सत्याचा शोध – दैववादाचा विळखा

>> चंद्रसेन टिळेकर

दैववाद आपल्यासारख्या विकसनशील देशाच्या विकासाच्या आड येतो. प्रगतीला अडसर करतो. स्वतच्या कर्तृत्वावर विश्वास न ठेवता कुठल्या तरी अनामिक, अदृश्य शक्तीवर विश्वास ठेवणे या प्रवृत्तीतून दैववादाचा जन्म होतो. कुणीही देव, ईश्वर, संत-महंत आपले प्रश्न सोडविण्यासाठी आपले बस्तान सोडून आपल्या पाठीशी उभे राहायला येत नाहीत, येऊ शकणार नाही याची आपण सर्व भारतीयांनी एकदा मनाशी खूणगाठ बांधली तर निश्चितच दैववादाला मुठमाती मिळेल. 

भारत हा लॉजिकपेक्षा मॅजिकवर विसंबून राहणारा देश आहे, अशी आपली कीर्ती जगात आहे हे मान्य करावेच लागेल. आपल्या देशात येणारे विश्व पर्यटकही जेव्हा देशभर भटकंती करतात तेव्हा त्यांना कुठे ना कुठे महायज्ञ, भल्यामोठय़ा यात्रा-सत्संग, प्रवचने, कीर्तने चाललेली ते पाहात असतात. अशा प्रकारचा बारमाही धार्मिकतेचा रतीब जगात त्यांनी कुठे पाहिलेला नसतो. विश्व निर्माण करणारी कोणतीतरी शक्ती आहे, असे कोणी मानून आपले नित्याचे व्यवहार पार पाडीत असेल तर कोणी त्याच्याकडे कुचेष्टेने अंगुलीनिर्देश करावा हे व्यक्तीस्वातंत्र्याच्या नक्कीच विरोधी जाणारे आहे. परंतु अनेकदा भक्तिमार्गातील मंडळी आपल्या भक्तीच्या कक्षा ओलांडून दैववादाच्या प्रचंड आहारी गेल्यासारखे दिसतात तेव्हा मात्र अस्वस्थ व्हायला होते. या अस्वस्थेचे कारण हे असते की, त्या व्यक्तीचे ते अविवेकी आचरण त्याच्यापुरते मर्यादित राहात नाही, तर इतरही काही अज्ञजन त्याचा आदर्श घेण्याचा धोका असतो. विज्ञानाची एवढी प्रचंड लाट आपल्यासह सर्व जगभर आली, पण आपण मात्र दैववादाच्या छताखाली कोरडेच राहिलो.

आपले अवकाश संशोधन सोडले तर इतर क्षेत्रात आपण इतर देशाच्या तुलनेत किती प्रगती केली हा अभ्यासाचा विषय आहे.तरीदेखील उघडय़ा डोळ्यांनी समाजात वावरताना आपल्याला दैवी भाबडेपणा दिसून येतो. रस्त्यातून जाताना एखाद्या देवळासमोर गाय दिसली तर काही भाविक चटकन त्या गायीजवळ जाऊन चप्पल काढून तिची शेपटी डोळ्याला लावतात. त्यात काही आपण ज्यांना व्हाईट कॉलर म्हणतो अशी मंडळीही असतात आणि गंमत म्हणजे त्यात काही सावरकरवादीही असतात. अशा वेळी त्यांना ‘गाय फक्त एक उपयुक्त पशू आहे, माता नाही’ हे वचन त्यांना आठवत नाही.आपल्यापैकी बरेचजण अशा प्रकारच्या द्विस्तरावर वावरताना दिसतात आणि त्याचे मुख्य कारण हेच असते ते म्हणजे आपल्या भारतीयांच्या हाडीमांसी रुजलेला, खिळलेला दैववाद!

काय आहे हा दैववाद? आपण त्याविरुद्ध एवढे आकांडतांडव का करावे, असाही प्रश्न आपल्यापैकी काहीजणांना पडतो. याचे सरळ, स्वच्छ अन् स्पष्ट उत्तर आहे की, हा दैववाद आपल्यासारख्या विकसनशील देशाच्या विकासाच्या आड येतो. प्रगतीला अडसर करतो. स्वतच्या कर्तृत्वावर विश्वास न ठेवता कुठल्या तरी अनामिक, अदृश्य शक्तीवर विश्वास ठेवणे या प्रवृत्तीतून दैववादाचा जन्म होतो.

