
>> साधना गोरे
म्हणी, वाक्प्रचार ही त्या त्या भाषेतली लघुकाव्येच असतात. कारण त्यांतून त्या भाषिकांची हजारो वर्षांची संस्पृती म्हणजे त्या समाजाची जीवनशैली, रूढीपरंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा तर कळतातच; पण त्यांची विचार पद्धती, सर्जनशीलता, कल्पकता ठळकपणे लक्षात येते. आपल्या कृषिप्रधान समाजाची जीवनशैली, त्यासाठी वापरलं जाणारं साधन साहित्य यावरून केवढे तरी शब्दप्रयोग आहेत. आपल्या कृषिप्रधान संस्पृतीतलं आताशा अजिबात वापरात नसलेलं एक साधन म्हणजे उखळ. आधुनिक यंत्रांचा शोध लागण्यापूर्वी शेतातून येणारं धान्य खाण्यायोग्य करण्यासाठी म्हणजे कांडण्या-सडण्यासाठी उखळ आणि मुसळ ही साधनं वापरली जात. या कामासाठी आधुनिक यंत्रांचा वापर होऊ लागला आणि माणसाची, विशेषतः बाईची केवढय़ा तरी कष्टातून मुक्तता झाली.
नव्या ‘जेन झी’ किंवा अल्फा पिढीने फक्त चित्रात किंवा एखाद्या सांस्पृतिक प्रदर्शनातच उखळ पाहिलं असण्याची शक्यता आहे. हे उखळ म्हणजे धान्य कांडण्या-सडण्यासाठी दगड खोदून किंवा लाकूड पोखरून केलेला खोलगट भाग. कृ. पां. कुलकर्णी या ‘उखळ’ शब्दाचं मूळ सांगताना म्हणतात, ‘‘संस्पृतमध्ये ‘उद्खलम्’, पालीमध्ये ‘उदुख्खल’ असे शब्द आहेत. नंतर त्याची ‘उक्खल’, ‘उऊखल’ अशी रूपं झाली, मात्र ती उत्तरकालीन आहेत. ‘उकल्लु’ हा द्राविडी शब्द मूळ असावा.’’
‘उ+खळ’ अशी या शब्दाची फोड करता येईल. यातील ‘खळ’ किवा ‘खल’ या शब्दाला खोलपणा, खळगा अशा अर्थच्छटा आहेत. म्हणूनच पूर्वी सोनाराकडे पाणी ठेवण्यासाठी जी दगडी कुंडी असे त्यालाही ‘खल’ म्हटलं जात असावं. ‘खल’ हा शब्द संस्पृतमध्येही असला तरी तो मूळ द्राविडी आहे आणि त्याचे संस्पृतीकरण नंतर झालं, असं कुलकर्णी म्हणतात. कारण हा शब्द तामीळमध्ये ‘कळम्’ असा उच्चारला जातो, तर कानडीमध्ये ‘कळ’ असा उच्चारला जातो. ‘खोल’, ‘खल’, ‘खळी’, ‘खोली’ इत्यादी शब्द एकाच साखळीतील आहेत.
ज्या घरातल्या उखळावर सतत काही ना काही धान्य कांडलं जातं ते पांढरं दिसतं, तर ज्या उखळाचा फार वापर होत नाही ते त्याच्या (दगडाच्या) मूळ रंगाप्रमाणे काळ दिसतं. यावरून भरपूर द्रव्यलाभ होणं, स्वतःचा फायदा करून घेणं या अर्थानं ‘उखळ पांढरं होणं’ हा शब्दप्रयोग वापरला जाते. ‘मराठी वाक्संप्रदाया’त याचं एक स्पष्टीकरण दिलेलं आहे – मूळ वाक्प्रचार ‘खळे पांढरे होणे’ असा असावा. कारण खळ्यावर धान्य येऊन पडले म्हणजे त्याची रास पाहून मालकाच्या वैभवाची कल्पना येते.
उखळातल्या धान्यावर मुसळाचे घाव पडल्याशिवाय राहत नाहीत. त्यावरून संकट ओढवून घेण्याच्या वृत्तीला ‘उखळात डोकं घालणं’ हा शब्दप्रयोग रूढ झाला. याच्या उलट भाव दर्शविणारी एक म्हण आहे – ‘उखळात डोके घातल्यावर मुसळास कोण भितो?’ उखळ आणि मुसळ यांची गाठ पडली म्हणजे दणदण आवाज होणारच. त्याप्रमाणे परस्पर विरुद्ध गोष्टी किंवा व्यक्ती एकत्र आल्या म्हणजे भांडणतंटा होणारच या अर्थानं ‘उखळामुसळाची गाठ पडणं’ म्हणतात.
स्थूल माणसाचं पोट गोल, गरगरीत दिसतं. त्याची बेंबी पोटाच्या भागात खोल जाऊन उखळाप्रमाणे दिसते. अशा माणसाला उद्देशून ‘बेंबीचं उखळ होणं’ म्हणतात. काही माणसं अत्यंत लबाड असतात. ती कधीच कुणाच्या कचाटय़ात सापडत नाहीत. अशी माणसं नाना खटपटी करून त्या पेचातून अलगद निसटतात, ती ‘उखळात घातलं तरी सतरा घाव चुकवणारी’ असतात. ‘कांडीन म्हळ्यार वान म्हय, आसडी म्हळ्यार सूप न्हय’ अशी कोकणी म्हण आहे. कोकणीत उखळाला वायण/वाईन म्हणतात. याचा अर्थ ‘कांडीन म्हटले तर उखळ नाही, पाखडीन म्हटले तर सूप नाही.’ म्हणजे दोन्हीकडून कुचंबणा आहे.
मराठीत ‘उखाळ्यापाखाळ्या काढणे’ असा एक शब्दप्रयोग आहे. एखाद्याचं वैगुण्य, दुष्पृत्य उजेडात आणणं, टवाळकी करणं, टोमणे मारणं या अर्थानं तो वापरला जातो, पण याचा उखळाशी काही संबंध नाही. याविषयी कुलकर्णी यांनी या शब्दाचा संबंध कानडीमधील ‘उगली’, ‘पगील’ या शब्दांशी असेल का? अशी शंका व्यक्त केली आहे. पुढे त्यांनी या शब्दांचा कानडीमधील अर्थही दिला आहे. ‘उगी’ म्हणजे दुखणे, दुखावणे आणि ‘उगली’ म्हणजे दुखापत, तर ‘पगील’ म्हणजे त्रास देणे, सोसणे.
खलबत्ता हे शेंगदाणे, मसाले इत्यादी पदार्थ कुटण्याचं साधन. ‘खल’ आणि ‘बत्ता’ या दोन वेगवेगळ्या शब्दांपासून तो तयार झाला. यातल्या ‘खल’चा आपण आधी खल केलाच आहे, तर ‘बत्ता’ हा फार्सी शब्द असून त्याचा अर्थ आहे चूर्ण करण्याचा दांडा. खलाशिवाय बत्ता आणि बत्त्याशिवाय खल काही कामाचा नसतो. अगदी तसंच उखळामुसळाचं नातं आहे. पुढील लेखात मुसळाची माहिती पाहू.






























































