
>> प्रा. आशुतोष पाटील
दक्षिण गंगा समजल्या जाणाऱया ‘गोदावरी’ काठचा ‘पैठण’ किंवा ‘प्रतिष्ठान’ हा प्रदेश, जिथे अश्मयुगीन मानवाने वस्ती केल्याचे पुरावे आजही दिसतात. या पुरातत्त्वीय संदर्भांसह नंतरच्या काळात ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक अशा अनेक अंगांनी संपन्न राहिलेल्या या प्रदेशाचे स्थलमहात्म्य या सदराच्या दोन भागांमधून आपण जाणून घेणार आहोत.
इतिहासात काही स्थळे प्रत्येक युगात आपले अस्तित्व सातत्याने प्रस्थापित करत आलेली असतात. मराठवाडा प्रदेशात अशा अनेक ऐतिहासिक स्थळांची उपस्थिती आढळते. या सातत्यपूर्ण अस्तित्वामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे दक्षिण गंगा समजली जाणारी ‘गोदावरी’ नदी. या पवित्र नदीने केवळ अनेक संस्कृतींना जन्म दिला नाही, तर त्यांची भरभराट, स्थलांतर आणि अखेरदेखील पाहिली. एक संस्कृती संपते तेथे दुसऱया संस्कृतीची सुरुवात होते आणि अशा प्रकारे त्या भौगोलिक परिसराची सतत वाढ होत राहिली. या ऐतिहासिक प्रक्रियेची सुरुवात आपण अश्मयुगापासून पाहू शकतो – तेव्हा ‘पैठण’ किंवा ‘प्रतिष्ठान’ ही ओळख अस्तित्वात नव्हती. मात्र नाशिक, नेवासा, पैठण आणि त्याही पुढील परिसरात गोदावरीच्या काठी माणसाचे अस्तित्व असल्याचे पुरातत्त्वीय पुरावे स्पष्टपणे दर्शवतात.
इ.स. 1883मध्ये संशोधक वेन यांना मुंगी-पैठण परिसरात गोदावरी खोऱयात विविध अश्मयुगीन हत्यारे सापडली आणि याच घटनेने महाराष्ट्रात अश्मयुगीन संस्कृतीच्या संशोधनाची दिशा सुरू झाली. यामध्ये विशेषत अॅगेट (agatा) दगडापासून तयार केलेली सूक्ष्म हत्यारे आढळली, जी ‘फ्लेक टूल्स’ म्हणून ओळखली जातात. पुढे इ.स. 1956मध्ये डॉ. एच.डी. सांकलिया यांनी या भागात पुरातत्त्व संशोधन करत असताना अनेक प्रकारची अश्मयुगीन हत्यारे शोधून काढली, ज्यांनी त्या काळातील मानवाच्या जीवनपद्धतीचा मागोवा घेण्यास मदत केली. जरी पूर्वी काही प्रमाणात संशोधन झाले असले, तरी गोदावरी खोऱयातील अश्मयुगीन संस्कृतीच्या अभ्यासासाठी अधिक व्यापक व सखोल संशोधनाची आजही आवश्यकता आहे.
जरी या प्रदेशाची पार्श्वभूमी अश्मयुगीन कालखंडात आढळते, तरी खऱया अर्थाने नागरी जीवनाची पायाभरणी सातवाहन काळात झाली. सातवाहनांचा कालखंड महाराष्ट्रासाठी सांस्कृतिक व आर्थिकदृष्टय़ा सुवर्णयुग मानला जातो. या काळात परदेशी व्यापारास मोठय़ा प्रमाणात चालना मिळाली आणि प्रतिष्ठान हे त्या व्यापारी हालचालींचे एक प्रमुख केंद्र बनले. याच काळात या नगराला ‘प्रतिष्ठान’ हे संस्कृतमूलक नाव प्राप्त झाले, ज्याचा अर्थ ‘आदरयुक्त निवासस्थान’ असा होतो. पुढे याचे प्राकृत रूपांतर ‘पतिठाण’, ‘पतिट्ठाण’, ‘पएठाण’ अशा विविध स्वरूपांत झाले आणि अखेर ‘पैठण’ हे आधुनिक नाव प्रचलित झाले.
पैठणच्या इतिहासाचा अभ्यास साहित्यिक, अभिलेखीय तसेच पुरातत्त्वीय स्रोतांवर आधारित आहे. या स्रोतांवरून असे सूचित होते की, पैठणचे अस्तित्व इ.स.पू. 350च्या सुमारास, म्हणजेच प्रारंभिक ऐतिहासिक कालखंडात, होते. बौद्ध, जैन आणि ब्राह्मण ग्रंथांमधून पैठणचा उल्लेख वारंवार आढळतो, तसेच काही पाश्चिमात्य लेखकांनीही या नगराचे वर्णन केले आहे. उदाहरणार्थ पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी आणि टॉलेमीचे जिओग्राफी. पैठणच्या संदर्भात अनेक मिथककथा आणि लोककथा प्रचलित असून त्यांपैकी काहींमध्ये ऐतिहासिक घटकांचा अंतर्भावही आढळतो. अशा आख्यायिका ऐतिहासिक दृष्टिकोनातून लक्षवेधी ठरतात.
