विज्ञान रंजन – गवतफुलं आणि गणेशवेल

>> विनायक

रंगरंगुल्या सानसानुल्या
गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे मला लागला,
सांग तुझा रे तुझा लळा!

कवयित्री इंदिरा संत यांची ‘गवतफुलां’चे यथायोग्य वर्णन करणारी कविता आठवली ती, खिडकीपलीकडच्या अल्पजीवी, पावसाळी हिरवळीच्या तृणपात्यांवर फुललेली ‘सानुली’ फुलं पाहून. हे वर्ष आणखी एक निसर्गकवी बा. भ. बोरकर यांच्या जन्मशताब्दीचं. त्यांनी श्रावण महिन्याचं वर्णन ‘श्रावण लावण्यराज, लागला फुलाया’ असं केलंय.

…आता काही दिवसांत ऊन-पावसाचा खेळ दाखवणारा, इंद्रधनुष्याची कमान नभांगणात चितारणारा श्रावण संपेल. काळ बदललाय. खेडय़ांपासून ते गावापर्यंत सर्वत्र शहरी वेगवान, आधुनिक, यांत्रिक वगैरे संस्कृती वेगाने पसरतेय. निसर्गही लहरी झालाय. पाऊस कधी पडेल किंवा कधी दुष्काळ दाखवेल सांगता येत नाही. पण काही आठवडय़ांपूर्वीच्या गवतावरच्या वैज्ञानिक लेखात म्हटल्याप्रमाणे, वैराण वाटणाऱया जमिनीवरही आकाशातून चार थेंब पडले की ती हिरव्या गवती शहाऱयाने भरभरते. आमच्या मुंबईतल्या खिडकीतूनही मग कुठेतरी सांदी कोपऱ्यात, एखाद्या मातीच्या तुकडय़ावर उमटलेलं गवत दिसतं आणि आता त्यावरची गवतफुलंही दिसतायत.

रंजक-भंजक सर्वच गोष्टींमागे काही ना काही विज्ञान असतं. निसर्गलीला बालपणी कवितेतूनच जाणून घ्यावी आणि समजूत वाढली की त्याचा वैज्ञानिक अर्थ शोधावा. आपलं बालपणीचं भाबडं आश्चर्य मोठेपणी त्यामागचं विज्ञान जाणून शतगुणित होतं. आता कास-पठरासारख्या गवतफुलांच्या ‘रांगोळी’चा आस्वाद घ्यायला ही।। गर्दी होते. पन्नासेक वर्षांपूर्वी याहूनही छान फुलणारा तो परिसर, पुण्याहून सांगलीला जाताना मुद्दाम वाटेत उतरून मनसोक्त पाहिलाय. ती हसरी बालफुलं पाहिली. त्यावर भिरभिरणारी पिवळी छोटी आणि रंगीत मोठी फुलपाखरं न्याहाळली, चतुरांची ‘हेलिकॉटर’सारखी भरारी अनुभवली की तासन्तास जातात. आता ‘पर्यटकांकडे’ एवढा निवांत ‘वेळ’च नाही. भोज्याला हात लावून परतावं तशा अनेक गोष्टी ‘पाहिल्याची’ यादी वाढते खरी, पण ते सौंदर्य अनुभवण्याची ओळ यात येते का हा प्रश्न. मात्र ‘व्हॅली ऑफ फ्लावर्स’ला जाण्याची लगबग मोठी. अर्थात रोजच्या धकाधकीच्या जीवनातलं तेसुद्धा एक हर्षोल्हासाचंच ठिकाण.

…तर विज्ञानातील फुलमालेचं रंजनात्मक वर्णन पाहू. ही ‘टायनी’ किंवा चिमुकली फुलं वोल्किया किना वॉटरमिल अशा केवळ 2 मिलिमीटरच्या वनस्पतीवरही फुलतात. आपल्याकडच्या कास पठारावरच्या फुलांचे गालिचे पाहताना मन प्रसन्न होतं. लहानपणी आम्ही पाहिलेली पिवळी, निळी, जांभळी, गदड लाल, गुलाबी आणि कितीतरी रंगांची फुलं अक्षरशः नखाएवढीसुद्धा नसायची. त्या सगळ्यांना नावं तरी कुठली. म्हणूनच या वर्षा ऋतुतील फुलांचं एकच सामायिक नावं म्हणजे ‘गवतफूल.’

आता त्यांची वनस्पतीशास्त्रीय नावं उपलब्ध आहेत. त्यावर खूप संशोधनही झालंय. सोमाडा, मुसळी, आभाळी, सोनकी, भारंगी, गवती दवबिंदू, कासा, छावर, अंजनी, कुमुदिनी, निसुर्डी, पानेर अशी किती किती मराठी नावंही आहेत. त्या भागात राहणाऱयांना ती ठाऊक असत. आमच्या एकेकाळच्या बैठय़ा घरासमोरच्या मैदानात उमटलेल्या गवतावर यातली काही फुलतही असतील. त्याची जाणीव तेव्हा नव्हती. मात्र श्रावण-भाद्रपद महिन्यातच उगवणारा एक नाजूक, सुंदर तंतुमय पानांचा आणि लालचुटुक फुलांचा ‘गणेशवेल’ तेवढा आठवतोय. आई दरवर्षी त्याच्या बिया गोळा करायची आणि धो धो पाऊस ओसरला की पेरायची. मग त्यातून बरोबर गणपतीच्या सुमारास लाल फुलं फुलवत वेल उंच वाढायचा. एखाद्या छोटय़ाशा काठीला लपेटून त्याची नाजूक काया थरथरत राहायची.

या गणेशवेलाचं, वनस्पतीशास्त्रीतलं नाव सायप्रेस वाइन असं आहे. त्याला कार्डिनल क्रीपर (वेल) असंही म्हणतात. तो सुमारे 10 फुटांपर्यंत वाढतो. त्याची तंतुमय पाने 1 ते 4 इंचाची (7 सें.मी.) असतात. लालचुटुक फुलं 25 ते 50 मिलीलीटर एवढी छोटी असतात. 1773 मध्ये लिनेअस यांनी या फुलाचं वसतीस्थान हिंदुस्थान असल्याचं म्हटलंय.

गणेशवेलाला इतर भाषांमध्ये अशी नावं आहेत. तमीळमध्ये त्याला मेथिल मणिक्कम, मल्याळममध्ये आकाशामुल, आसामी भाषेत कुंजलता, तरुलता अशी अनेक नावं हे स्पष्ट करतात की गणेशवेल संपूर्ण देशभर फुलतो.

याशिवाय दाक्षिण अमेरिका, मेक्सिको इथेसुद्धा हा ‘सायप्रेस वाइन’ वेल बहरतो. त्याचं मूळ ठिकाण ठाऊक नाही, परंतु ज्या अर्थी हा वेल जगभर आढळतो त्याची त्याच्या बियाणाचं माप वाऱ्याहातीच असणार! या वेळी गणेशोत्सवात हे फूल नव्याने पहा, खूप छान वाटेल!