जाऊ शब्दांच्या गावा – जानूला बाशिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> साधना गोरे

‘गुडघ्याला बाशिंग बांधणं’ असा शब्दप्रयोग आपण अनेकदा वापरतो. त्याऐवजी ‘जानूला बाशिंग बांधणं’ म्हटलं तर? हा जानू काय प्रकार आहे? असा प्रश्न तुमच्या मनात लगेच आला असेल. वरील शब्दप्रयोगाच्या धर्तीवर ‘जानूत मेंदू’ असंही म्हणता येईल. तर या लेखात जानू आणि गुडघ्याचं नातं समजून घेऊ.

गुडघा म्हणजे आपल्या पायाच्या मध्यभागावरील सांधा. याला बिजागरीचा सांधा असंही म्हटलं जातं. दार पुढे-मागे करण्यासाठी ते भिंतीशी बिजागरीने जोडलं जातं. गुडघ्यातल्या या बिजागरीच्या सांध्यामुळे आपल्याला पाय पुढंमागं करता येतात, पाय मुडपून मांडी घालता येते. गुडघ्याप्रमाणे आपल्या हाताच्या कोपरातही हाच बिजागरीचा सांधा असतो. त्यामुळे हात पुढं-मागं करता येतात, हाताची घडी घालता येते. गुडघा आणि कोपर या दोन्ही अवयवांचा उल्लेख करण्यासाठी मराठीत एक वेगळा शब्द आहे, तो म्हणजे ढोपर.

‘गुडघा’ या शब्दाविषयी कृ. पां. कुलकर्णी म्हणतात, ‘‘गुडघा म्हणजे मांडी आणि पिंडरी यांमधील संधी. संस्कृतमधील ‘घोटक’ या शब्दापासून मराठीत ‘गुडघा’ शब्द आल्याचं म्हटलं जातं. हा शब्द मूळ द्राविडी असून त्याचे संस्कृतीकरण नंतर झाले आहे. शिवाय ‘घोटक’ आणि ‘गुडघा’ यांचा परस्परसंबंध तत्काळ पटत नाही. ‘घोटक’पासून ‘घोटा’ हा मराठी शब्द सिद्ध होणे शक्य आहे.’’ गुडघा आणि कोपरा या दोन्ही अवयवांचा उल्लेख करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘ढोपर’ या शब्दाचं मूळही द्राविडी असावं, अशी शंका देशपांडे यांनी व्यक्त केली आहे. मराठीशिवाय इतर भाषांतही गुडघ्याशी मिळतेजुळते शब्द आहेत. हिंदीमध्ये ‘घुटना’, सिंधीमध्ये ‘गुड’, गुजरातीत ‘घूंटन’, पंजाबीत ‘गोडा’, नेपाळीत ‘घुँडो’ असे उच्चार आहेत.

गुडघ्यालाच संस्कृतमध्ये ‘जानु’ म्हटलं जातं. आता हा शब्द कोणत्याच भाषेत फारसा वापरात नसला तरी बऱ्याच भाषांच्या शब्दकोशांमध्ये हा शब्द दिलेला आहे. मराठी शब्दकोशांतही तो आहे. या शब्दाची माहिती देताना कृ. पां. कुलकर्णी म्हणतात, ‘‘भारोपीय भाषाकुळात Genu असा शब्द आहे. त्याच्याशीच संबंधित संस्कृतमध्ये ‘जु’ किंवा ‘जानु’ शब्द आहे. अवेस्ता भाषेत ‘ Zanu’, खोटान भाषेत ‘Ysanua’, हिट्टाइट आणि लॅटिनमध्ये ‘Genu’, गॉथिकमध्ये ‘Knju’ असे शब्द आहेत. संस्कृतमधील ‘जानु’ हा शब्द फार जुना आहे. इंग्रजीतील ‘knee’ शब्दाशी याचा संबंध आहे. यावरून असा तर्क निघतो की, मूळ पूर्ववैदिक शब्दाच्या वर्णात ‘ज’ हा वर्ण असावा किंवा मूळ शब्द ‘जु’ असावा व त्याचे रूपांतर संस्कृत ‘जानु’ असे झाले.’’ उभं राहिल्यावर ज्याचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचतात अशा मनुष्याला ‘आजानुबाहू’ म्हटलं जातं. अर्जुनाचे हात गुडघ्यापर्यंत टेकत म्हणून त्याचं एक नाव आजानुबाहू आहे, असं म्हटलं जातं.

आपल्या शरीराचा सगळा भार गुडघ्यावर असतो. यावरून गुडघा या अवयवाचं महत्त्व लक्षात येतं. तुम्ही कधी एखादी वजनदार वस्तू स्वतःच उचलून डोक्यावर घेतली असेल किंवा कुणाला भारी ओझं उचलताना पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की, ओझं उचलणारा आधी ते आपल्या गुडघ्यावर घेतो. मग डोक्यावर ठेवतो. त्यावरून मदतगाराला उद्देशून ‘गुडघा देणारा’ म्हटलं जातं.

क्षमायाचना करताना नम्रपणा दाखविण्याच्या हेतूने वाकून जमिनीवर ढोपरं टेकून बसणं, नम्रपणा धारण करणं याला ‘गुडघे टेकणे’ म्हणतात. म्हातारपणामुळे गुडघ्यावर हात देऊन उठणं, खूप दमणं, हिंमत खचणं या अवस्थेलाही ‘गुडघे टेकणे’ म्हणतात. ‘गुडघ्यात मान घालणे’ हा वाक्प्रचारही दोन स्थितीत वापरला जातो. लाजेने आणि दुःखाने दोन्ही स्थितीत मान खाली घातल्यावर हा वाक्प्रचार वापरला जातो.

अतिशय उतावळ्या मनुष्याला उद्देशून ‘गुडघ्याला बाशिंग बांधणे’ हा वाक्प्रचार आजही मोठय़ा प्रमाणात वापरला जातो. उतावळा मनुष्य घाईगडबडीत काम करायला जातो आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण करतो. लग्नात बांधलं जाणारं बाशिंग डोक्याला बांधतात, पण उतावीळ मनुष्याला तेवढा तर्क राहत नाही. तो गडबडीत गुडघ्यालाच बाशिंग बांधून घेतो. यावरून ‘उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग’ असं म्हटलं जातं. मनुष्याचं डोकं आणि गुडघा दोन्ही गोलाकार असतात एवढंच त्यांच्यात साम्य आहे, पण माणसाने या साम्यावरून मजेदार सर्जनशीलता दाखवली आहे. ‘मेंदू गुडघ्यात असणे’ हा शब्दप्रयोगही डोकं आणि गुडघा यांच्या गोलाकार साम्यावरूनच तयार झाला असावा. तर्कहीन, अशास्त्राrय बोलणाऱया किंवा डोक्यापेक्षा शारीरिक बळाचा वापर करणाऱया मनुष्याला ‘तुझा मेंदू गुडघ्यात आहे का?’ अशी विचारणा केली जाते.

या वरील शब्दप्रयोगामध्ये गुडघ्याऐवजी ‘जानू’ शब्द वापरा. मग बघा काय काय मजा येते !