पैठण गावात मिळालेले सातवाहन कालीन अवशेष आपल्याला या इतिहासाची पुनर्मांडणी करण्यास मदत करतात. या पुरातत्वीय अवशेषांमध्ये प्रामुख्याने वास्तुरचना, नाणी, खापराची भांडी, दागिने, मातीच्या मूर्ती, विविध दगडाचे मणी यांचा समावेश होतो. या साधनांच्या आधारे प्रतिष्ठान हे प्राचीन मोठे व्यापारी केंद्र असावे हे निश्चित होते.
या पुरातत्वीय साधनांना लिखित साधनांचीही जोड आहे. एक संदर्भ येतो तो बौद्ध सुत्तनिपात या ग्रंथातील ‘बावरी’ नावाच्या तत्त्वज्ञाच्या कथेत, त्यात लेखक लिहितो की, अस्सक जनपदात राहणारा बावरी ब्राह्मण होता. बुद्धांच्या तत्त्वज्ञानाबद्दल ऐकून त्याने आपल्या 16 शिष्यांना बुद्धांशी संवाद साधण्यासाठी पाठवले. या प्रवासात त्यांनी जे मार्ग अनुसरले त्यामध्ये ‘पतिठाण’ (पैठण) हे पहिले स्थान होते. याव्यतिरिक्त दोन ग्रीक ग्रंथांमध्ये पैठणचा स्पष्ट उल्लेख आढळतो. पहिला आहे टॉलेमीचा geographike uphegesis (सामान्य भूगोल) आणि दुसरा आहे periplus maris erythraei जो एका अज्ञात ग्रीक-इजिप्शियन खलाशाने लिहिलेला समुद्रमार्गदर्शक ग्रंथ आहे. हे दोन्ही ग्रंथ एकाच कालखंडातील आहेत. झग्ज्त्ल्sच्या 51व्या प्रकरणात तो म्हणतो, “दक्षिण भागातील व्यापार केंद्रांमध्ये दोन अत्यंत महत्त्वाची ठिकाणे आहेत. पैठण, जे बैरगझा (भारुकच्छ) पासून दक्षिणेकडे वीस दिवसांच्या प्रवासावर आहे; आणि पैठणपासून पुन्हा सुमारे दहा दिवसांच्या अंतरावर पूर्वेला ‘तगर’ (तेर) नावाचे एक दुसरे मोठे शहर आहे. या दोन्ही ठिकाणांहून, रस्तारहित विस्तीर्ण प्रदेश ओलांडून बैरगझाकडे गाडय़ांद्वारे मोठय़ा प्रमाणात वस्तू आणल्या जातात. पैठणहून मोठय़ा प्रमाणात ओनिक्स रत्ने, तर तगरहून सर्वसामान्य प्रतीचे कापड, विविध प्रकारची सुती वस्त्रs, मोलोकिनॉन (श्दत्दक्प्ग्हदह) या प्रकारचे वस्त्र तसेच किनाऱयालगत मिळणाऱया इतर वस्तू स्थानिक बाजारात विक्रीसाठी येतात.’’ या उल्लेखावरून या परिसरात किती मोठय़ा प्रमाणात व्यापाऱयांची रेलचेल असेल याचा आपल्याला अंदाज येतो.
प्राचीन महाराष्ट्रातील एक महत्वाचं साम्राज्य म्हणजे सातवाहन! त्यांचा कालावधी साधारण इ.स.पू. 200 ते इ.स. 200 असा मानला जातो. अनेक अभ्यासकांच्या मते ही सातवाहनांची राजधानी होती, काही ग्रंथांमध्येही तसा उल्लेख येतो. पण यावर अभ्यासकांचे एकमत नाही. मागे उल्लेखलेल्या टॉलेमीच्या भूगोल या ग्रंथात तो ‘बैथाना’ या ठिकाणाचा उल्लेख ‘एग्rद झ्दतस्aग्दे’ नावाच्या एका राजाची ‘राजधानी’ म्हणून करतो, अभ्यासकांच्या मते हा राजा इतर कुणी नसून सातवाहन राजा ‘वासिष्ठीपुत्र श्री पुळुमावी’ आहे. यामुळे अनेक विद्वानांनी पैठणला सातवाहनांची राजधानी मानले आहे.
जैन ग्रंथ असलेल्या कालकाचार्य कथानक नुसार, “सातवाहन राजे (सालिवाहन) पैठणमध्ये राज्य करीत असताना जैन भिक्षू कालकाचार्य त्यांना भेटायला आले.’’ यात सातवाहन राजे पैठणहून राज्य करतात असे लेखक लिहितो. त्याचबरोबर जैन ग्रंथ ‘बृहतकल्पभाष्य’ (श्लोक 6244-6249) मध्ये पैठणला महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये गणतात तर कल्पसूत्रमध्ये पैठणला एक शिक्षणाचे केंद्र म्हणून उल्लेख केला गेला आहे. या शहराची एकंदर स्थिती लक्षात घेण्यासाठी हे उल्लेख महत्त्वाचे ठरतात. हे शहर केवळ वस्तू-वास्तूंनी संपन्न नव्हते तर भद्रबाहू आणि वराहमिहिर यांसारख्या महान तत्त्वज्ञांना पैठणचे रहिवासी असल्याचे गच्छाचारवृत्त (208) या ग्रंथात म्हटले आहे.
(लेखक पुरातत्व अभ्यासक असून एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)

























































