आरोग्य- आली लहर आणि उष्णतेने केला कहर

>> वैद्य चंद्रकुमार देशमुख

पिंडी ते ब्रह्मांडी असा न्याय आहे की, जे वातावरणात असेल तेच आपल्या शरीरातदेखील असते. वातावरण असो की आपले शरीर, यात दोन शक्ती महत्त्वाच्या  असतात. त्या म्हणजे एक शीत आणि दुसरी उष्ण. सूर्य नंदी म्हणजे उष्ण आणि चंद्र नंदी म्हणजे शीत. सध्याच्या उष्णतेच्या लाटेमुळे वनस्पती, प्राणी, मानव सगळेच त्रस्त आहेत. यावर उपाय आचरणात आणणे व नियम पाळणे खूप महत्त्वाचे आहे. याचसोबत विविध औषधी संग्रह करून ठेवणेदेखील महत्त्वाचे आहे. आयुर्वेद याला खूप पूरक ठरतो.

 

दिल्ली-52.6 डिग्री, हरियाणा-56 डिग्री, राजस्थान-50 तर नागपूर-52 डिग्री. अरेरे… थंड हवेचे ठिकाण पुणेसुद्धा उष्ण 46 डिग्री झाले आणि आतापर्यंत कधीच न अनुभवलेली उष्णता अनुभवायला मिळाली. पाण्याचे साठे कमी झाले. हिंदुस्थानातच नाही तर परदेशातही हीच परिस्थिती. घराच्या बाहेर निघणे मुश्कील!

पिंडी ते ब्रह्मांडी असा न्याय आहे की, जे वातावरणात असेल तेच आपल्या शरीरातदेखील असते. उदा. पाणी घेतल्यावर शरीरातील जल अंश वाढतो. मांस खाल्ल्यावर मांसपेशी वाढतात. कवठ या फळाचा आकार मेंदूसारखा असतो म्हणून ते मेंदूच्या विकारावर वापरतात. गोकर्णाची फुले योनी आणि कानासारखी असतात म्हणून ते त्या आजारावर वापरली जातात. उंबर झाडांची फळे कीड लागलेली असतात म्हणून त्याचा वापर मधुमेहामध्ये शरीरावर झालेल्या जखमेवर अळी पडल्यास वापरली जातात. जे निसर्गात असते तसेच शरीरातही असते.

दोन शक्ती 

वातावरण असो की आपले शरीर, यात दोन शक्ती महत्त्वाच्या  असतात. त्या म्हणजे एक शीत आणि दुसरी उष्ण. परंतु त्याकडे  दुर्लक्ष केले जाते. गरम झाल्यावर आपण एसी लावतो आणि त्यावेळी शरीरातील उष्ण गुणाकडे दुर्लक्ष करतो. ज्या वनस्पती औषधांसाठी वापरल्या जातात त्यादेखील उष्ण व शीत या गुणांच्या असतात. योग साधनेद्वारे दीर्घायू प्राप्त करताना शरीराची दक्षिण नाडी व वाम नाडी (उजवी आणि डावी) अशी विभागणी असल्याचे माहीत असणे महत्त्वाचे आहे. त्या दोन्ही उष्ण व शीत आहेत. डोळ्यांत vitreous नावाचे पाणी असते जे शीत आहे आणि रेटिना उष्ण आहे. म्हणून दृष्टीला कफाची भीती असल्याचे वर्णन आहे. दिवसा सूर्य असतो म्हणून उष्ण तर रात्री चंद्र असल्याने शीत असते. या दोन शक्ती मुख्य आहेत. यांच्या अनुषंगाने कोरडे, चिकट, हलके, सूक्ष्म असे 41 गुण कार्य करतात. सावलीत वाळवलेला आणि उन्हात वाळवलेला कपडा जसा वेगवेगळा असतो तसाच त्याचा टिकण्याचा कालावधीदेखील वेगवेगळा असतो.

योगशास्त्रानुसार आपल्या शरीराचे दोन भाग आहेत. दक्षिण व वाम आणि यांनादेखील सूर्य नंदी म्हणजे उष्ण आणि चंद्र नंदी म्हणजे शीत अशी विभागणी केलेली आहे. चिकित्सा करताना याचा वापर केला जातो. या दोन शक्तींवरच सर्व अवलंबून असते आणि त्यांच्या कमतरतेने शरीरात आजार होतात. उदाहणार्थ थायराईडमध्ये वजन वाढणे आणि कमी होण (हायपो आणि हायपर) हे दोन्ही प्रकार आढळतात. आयुर्वेदातही औषधी वापरताना प्रत्येक आजारांत उष्ण व शीत अशी औषधी वापरली जातात.

