्यानंतरच्या 102 वर्षांत म्हणजे आजतागायत हबल आणि जेम्स-वेबसारख्या अंतराळ दुर्बिणींनी अनेक दीर्घिका शोधल्या. आपल्या दीर्घिकेच्या ‘लोकल’ (स्थानिक) गटातच 51 दीर्घिका आपल्याला निश्चितपणे आढळल्या आहेत. तशा विश्वात 100 अब्ज ते 2 ट्रिलियन (दोनवर 12 शून्य) एवढय़ा तरी दीर्घिका असतील अशा निष्कर्षाला संशोधक पोहोचलेत. त्यातल्या अनेक विविध आकार प्रकारांच्या आहेत. त्यापैकी महत्त्वाच्या कोणत्या ते अधूनमधून जाणून घेऊ.