कुठला तरी देव, देवी किंवा होऊन गेलेले तसेच विद्यमान स्थितीत वावरणारे साधू, संत, महंत की ज्यांना बुवा, महाराज, स्वामी, बापू, माता या नावांनी आळविले जाते अशांचे पूजन अथवा नुसते स्मरण केले तरी आपले संकट काहीही प्रयत्न न करता दूर होते, अशा श्रद्धेतून जो निर्माण होतो त्याला आपण दैववाद म्हणतो. हा दैववाद आपण गेली हजारो वर्षे जोपासला आहे आणि आता तर त्याला ऊत आला आहे असेच म्हटले पाहिजे. सद्यः स्थितीतील आपल्या बुवा, महाराज, स्वामी यांच्या चमत्काराच्या, दृष्टांताच्या वावडय़ा पिकवून आपण समाजात विकासाला घातक असा दैववाद पसरवीत आहोत हे या भक्त मंडळींच्या लक्षात कसे येत नाही हेच समजत नाही. काही काळापूर्वी होऊन गेलेले साईबाबा, गजानन महाराज, स्वामी समर्थ हे निश्चितच सत्पुरुष होते. त्यांनी कोणाची फसवणूक केली नाही, दिशाभूल केली नाही किंवा आर्थिक लुबाडणूक केल्याचेही दाखले नाहीत. त्या दृष्टीने ते नक्कीच सत्पुरुष होते. परंतु त्यांच्या नावाने नाना तऱहेच्या चमत्काराच्या कथा समाजात पसरवून दैववादाला त्यांचे भक्त जे खतपाणी घालतात त्यांची निर्भत्सना करावी तेवढी थोडीच आहे.

निर्बुद्धपणे पसरविलेल्या या दैववादामुळे समाज एक प्रकारच्या गुंगीत वावरतो. आळशी होतो, कारण ‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी’ अशी त्याची भावना होते. या दैववादामुळे माणसाने आपल्या कर्तृत्वाने मिळवलेल्या यशाला काडीचीही किंमत राहात नाही. देवभोळेपणातून जो दैववाद निर्माण होतो तो माणसाच्या कर्तृत्वाला झाकाळून टाकतो. माणसाच्या शिस्तीला, श्रमाला, व्यासंगाला, समर्पणाला काडीचीही किंमत या दैववादाच्या आहारी गेल्याने उरत नाही. यातूनच मग आळशी वृत्ती बोकाळते. ईश्वराच्या मर्जीशिवाय झाडाचे पानही हलत नाही असे काही अतर्क्य आपल्याला ऐकावे लागते, ते निष्फळ अशा दैववादामुळेच!

या दैववादाची खिल्ली उडवताना पुलं एके ठिकाणी म्हणतात, ‘आई अंबाबाईच्या कृपेनेच महाराष्ट्र बुद्धिप्रामाण्यवादी आहे.’ लोकांच्या दैववादाला खतपाणी घालण्याचे मोठे काम आपल्या वाहिन्या करीत असतात. बुवा महाराजांचे फसवे चमत्कार दाखवण्याचे त्यांनी जणू व्रतच घेतलेले असते. एका अशाच कार्यक्रमात एक वाहिनीने काय दाखवावे तर आपल्या मुलाचे पोट दुखायचे डॉक्टरी उपाय करूनही थांबत नाही म्हणून एका बुवाकडे उपायासाठी येतो तर तो बुवा त्या मुलाच्या आईला सांगतो की, समोरच्या उकिरडय़ाची राख मुलाच्या कपाळाला लाव. ती बाई तसे करते आणि काय आश्चर्य ते मूल आनंदाने उडय़ा मारायला लागते. लक्षावधीच्या संख्येने जनता टीव्हीवरील कार्यक्रम पाहात असते, आपण त्यांना कोणता संदेश देत आहोत याचा जराही विचार कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी करू नये? नाना तऱहेच्या अंधश्रद्धांचा उगम दैववादातूनच होतो. अपवाद वगळता बरेचसे आमचे राजकीय नेतेही अंधश्रद्धांच्यावर श्रद्धा ठेवणारेच असतात. मागे एकदा मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतरही काही मंत्री आपल्या बंगल्यात जायला तयार नव्हते; ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना दिलेले बंगले हे वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेले नव्हते.

आपले प्रश्न आपणच सोडवायचे असतात, कुणीही देव, ईश्वर, संत-महंत आपले प्रश्न सोडविण्यासाठी आपले बस्तान सोडून आपल्या पाठीशी उभे राहायला येत नाहीत, येऊ शकणार नाही याची आपण सर्व भारतीयांनी एकदा मनाशी खूणगाठ बांधली तर निश्चितच दैववादाला मुठमाती मिळेल. असे जर झाले तर विवेकाची पहाट उगवायला कितीसा वेळ लागणार? आपल्याला आता प्रातःस्मरण करायचे आहे ते अशा पहाटेचे!

[email protected]

(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी
चळवळीशी निगडित आहेत.)