जनपद उध्वंस 

आयुर्वेद संहितेमध्ये जनपद म्हणजे ज्या कारणांमुळे शरीराचा नाश होतो त्या कारणांना जनपद उध्वंस करणारे कारण सांगितले आहे. जेव्हा असे होते तेव्हा आपण ज्या देशात राहतो त्या देशातील भूमी, जल, वायू, सूर्य, आकाश या सगळ्या तत्त्वांचा नाश होतो असे वर्णन आलेले आहे. गेल्या पाच वर्षांत आपण अतिपाऊस – जलदृष्टी, कोरोना – वायूदृष्टी आणि आताचे कमाल तापमान – म्हणजे सूर्य – तेजदृष्टी अनुभवत आहोत. सध्याच्या उष्णतेच्या लाटेने कोणालाच सोडलेले नाही. अगदी वनस्पती ते प्राणी सर्वच त्रस्त आहेत. यावर उपाय सांगताना धर्म आचरणात आणण्याचे नियम पाळणे त्याचसोबत विविध औषधी संग्रह करून ठेवणे महत्त्वाचे आहे. आयुर्वेद याला खूप पूरक ठरतो.

अतिउष्ण ग्रीष्म ऋतू करावे 

उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी कितीही ताकद असली तरीही टोपी, छत्री वापरावी. भुकेपेक्षा जास्त खाणे टाळावे. उन्हातून घरी आल्यावर लगेच एसीमध्ये जाऊ नये अथवा फ्रीजमधील थंड पाणी पिऊ नये, थोडासा गूळ अथवा शतावरी कल्प तोंडात धरून पाणी प्यावे. गरमी असेल तर पडद्यांना वाळा लावावा. वाळ्याचे षडंग पाणिय  जे तहान कमी करते ते प्यावे. दमट असल्याने केरळमध्ये असेच लाल पाणी प्यायला वापरतात. निंब-फूल अथवा शीत फुलांचा वापर करावा. अंघोळीपूर्वी चंदन किंवा नारळ तेल वापरावे. झोपताना पायाला शतघृत – जे 100 वेळा थंड पाण्याने धुतलेले आहे ते वापरावे. कापूर-चंदनाचा लेप करावा. जागरण टाळावे. कपडे फिकट रंगाचे वापरावेत. दूध आणि भात हे शीत असतात. दही हे पोटात पचन झाल्यावर उष्ण होते. लोणी काढल्यावर जे ताक बनते ते प्यावे. दहय़ात पाणी टाकून केलेले ताक हे रक्तवृद्धी करते.  आंघोळ करताना डोक्यावर अति गार पाणी घेऊ नये. बेल पत्र आणि तुळशी पत्र रोज खावे.

पावसाळा

पाणी उकळले म्हणजे हलके होते. ते पाणी प्यावे. नाहीतर ते आम्ल विपाकी झाल्यास वात वाढतो. सर्व प्रकारे भूकेचे रक्षण करावे व अग्नीपेक्षा जास्त खाऊ नये. उष्ण शरीर असताना पाण्यात प्रवेश केल्यास त्याचा परिणाम डोळय़ांवर होतो, ते टाळावे. याच काळात वात वाढतो, कुठल्याही आयुर्वेद महाविद्यालयात जाऊन बस्ती करून घ्यावे. अभ्यंग – चंदन तेल, तीळाच्या तेलाने अभ्यंग करावे. अन्न  नेहमी गरमच खावे. भुकेवर लक्ष ठेवावे. पावसाळय़ानंतर शरद ऋतू येतो त्यावेळी पित्त वाढवणारे पदार्थ जे उष्ण असतात ते कमी करावेत.

शरीरावर होणारे परिणाम

उष्णता वाढणे, उष्माघात, पित्त वाढणे, त्वचेचे व घामाचे विकार होणे, केस गळणे, स्ट्रोक होणे, रक्ताचे विकार होणे, थकवा जाणवणे, फुप्फुसाचे विकार होणे व उत्साहात हानी होणे… असे सर्व विकार  होताना पाहायला मिळतात. त्यात ग्रीष्म ऋतू संपून वर्षा ऋतू – पावसाळा सुरू होणार आहे. अत्यंत उष्ण झालेल्या जमिनीवर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जल आणि वातावरण हे अग्नी म्हणजे भूक कमी करणारे बनते.  जेवढी उष्णता उन्हाळ्यात असते तेवढीच पावसाळय़ात आजारांची तीव्रता असते. कारण अग्नी मंद होतो आणि आपण नेहमीचे अन्न खात असलो तरी आजार वाढतात.